सागर जैसी आँखोवाला...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

‘चेहरा है या चांद खिला है, जुल्फ घनेरी छांव है क्‍या, सागर जैसी आँखोवाली ये तो बता तेरा नाम है क्‍या’... गिटारवर बोटं फिरवत खट्याळ नजरेने हसत तमाम तरुणाईला घायाळ करणारा ऋषी कपूर आता "कोरोना''नंतरच्या जगात असणार नाही. सिनेसृष्टीत तब्बल चाळीसेक वर्षे सहजी रमलेला हा चिरतरुण अभिनेता अचानक "एक्‍झिट'' घेऊन जाईल असे वाटले नव्हते.

‘चेहरा है या चांद खिला है, जुल्फ घनेरी छांव है क्‍या, सागर जैसी आँखोवाली ये तो बता तेरा नाम है क्‍या’... गिटारवर बोटं फिरवत खट्याळ नजरेने हसत तमाम तरुणाईला घायाळ करणारा ऋषी कपूर आता "कोरोना''नंतरच्या जगात असणार नाही. सिनेसृष्टीत तब्बल चाळीसेक वर्षे सहजी रमलेला हा चिरतरुण अभिनेता अचानक "एक्‍झिट'' घेऊन जाईल असे वाटले नव्हते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दोन दिवसांत दोन सितारे निखळले. बुधवारी इरफान खानने आपली इहलोकातली मुशाफिरी संपवली, गुरुवारची सकाळ उजाडली तीच ऋषी कपूरच्या निधनाची बातमी घेऊन. इरफानप्रमाणे ऋषी कपूरदेखील कर्करोगाशी वर्ष-दीड वर्षे झुंजत राहिले. ही झुंज जिंकल्यागत वावरूदेखील लागले. पण तेवढ्यात "कोविड-१९''च्या भयानक साथरोगाचे तांडव सुरू झाले. अत्र तत्र सर्वत्र मृत्यूच्याच बातम्या येत असताना त्यात या दोघांच्या निधनाच्या वार्ता ऐकाव्या लागल्या, त्या मात्र रसिकांना मुळासकट हादरवणाऱ्या ठरल्या.

ऋषी कपूर हे मूर्तिमंत तारुण्य होते. चित्रपटसृष्टीतला "चॉकोलेट हिरो'' ही त्यांची प्रतिमा अखेरपर्यंत कायम होती. कपूर खानदानाचे वैशिष्ट्‌य असलेला तो देखणा गोरापान चेहरा आणि ठाव घेणारे हसरे निळे डोळे... कॅमेरा जणू या खानदानाचा आशिकच होता. ऋषी कपूर यांना घरी लाडाने "चिंटू'' म्हणत. तेच संबोधन त्यांना कायमचे चिकटले. वयापरत्त्वे चिंटूचा "चिंटूजी'' झाला, इतकेच. बाकी सारे काही तसेच्या तसे ताजेतवाने होते. ऋषी कपूर चित्रसृष्टीत अवतरले, तो जमाना वेगळा होता. अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, धर्मेंद्र अशा "संतप्त'' किंवा बलदंड सिताऱ्यांची चलती सुरू झाली होती. राजेश खन्ना छापाचा मान तिरकी करून अदाकारी करणाऱ्या गोडगोजिऱ्या नायकांचे या दांडगटांपुढे काही चालेनासे झाले. तशा आक्रमक नायकांच्या गदींतही ऋषी कपूर आपल्या चॉकोलेट चेहऱ्यासकट आघाडीवर तळपत राहिले. नायिकेवर बेतहाशा आणि उघड प्रीती करू पाहणारा हा कोवळा तरुण नायक तरुणाईचा प्रातिनिधिक चेहराच होता. ऐंशीच्या दशकात मल्टीस्टारर चित्रपटांच्या लाटा सुरू झाल्या. त्या लाटेतही ऋषी कपूर यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न उपस्थित न करता चित्रपट निवडले, आणि आपली अमिट छापदेखील पाडली. मनमोहन देसाईंच्या मसाला चित्रपटांमध्ये अमिताभला वजनदार भूमिका असे; पण जोडीला ऋषी कपूर असला, की संतुलन पूर्ण होत असे. हा एक फॉर्म्युलाच झाला होता.

ऋषी कपूर यांचा चेहरा इतका राजबिंडा होता, की गरीब, परिस्थितीने नाडलेल्या नायकाची भूमिका त्यांना मिळणे दुरापास्तच होते. तरीही अभिनयात हा सितारा कुठेही उणा पडत नसे. समोर कितीही मोठा सूरमा अभिनेता असला, तरी ऋषी कपूर भाव खाऊन जायचे ते जायचेच.

उतारवयात त्यांनी काही बेजोड भूमिका केल्या. "कपूर अँड सन्स'' या काही वर्षांपूर्वीच येऊन गेलेल्या चित्रपटात त्यांनी जख्ख म्हाताऱ्याचा रोल केला होता. "अग्निपथ''सारख्या सिनेमात खलनायकही रंगवला होता.

"चांदनी''मधला रोहित आठवतोय? "हम दिल्लीवालों के दिल भी बडे होते है'' असे हसतमुखाने चांदनीला सांगणारा अंतर्बाह्य प्रेमात बुडालेला आशिक! किंवा "तय्यब अली प्यार का दुश्‍मन हाय हाय'' असे ठणकावून सांगत त्याच्याच पोरीला पटवणारा "अमर, अकबर, अँथनी'' मधला छटेल अकबर अली! किंवा नजरेला नजर देत बोट रोखून "तुमने कभी किसीसे प्यार किया?'' असा जाहीर सवाल करणारा "कर्ज''मधला मॉंटी! "मैं शायर तो नहीं'' असं म्हणत आपल्या माशुकावर गजल पेश करणारा "बॉबी''मधला कोवळा राजा किंवा आपल्या टीचरकडेच आवेगाने आकृष्ट झालेला पौगंड वयातला राजू...ऋषी कपूर यांच्या जाण्याने चंदेरी दुनियेतली एक अद्‌भुत सफर संपली आहे. अजोड व्यक्तिरेखांची एक झालरदार ओळ संपली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article on rishi kapoor