जिगरबाज वीरपत्नी

जिगरबाज वीरपत्नी

अडतीस वर्षीय आणि दोन मुलांची आई लष्करात लेफ्टनंट म्हणून रुजू होते, ही साधी बाब नाही. एरवी, एखाद्या चित्रपटाची कथा शोभावी, अशी ही घटना प्रत्यक्षात येण्यासाठी जिगर लागते. रगारगात देशप्रेम असावं लागतं. अपार संघर्षाची तयारी आणि निर्धार अढळ असावा लागतो. सातारा जिल्ह्यातील पोगरवाडीसारख्या एका खेडेगावातील स्वाती महाडिक या सर्वसामान्य स्त्रीकडे हे सारे गुण उपजतच असावेत. त्यामुळेच पतीच्या हौतात्म्यानंतर त्याला अखेरचा निरोप देताना लष्करात भरती होण्याचा निश्‍चय त्या करू शकल्या. त्यांचा तो निश्‍चय म्हणजे केवळ भावनेच्या भरात उच्चारलेले शब्द नव्हते, हे त्यांनी आज जगाला दाखवून दिलं. शनिवारी त्या लष्कराच्या आयुध कोअरमध्ये (आर्मी ऑर्डनन्स कोअर) लेफ्टनंटपदी रुजू झाल्या.

स्वाती यांचे पती कर्नल संतोष महाडिक हे काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना १७ नोव्हेंबर २०१५ रोजी हुतात्मा झाले. साताऱ्यातील सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या संतोष यांच्या हौतात्म्यामुळे सारा महाराष्ट्र गहिवरला. स्वाती आणि त्यांच्या कुटुंबीयांवर तर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, स्वाती यांनी त्याच वेळी डोळ्यांतील अश्रूंच्या साक्षीने आपणही लष्करात जाणार, असा विचार बोलून दाखवला. ते एका वीरपत्नीचे शब्द होते. त्यांच्या प्रत्येक शब्दांत जिद्द होती. अर्थात, त्यांचा हा निश्‍चय सहजासहजी प्रत्यक्षात येणारा नव्हता, याची कल्पना त्यांनाही होती.

लष्करात भरती होण्यासाठी काही अत्यावश्‍यक बाबींची पूर्तता करावी लागणार होती. त्यासाठी संघर्ष करावा लागणार होता. खडतर लष्करी प्रशिक्षणासाठी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीत त्या दाखल झाल्या. पण दुसरीकडे कुटुंबाला धीर देण्याचं अवघड काम त्यांनाच करायचं होतं. शिवाय, स्वराज आणि कार्तिकी या दोन मुलांपासून काही काळ लांब राहायचं होतं. ही सारी आव्हानं त्यांनी जिद्दीनं पेलली. 

एकेकाळी शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांना घडविणारे त्यांचे हात आता दहशतवाद्यांशी लढणार आहेत. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या पतीची अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण करायचीच, या जिद्दीतून ध्येयापासून जराही विचलित न होता, त्यांचा आजपर्यंतचा प्रवास झाला आहे.  त्यांचा लेफ्टनंटपदापर्यंतचा हा संघर्षमय प्रवास महिलांसह प्रत्येकाला ‘जिगर’ शिकविणारा आहे. त्यांच्या जिद्दीला सलाम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com