#यूथटॉक : आमची दुनिया मित्रांची!

रोहन पेंडसे
Saturday, 12 October 2019

आजचा तरुण आपल्या जीवनाविषयीच्या दृष्टिकोनाबद्दल आपल्या अगदी जवळच्या मित्रांना सोडून सहसा बाकीच्यांशी बोलताना सहसा दिसत नाही. तरीही प्रत्येकाच्या मनामध्ये आज एकच विषय डोकावत असतो ः ‘मी आणि माझे उज्ज्वल भविष्य...’

आजचा तरुण आपल्या जीवनाविषयीच्या दृष्टिकोनाबद्दल आपल्या अगदी जवळच्या मित्रांना सोडून सहसा बाकीच्यांशी बोलताना सहसा दिसत नाही. तरीही प्रत्येकाच्या मनामध्ये आज एकच विषय डोकावत असतो ः ‘मी आणि माझे उज्ज्वल भविष्य...’

आम्ही तरुण मुलं अगदी सीरियसली आमच्या भविष्याविषयी विचार करत असतो, पण आमच्या मनात आमच्याविषयी नेमकं काय चाललेलं असतं, याचा कुणी विचार करतं का? किंवा आम्हाला आयुष्यात नेमकं काय हवं आहे, हे कोणी आम्हाला विचारतं का? पालक रेसमधल्या घोड्यांसारखे म्हणजेच जुंपल्यासारखे पहिल्या-दुसऱ्या क्रमांकाची विचारपूस करतात.

आम्ही कोणतीही परीक्षा देवो, कोणत्याही स्पर्धेत भाग घेवो, त्यांचा प्रश्‍न एकच...कितवा नंबर मिळवला? आम्ही त्या परीक्षेसाठी किती तयारी केली, हे कोणी पाहात नाही. त्या विषयातील किती माहिती, किती ज्ञान मिळवले, ते कुणी पाहात नाही. आमच्या पहिल्या-दुसऱ्या क्रमांकाच्या या अनाठायी आग्रहामुळं मला प्रश्‍न पडायला लागतात. मी माझ्या मनाला प्रश्‍न विचारतो, ‘‘माझे आई-वडील कुठे पहिले आले होते?’’ ते त्यांच्या काळात पहिले-दुसरे आलेले नव्हते, तरीही त्यांचं उत्तम चाललंय. मग आमच्याच बाबतीत हा आग्रह का धरला जातो? हे सगळं कशामुळे होतंय ते देवालाच ठाऊक. पण तरुणाईचा विचार करण्याचा कल, त्यांच्या भूमिका या त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबर असतात. त्याचे निर्णय घेणारा तो स्वतःच असतो.

आजची तरुणाई उनाड आहे, असं वारंवार म्हटलं जातं, पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती आहे का, ते आपण तपासून पाहात नाही. तरुण पिढी गॅजेट्‌सच्या आहारी गेली आहे, अशी हाकाटी केली जाते. असे असले तरी लहानपणापासून सर्व गोष्टी तरुणांना मिळत गेल्यामुळे ते तंत्रज्ञानाच्या खूप जवळ गेले आहेत. हे तंत्रज्ञान अंगवळणी पडले असल्याने आम्ही  ते सहजपणे वापरतो.

शिवाय पूर्वीच्या काळात कुटुंबे मोठी होती. त्यामुळे शेअरिंगसाठी काही वेगळे शोधण्याची गरज पडत नसे. आता तसे नाही,त्यामुळे समाजमाध्यमांचा वापर आम्ही जास्त प्रमाणात करतो, हेही लक्षात घ्यायला हवे. दुसरे म्हणजे स्पर्धेत टिकायचे असेल तर तंत्रज्ञानाशी मैत्री करण्याशिवाय पर्याय नाही.

‘मोबाईलपासून लॅपटॉपपर्यंत सर्व काही मिळाल्यामुळे तरुणांना कशाचीही कदर राहिलेली नाही, ते उद्धट झालेले आहेत, एकलकोंडे आहेत.’ अशा प्रतिक्रिया आमच्याविषयी व्यक्त केल्या जातात. या आधुनिक गॅजेट्‌समुळं आम्ही समाजापासून दूर चाललो आहोत, असं मोठ्या मंडळींना वाटतं, पण हा ठपका बरोबर नाही.

आजचा तरुण हा त्याच्या करिअरविषयी, कुटुंबाविषयी, त्याच्या मित्रांविषयी विचार करतो, त्यांच्या भवितव्याबाबत विचार करतो. कदाचित तंत्रज्ञानाच्या विकासाने आज जग जवळ आले आहे, त्यामुळं मुलं दूरचा, समाजाचा विचार करत नाहीत, अशी चुकीची समजूत होत असावी आणि अशा व्यक्त होणाऱ्या भावना या त्याचाच परिणाम असावा. मुलांची कुटुंबाची व्याख्या बदलली आहे. कुटुंबातील आई-वडिलांनंतरची नातेवाइकांची जागा आता त्याच्या मित्रांनी घेतली आहे. मुलांना आपल्या मित्रांबरोबरची स्पर्धा Peer Pressure न वाटता Peer Power वाटते.

आजच्या पिढीला पैशापेक्षा आनंद महत्त्वाचा असल्यामुळे तो आपल्या आवडीनुसार करिअर निवडण्यास प्राधान्य देतो. अमुक एका करिअरमध्ये भरपूर पैसा मिळतो आहे, म्हणून तिकडे जायचे आणि त्या विषयात करिअर करायचं, हे त्याला मान्य नाही. आपला कल कोणत्या विषयात आहे, हे हा तरुण अचूक ओळखतो आणि तिकडे जायचा प्रयत्न करतो. आजच्या तरुणाईला आपल्या कामातून समाधान व ‘सन्मान’ हवा आहे. आपण जे काम करतोय त्या कामामुळे लोकांनी आपल्याला ओळखले पाहिजे, अशी त्यांची इच्छा आहे.

‘Enjoyment` हा आजच्या तरुणाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तरुणाईला जीवनात तेच enjoyment हवे आहे. त्याला भरभरून आनंद लुटायचा आहे, मित्रांबरोबर वेळ घालवायचा आहे. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा मनापासून आस्वाद या तरुणाला घ्यायचा आहे. 

मीच माझे आयुष्य व भविष्य बदलू शकतो, हा विश्‍वास त्याच्यात आहे. या विश्‍वासाला त्याच्या मुसमुसत्या तरुणपणाचे पाठबळ आहे. जग बदलण्याची ताकद, शक्ती आपल्या बाहूंमध्ये आहे, असा आत्मविश्‍वास तो बाळगतो. आहे त्या परिस्थितीला निमूटपणे सामोरे जायचं तो नाकारतो. ॲडजेस्टमेंट करणं त्याला अजिबात पटत नाही. त्याला मुसंडी मारायची इच्छा आतून होते. ते आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक आहेत आणि प्रत्येक तरुण त्यासाठी जीव तोडून प्रयत्न करायला तयार आहे...कारण ः ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हे तो जाणतो.
(लेखक अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहे.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article rohan pendase