रस्ते बदनाम हुवे..!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

रस्ते. शहरातले असो वा गावोगावच्या गल्लीतले; माणसांना चालण्यासाठी आणि वाहनांना धावण्यासाठी त्रासदायक ठरू नयेत, अशी किमान अपेक्षा आहे. पण हे रस्ते अलीकडे बदनाम झाले. कधी त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी; तर कधी रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या जाहिरातबाजीच्या फलकांनी. गणेशोत्सवात बाप्पा खड्डे तुडवतच आले आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी हाक ऐकत खड्डे पडलेल्या रस्त्यातूनच गेले. खड्ड्यांना फक्त आश्वासनच पावले. त्यानंतर पुण्यात झालेल्या दुर्घटनेमुळे रस्त्यांच्या कडेला लागलेले बेकायदा फलक चर्चेचे विषय झाले.

रस्ते. शहरातले असो वा गावोगावच्या गल्लीतले; माणसांना चालण्यासाठी आणि वाहनांना धावण्यासाठी त्रासदायक ठरू नयेत, अशी किमान अपेक्षा आहे. पण हे रस्ते अलीकडे बदनाम झाले. कधी त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी; तर कधी रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या जाहिरातबाजीच्या फलकांनी. गणेशोत्सवात बाप्पा खड्डे तुडवतच आले आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी हाक ऐकत खड्डे पडलेल्या रस्त्यातूनच गेले. खड्ड्यांना फक्त आश्वासनच पावले. त्यानंतर पुण्यात झालेल्या दुर्घटनेमुळे रस्त्यांच्या कडेला लागलेले बेकायदा फलक चर्चेचे विषय झाले. जीवघेण्या खड्ड्यातून वाचलेली माणसे आता रस्त्याच्या कडेला असलेले होर्डिंग आपल्या अंगावर तर पडणार नाही ना, या भीतीने धास्तावले आहेत. न्यायालयात या दुर्घटनेच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. बेकायदा फलक शहरांचे विद्रूपीकरण करत आहेत, असे सांगून फलकबाजी करणाऱ्या राजकीय पुढारी आणि कार्यकर्त्यांची नावे सुनावणीदरम्यान न्यायालयाने मागितली आहेत.

स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हेच पुढारी आपलेच शहर विद्रूप करण्यात धन्यता मानताहेत, याचे शल्य समाजमनालाही बोचणारे आहे. नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी समाजहित ओळखूनच स्वतःचा गुणगौरव करावा. नेत्यांना खुश करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देणारे, शहरात आगमनाप्रतीत्यर्थ नेत्यांच्या छायाचित्रांसह स्वत:चे फोटो लावून मिरवणारे कार्यकर्ते आता शहरांतच नव्हे; तर गल्लोगल्ली वाढले आहेत. सण-उत्सवाच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांचीही रहदारीच्या रस्त्यांवरच गर्दी उसळली आहे. हे सारे परंपरेने सुरूच आहे. ही परंपरेची चौकट मोडण्याचे धाडस कुणालाच करावेसे वाटत नाही. वेगळी कल्पकता कुणालाच सुचत नाही. त्यामुळे ही फलकांची गर्दी वाहनचालकांचे लक्ष विचलित करून अपघातांना निमंत्रण देते. त्याही उपर पुण्यात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे हे फलक कोसळणार तर नाहीत ना, अशी धास्ती रस्ते वापरणाऱ्यांच्या मनात दाटली आहे. या फलकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असणारे महानगरपालिक, पालिका, ग्रामपंचायत प्रशासनाचे या फलकांशी कोणते हितसंबंध आहेत, हेही उघड होणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी निवडणुकांसाठी भिंती रंगवल्या जायच्या, त्यावर निवडणूक आयोगाने आचारसंहिता लावून  शंभर टक्के अंकुश मिळवला आणि निवडणुकीच्या काळात विद्रूप होणाऱ्या भिंती स्वच्छ दिसू लागल्या. रस्त्याच्या कडेला, मोठमोठ्या इमारतींवर लागणारे होर्डिंगही शहर कुरूप करताहेत. आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी राजकीय पुढारी आणि कार्यकर्त्यांनी फलक लावण्यापेक्षा रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचे व्रत स्वीकारले तर फलकांमुळे रस्ते बदनाम होणार नाहीत, उलट त्या रस्त्यांना झाडांची सावली मिळेल, त्यासाठी पुढारी म्हणवणाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

Web Title: Editorial Article Road