अग्रलेख - झुंज पावसाशी...

अग्रलेख - झुंज पावसाशी...

बालकवींच्या कवितेमुळे मनामनांत रुतून बसलेला श्रावणमास आठ दिवसांवर येऊन ठेपेपर्यंत वरुणराजा महाराष्ट्रावर रुसला होता. मात्र, अचानक गेल्या आठवड्यात ‘गडद निळे गडद निळे जलद’ क्षितिजावर दाटी करू लागले आणि गेले तीन दिवस महाराष्ट्राच्या बहुतेक भागांवर अक्षरश: कोसळले. भुरभुरणाऱ्या श्रावण सरींचा विलोभनीय खेळ सुरू व्हायच्या आधी मेघदूतातल्या क्रीडापरिणत हत्तींप्रमाणे चालून आलेल्या या आषाढी घनमालांची मुंबई-कोकण पट्ट्यावर जणू वक्रदृष्टीच वळली होती! अर्थात, मुंबई आणि ठाणे परिसरात अलीकडल्या काळात पावसाच्या दोन सरी पडल्या, तरी रस्त्यांची तळी होतात, अशी स्थिती आहे. तशी ती झालीही. मात्र, या पावसाने खरा दणका दिला तो मध्य रेल्वे आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला. मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने गुरुवारी रात्री महालक्ष्मी एक्‍स्प्रेस निघाली तेव्हा बदलापूरच्या पुढे या प्रवाशांच्या नशिबी काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना कोणालाच नसेल. मात्र, पुढे ही गाडी पावसाच्या तडाख्यात सापडली आणि वेगाने धावणारी ही गाडी जागीच ठाणबंद झाली, ती पुढच्या १४ तासांसाठी. मात्र, जराशा उशिराने का होईना या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यासाठी विविध सरकारी आणि बिगरसरकारी यंत्रणांनी, स्थानिक नागरिकांनी कंबर कसली आणि चौदा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्वच्या सर्व प्रवाशांना सुखरूप सुरक्षित ठिकाणी हलविले. बचावकार्याचे सर्वांत महत्त्वाचे उद्दिष्ट जीवितहानी टाळणे, हे असते. त्याबाबतीत ही मोहीम यशस्वी झाली. विविध सरकारी यंत्रणांतील समन्वयही दिसून आला.

एकीकडे मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील बदलापूर रेल्वे स्थानकापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर हा निसर्गाचा खेळ सुरू असतानाच, तिकडे कोकणातील प्रसिद्ध परशुराम घाटात एक डोंगरच गोवा महामार्गावर कोसळला आणि इकडे लोणावळा परिसरातही दरड कोसळून रस्ते वाहतुकीला मोठाच फटका बसला. त्याचवेळी कल्याणपासून पुढे नाशिक तसेच पुणे या दोन्ही मार्गांवरील उपनगरांत पावसाच्या पाण्याचा निचराच होऊ शकला नाही आणि त्यामुळे वस्त्याच्या वस्त्या जलमय झाल्या. जनजीवन अर्थातच ठप्प झाले आणि अनेकांची मोठी कुचंबणा झाली. असे काहीही आणि केव्हाही घडले, की ते संकट अस्मानी होते का सुलतानी, असा प्रश्‍न विचारण्याचा रिवाज आहे. ‘महालक्ष्मी एक्‍स्प्रेस’मधील प्रवाशांना ज्या संकटाला सामोरे जावे लागले, ते अर्थातच अस्मानी होते आणि सरकारच्या अथक प्रयत्नांमुळेच ते त्यातून सुखरूप बाहेर आले. पण, एकूणच अशा प्रकारच्या संकटांची तीव्रता वाढविण्यास माणसानेच कितपत हातभार लावला आहे, याचाही गांभीर्याने विचार करायची हीच वेळ आहे. मुंबई-पुणे काय किंवा मुंबई-गोवा काय, या मार्गांवर रस्त्याने प्रवास करणे हा दोन-अडीच दशकांपूर्वीपर्यंत अत्यंत नेत्रसुखद असा अनुभव असे. पाऊस सुरू झाला, की मग या मार्गांवर निसर्गाची अनेक विलोभनीय आणि बदलती रूपे बघायला मिळत. अलीकडे हे चित्र बदलत चालले आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी पुण्यातील रमणीय टेकड्यांवरील वृक्षांची कत्तल सुरू झाली, तेव्हा त्याविरोधात पुणेकर रस्त्यावर आले होते. मात्र, आता हे वृक्षकत्तलींचे लोण या दोन्ही महामार्गांवर साथीच्या रोगाप्रमाणे पसरले आहे आणि अवघा आसमंत ओडका-बोडका दिसू लागला आहे. एकदा का डोंगरांवरील झाडांची कत्तल झाली, की त्या खडक-मातीला धरून ठेवणारी मुळांची वीणच उसवून जाते. अर्थात, त्याची परिणती  प्रथम दगडमाती, मग दरड आणि अखेरीस डोगरच कोसळण्यात होते.

डोंबिवली-कल्याण आणि त्यापुढील उपनगरांत याच दिवसांत पाण्याचा निचरा होऊ शकला नाही, त्यासही माणूसच मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. वाढत्या नागरीकरणाबरोबरच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, कुळगाव-बदलापूर या परिसरावरील अतिक्रमणे वाढत गेली. त्यांना नियोजनपूर्वक काही आकार देण्याऐवजी अनधिकृत बांधकामांचा पुरस्कार करण्यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि सरकारी यंत्रणा धन्य समजू लागल्या. त्याचवेळी नव्याने उदयास येणाऱ्या वस्त्या, कॉलन्या तसेच गृहनिर्माण सोसायट्या येथील लोकांना माती ही शत्रूवत वाटू लागली आणि दिसली मोकळी जागा की टाका काँक्रीट वा पेव्हर ब्लॉक्‍स यांचे सत्र सुरू झाले. पाणी मग मुरणार तरी कसे आणि कोठे? एकीकडे जल, जंगल, जमीन वाचवण्याचे नारे द्यायचे आणि प्रत्यक्षात त्याविरोधात रोजच्या रोज आचरण करावयाचे; मग निसर्ग कोपणार नाही तर काय? त्यात पाऊसही अलीकडे आपला ‘पॅटर्न’ बदलत चालला आहे. मग त्याचा अंदाज तरी कसा येणार? निसर्गाच्या बाबतीत आपले वागणे असेच सुरू राहिले, तर उद्याचे चित्र काय असेल? संकटे आल्यानंतर त्यांना तोंड द्यायला हवेच; परंतु ती कोसळू नयेत, यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत. पाऊस आला नाही तरी संकट आणि असा ‘बेधुंद’ कोसळला तरी संकटच, अशी सध्या आपली स्थिती आहे. त्या अर्थाने माणसाची पावसाशी झुंज सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com