पहाटपावलं : दिरंगाईची कारणे

Raja-Akash
Raja-Akash

परीक्षा दोन महिन्यांवर असताना अमित भेटला. त्याचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं, वाचलेलं लक्षात राहत नव्हतं. दिरंगाई करण्याच्या स्वभावामुळे त्याचा काहीच अभ्यास झाला नव्हता. त्याची अशी अपेक्षा की, मी पटकन काही तरी करून त्याची स्मरणशक्‍ती वाढवून द्यावी व परीक्षेत चांगले गुण मिळवून द्यावेत. त्याला मी विचारलं, ‘‘तू मला आधीच का भेटला नाहीस?’’ तो म्हणाला, ‘‘सर, मी खूपदा ठरवलं तुम्हाला भेटायचं; पण जमलंच नाही.’’  असंख्य विद्यार्थी अशा दिरंगाईच्या दुष्टचक्रात अडकलेले आहेत. केवळ विद्यार्थी नव्हे, तर आपल्यातला प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या बाबतीत दिरंगाई करतो व स्वत:साठी नव्या समस्या निर्माण करून ठेवतो. वीज बिल, फोन बिल भरण्याची आठवण आपल्याला शेवटच्या दिवशी होते आणि आपल्यासारखेच खूप लोक असल्यामुळे शेवटच्या तारखेला बिल भरताना आपल्याला तास-दोन तास रांगेत उभं राहावं लागतं. दोन दिवस आधी आपण बिल भरायला गेलो असतो, तर तेच काम दोन मिनिटांत झालं असतं.

आपण विविध कारणांसाठी दिरंगाई करत असतो. 
१) काही लोकांच्या परिश्रम करण्याच्या पद्धतीत नियोजनाचा अभाव असतो. ते हाती घेतलेल्या कामांकडे लक्ष देत नाहीत. महत्त्वाच्या गोष्टी विसरतात आणि स्वत:चे प्रश्‍न आणखी वाढवून ठेवतात.
२) काही लोकांना असं वाटतं, की आपण अकार्यक्षम, असहाय, दुर्बल आहोत. आपण कुठलंही काम करायला गेलो की त्यात विघ्नंच येतात. आपल्याला काहीच नीट जमत नाही, आपण नेहमी अपयशी होतो, असं त्यांना वाटत असतं. म्हणून ते दिरंगाई करीत असतात.
३) काही लोक इतरांची गैरसोय व्हावी, इतरांना त्रास व्हावा म्हणून मुद्दाम ठरवून दिरंगाई करतात. उदा. ग्रंथालयाचं पुस्तक उशिरा परत करणं. जिथं आपल्या उशिरा पोचण्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो, तिथं मुद्दाम उशिरा जाणं.
४) काही लोकांना नियम आणि ठराविक चाकोरी धुडकावून लावायची सवय असते. ‘माझे नियम मी स्वत: बनवेन. मी कुणाचं म्हणणं मुळीच ऐकणार नाही,’ या वृत्तीमुळे ते मुद्दाम दिरंगाई करतात आणि स्वत:ला वाटेल तेव्हा आणि वाटलं तरच ती कृती करतात.
५) काही लोक इतरांना काय वाटेल, याचा खूप जास्त विचार करतात. 

इतरांच्या मनातील आपली प्रतिमा डागाळू नये, लोकांनी आपल्याला कमी लेखू नये, म्हणून ते ज्यात यश मिळण्याची खात्री नसतं अशी कामं टाळतात. ‘मी ते काम खूप चांगलं केलं असतं’, मी नक्‍की यशस्वी झालो असतो; पण मला ते करायला वेळच मिळाला नाही’ अशी कारणं ही मंडळी देतात. असे लोक आयुष्यात आलेल्या महत्त्वाच्या संधी घालवतात आणि निराश होतात. आपण यापैकी कोणत्या कारणांमुळे दिरंगाई करतो, हे ओळखता आलं तर दिरंगाईवर सहज मात करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com