esakal | चीनने प्रगती करताना जी कुरघोडी केली, तीच आता आपण चीनवर करायला हवी
sakal

बोलून बातमी शोधा

चीनमधील परदेशी कंपन्यांना भारतात चांगला पर्याय उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.

कम्युनिस्ट राजवटीखाली राहूनही आणि व्यक्तिस्वातंत्र्य नसूनदेखील आजची चीनची जनता इतकी राष्ट्रवादी यापूर्वी कधीच नव्हती. चीनने औद्योगिक प्रगती करताना पाश्‍चात्यांवर जी कुरघोडी केली, तीच आता आपण चीनवर करायला हवी. जगालाही आशियात पर्याय हवा आहे. तो लोकशाहीवादी भारतच देऊ शकतो. त्यासाठी पावले उचलायला हवीत.

चीनने प्रगती करताना जी कुरघोडी केली, तीच आता आपण चीनवर करायला हवी

sakal_logo
By
प्रशांत वाडकर, व्हॅंकुव्हर (कॅनडा)

कम्युनिस्ट राजवटीखाली राहूनही आणि व्यक्तिस्वातंत्र्य नसूनदेखील आजची चीनची जनता इतकी राष्ट्रवादी यापूर्वी कधीच नव्हती. चीनने औद्योगिक प्रगती करताना पाश्‍चात्यांवर जी कुरघोडी केली, तीच आता आपण चीनवर करायला हवी. जगालाही आशियात पर्याय हवा आहे. तो लोकशाहीवादी भारतच देऊ शकतो. त्यासाठी पावले उचलायला हवीत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारत आणि चीन साधारण एकाच वेळी ( १९४७ आणि १९४९) राष्ट्र म्हणून उभे राहिले. १९८० पर्यंत दोन्ही देशांचा आर्थिक आकार समानच होता. परंतु त्यानंतर चीनने जो विकासाचा वेग पकडला तो प्रचंड होता. त्याच्यापुढे भ्रष्टाचारात बरबटलेला आणि जात- धर्माच्या राजकारणात बुडालेला भारत मागे पडला. चीनने त्याच्या भौगोलिक सीमारेषाही पुढे ढकलायला चालू केले होते. तिबेट जो चीनच्या क्षेत्रफळाच्या साधारण २३ टक्के भूभाग आहे, तो त्याने १९५० मध्ये गिळला. त्यानंतर त्याने आपल्या अरुणाचल प्रदेशाचा काही भाग आणि अक्‍साई चीनही घशात घातला. चीनचा हा हव्यास फक्त भारतकेंद्रित नाही. तंत्रज्ञान चोरीमध्ये तो अमेरिका, युरोप इत्यादींना ठगत आहे, अर्थ मायाजालामध्ये आणि कर्जाच्या सापळ्यामध्ये तो श्रीलंका, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, आफ्रिकेतील अनेक देशांना अडकवतो आहे. एकूण १८ देशांशी चीनचे वाद चालू आहेत. 

भारताने काय करायचे?
निडरपणा, राष्ट्रवादी दृष्टिकोन, दूरवरचे असे भविष्यकालीन नियोजन हेच चीनच्या प्रतिशोधाचे राजमार्ग आहेत. सुरुवात चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’वर घाव घालून करायला हवी. चीन इतर देशांना तिबेट, तैवान, हाँगकाँग, मकाऊ, आदी क्षेत्रांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करू देत नाही. बहुतांश देश चीनची मर्जी राखत त्याला पाठिंबाच देतात. 
एकीकडे चीन उघडपणे पाकिस्तानची पाठराखण करणार, मालदीव, नेपाळ इत्यादींना भारताच्या विरोधात भडकावणार, आपल्या अरुणाचल, लडाख, वगैरे भूभागावर हक्क सांगणार आणि आपण म्हणणार, की ‘हो तिबेट तुमचाच आहे’ किंवा तैवानसारख्या प्रगत देशाचा मैत्रीचा हात झिडकारणार, असे किती दिवस चालणार? जाहीर करा- आम्ही तिबेटच्या स्वातंत्र्याला मान्यता देतोय म्हणून आणि तैवानशी अधिकृत राजकीय संबंध प्रस्थापित करतोय म्हणून. आपणही एक लष्करी शक्ती आहोत, याची जाणीव होऊ देत कृतीतून. चीन आर्थिक निर्बंधाची भाषा करेल. करूदे. नुकसान चीनचे जास्त होईल. कारण ५६ ते ५७ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी व्यापारतूट आहे आपल्या आणि चीनमध्ये. शिवाय आत्मनिर्भर भारत होण्यास याची मदतच होईल.  

संख्याबळाने आणि आधुनिक शस्त्रास्त्रांच्या बाबतीत असेल चीन आपल्यापेक्षा काकणभर पुढे; पण आपली शस्त्रे पकडणारी मनगटे नक्कीच कणखर आहेत. संरक्षण क्षेत्रात आज भारताला गरज आहे ती स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मितीची. आजमितीस भारताची सुमारे ऐंशी टक्के शस्त्रास्त्र खरेदी परदेशातून होते, तर याच्याबरोबर उलट चीन त्यांची ८० टक्के शस्त्रे स्वतःच निर्माण करतो. जागतिक स्तरावर विकल्या जाणाऱ्या शस्त्रांपैकी १० टक्के एकटा भारत खरेदी करतो, तर चीनचे हेच प्रमाण साधारण साडेचार टक्के इतकेच आहे. 

चीनचा कम्युनिस्ट राष्ट्रवाद! 
बाब तंत्रज्ञानाची नाही, बाब आहे दूरदृष्टीची आणि राष्ट्रहिताचा विचार करण्याची. आपण अणुबॉम्ब, हैड्रोजन बॉम्ब, उपग्रहभेदी क्षेपणास्त्रे इत्यादी काही बनवू शकतो तर आपण स्वयंचलित रायफली आणि काडतुसे नक्कीच बनवू शकू. गरज आहे निर्धाराची. 
प्रत्येक देशाचा एक सुवर्णकाळ असतो. या पुढील काळ भारताचा असेल असे ठरवून, कंबर कसून कामाला लागले पाहिजे. धर्म, गाय, मंदिर, मशीद आदी आणि अंधश्रद्धा यांना फाटा देऊन देशात जास्तीत जास्त उद्योग कसे येतील आणि ते कसे फुलत जातील, याचीच भ्रांत सर्वांना पडली पाहिजे. दोन वेळचे चार घास अन्न, हाताला काम आणि त्याबरोबर येणारी समृद्धी इतर सर्व भ्रामक गोष्टींना छेद देते. अन्यथा कम्युनिस्ट राजवटीखाली राहूनही, व्यक्तिस्वातंत्र्य नसूनदेखील आजची चीनची जनता इतकी राष्ट्रवादी यापूर्वी कधीच नव्हती. चीनने औद्योगिक प्रगती करताना पाश्‍चात्यांवर जी कुरघोडी केली, तीच आता आपण चीनवर करायला हवी.

हीच अनुकूल वेळ 
चीनकडून आयात कमी केली पाहिजे. आयातीऐवजी चिनी कंपन्यांना तोच माल भारतात कारखाने काढून बनवण्यास भाग पाडावे. चीनमधील परदेशी कंपन्यांना उत्कृष्ट पर्याय भारतात उपलब्ध करून देणे शक्‍य आहे. जनतेने कर्मयोग अंगिकारला पाहिजे. भारत तरूणाईचा देश आहे, आपली ६५टक्के लोकसंख्या पस्तिशीखालील आहे हे खरे, परंतु यातील बहुसंख्य तरुण उत्सव, धर्म, राजकारण आणि चकाट्या पिटणे यातच मग्न असेल तर आपण चीनचा मुकाबला कसा करणार?  या तरुणांना कर्तृत्वाची विविध क्षेत्रे दाखवली पाहिजेत. त्यात झोकून देऊन काम करणे हाच पराक्रम आहे, हे त्यांच्या मनावर ठसवले पाहिजे. आज ‘कोरोना’मुळे जागतिक मानस चीनविरोधी आहे. त्याचा फायदा उठवला पाहिजे. जगालाही आशियात पर्याय हवा आहे. तो लोकशाहीवादी भारतच देऊ शकतो. त्यासाठी पावले उचलायला हवीत. कोरोना विषाणूचे पाप चीनच्या पदरात उघडपणे घालून त्या दिशेने वाटचाल करूयात.

Edited By - Prashant Patil