श्रद्धांजली : एक वादळ निमाले

ram jethmalani
ram jethmalani

इंदिरा गांधी यांचे मारेकरी असोत की शेअर बाजारात मोठा गैरव्यवहार करणारा हर्षद मेहता असो; किंवा कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई यांचे मारेकरी असोत, या साऱ्यांना आपल्या बचावासाठी एकाच वकिलाची आठवण येई. प्रसिद्ध कायदेपंडित राम जेठमलानी हे ते नाव! सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातील आरोपी अमित शहा यांचे वकीलपत्रही जेठमलानी यांनी घेतले होते. त्यांनी आपल्या ९५ वर्षांच्या आयुष्यात असे अनेक खटले लढवले.

हेच जेठमलानी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारात भारताचे कायदेमंत्रीही झाले! मात्र, एवढ्याने जेठमलानी नावाची ही वादळी कहाणी पूर्ण होत नाही. वाजपेयींनी त्यांना कायदेमंत्री पद जरूर बहाल केले होते; मात्र २००४मध्ये वाजपेयी यांच्या विरोधातच लखनौ लोकसभा मतदारसंघातून ते दंड थोपटून उभे राहिले. पराभव अटळ आहे, हे ठाऊक असूनही ते लढले. वाजपेयींना सव्वा तीन लाख मते मिळत असताना स्वत:च्या अवघ्या ५७ हजार मतांचा आकडा फलकावर झळकल्यावरही त्यांच्या दिलखुलास व रंगतदार व्यक्‍तिमत्त्वाचा रंग तसूभरही कमी झाला नव्हता.

वकिली युक्तिवादात ते इतके निष्णात होते, की कायद्याचा कीस काढत प्रतिपक्षाच्या वकिलाला केवळ कपाळावरील घाम पुसण्याचे काम ते बाकी ठेवत. जेठमलानी कुटुंब मूळचे कराचीचे. शाळेत त्यांना दोनदा ‘प्रमोशन’ मिळाले. अवघ्या तेराव्या वर्षी ते मॅट्रिक झाले आणि सतराव्या वर्षी वकील. त्या वयात त्यांनी आपली ‘लीगल फर्म’ स्थापन केली होती. मात्र, फाळणीच्या हिंसाचारात त्यांनी पाकिस्तान सोडले आणि ते दिल्लीत दाखल झाले, तेव्हा त्यांच्या खिशात फक्‍त एक नाणे होते. काही काळ निर्वासितांच्या छावणीत राहून पुढे त्यांनी मुंबई गाठली आणि तेथे अल्पावधीतच वकिलीच्या क्षेत्रात त्यांनी नाव कमावले. मानवी हक्क मोहिमेचे ते पुरस्कर्ते होते. खोटे गुन्हे गुदरलेल्या अनेकांना त्यांनी वाचवले होते. आयुष्याच्या उत्तरार्धात, ‘इतक्‍या गुन्हेगारांचा बचाव तुम्ही इतक्‍या सफाईने कसा करता?’ असे त्यांना एकदा विचारले गेले असता ते म्हणाले होते - कायद्याच्या चौकटीत तो गुन्हेगार ठरायच्या आधी त्याला बचावाची संधी नसते काय?

अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर ‘इंदिरा प्रतिभा प्रतिष्ठान’साठी पदाचा गैरवापर करून देणग्या जमविल्याप्रकरणी भाजपचे रामदास नायक यांनी फौजदारी तक्रार नोंदवल्यावर त्यांनी नायक यांचे वकीलपत्र घेतले. त्या वेळी नामवंत साक्षीदारांच्या नाकात त्यांनी दम आणला होता. पुण्यातील गाजलेल्या मंजुश्री सारडा हुंडाबळी प्रकरणातला त्यांनी आरोपींच्या वतीने केलेला युक्‍तिवाद आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यांच्या निधनाने एक निष्णात कायदेपंडितच नव्हे, तर राजकीय, सार्वजनिक जीवनातले एक वादळी व्यक्‍तिमत्त्व लोपले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com