वंगभूमीतील विज्ञानोत्सव

सम्राट कदम
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव जो ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल’ (आयआयएसएफ) नावाने ओळखला जातो. यंदाच्या विज्ञानोत्सवाचे आयोजन कोलकात्यातील विश्‍व बांग्ला कन्व्हेन्शन सेंटर, सायन्स सिटी, बोस इन्स्टिट्यूट आणि सत्यजित रे फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट अशा विविध ठिकाणांवर करण्यात आले होते.

वंगभूमीच्या राजधानीत म्हणजे कोलकात्यात ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान पाचव्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 

भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव जो ‘इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल’ (आयआयएसएफ) नावाने ओळखला जातो. यंदाच्या विज्ञानोत्सवाचे आयोजन कोलकात्यातील विश्‍व बांग्ला कन्व्हेन्शन सेंटर, सायन्स सिटी, बोस इन्स्टिट्यूट आणि सत्यजित रे फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट अशा विविध ठिकाणांवर करण्यात आले होते. तीन गिनेस रेकॉर्ड, भव्य विज्ञान प्रदर्शन, आठ देशांचा सहभाग असलेल्या मंत्र्यांची परिषद, ईशान्येकडील राज्यांतील विद्यार्थ्यांचे संमेलन, महिला वैज्ञानिकांचे संमेलन, विज्ञान साहित्य संमेलन, आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव आदी २८ कार्यक्रमांचे आयोजन हे या महोत्सवाचे वैशिष्ट्ये ठरले.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन चारही दिवस जातीने लक्ष घालत होते. पण राज्य सरकारने मात्र याकडे पाठ फिरविली. महोत्सवाचे औपचारिक उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या संबोधनाने झाले. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनातून जरी देशातील विज्ञानाचा भविष्यकालीन वेध घेण्यात आला तरीसुद्धा इंटरनेटद्वारे लाइव्ह सुरू असलेले त्याचे प्रक्षेपण तांत्रिक अडचणींमुळे खंडित होणे हे खचितच भूषणावह नाही. येथील सायन्स सिटीमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि औद्योगिक संस्थांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. सुमारे साडेतीनशे संस्थांचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनाला सुमारे साडेबारा हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली. 

महिला वैज्ञानिकांच्या दोनदिवसीय परिषदेने महोत्सवात आपले वेगळेपण सिद्ध केले. या परिषदेत सर्वांचे लक्ष वेधले ते राजस्थानच्या संतोषदेवी आणि महाराष्ट्राच्या अकोले या आदिवासी तालुक्‍यातून आलेल्या ममता देवराम भांगरे यांनी! एका एकरात पंचवीस लाख रुपयांचे उत्पादन घेणाऱ्या संतोषदेवींची सेंद्रिय शेती सर्वांनाच भावली. ममता भांगरे यांनी पिकांना थेट खत मिळावे म्हणून गांडूळ खताची गोळी करून झाडाच्या बुंध्यापाशी ठेवल्यास उत्पादन कसे वाढते याचे सादरीकरण केले. महोत्सवाला जागतिक पातळीवर नेले ते तीन गिनेस विश्‍वविक्रमांनी! देशभरातील खासदारांनी आपल्या लोकसभा मतदारसंघांतून पाच विद्यार्थी आणि दोन शिक्षकांची विज्ञान महोत्सवात सहभागी होण्यासाठी निवड केली होती. या सहभागी झालेल्या मुलांनी विज्ञानाच्या गावाची म्हणजेच ‘विज्ञान ग्राम’ची निर्मिती केली. विज्ञान महोत्सवाच्या चारही दिवस आंतरराष्ट्रीय विज्ञान साहित्य संमेलनाचे म्हणजेच ‘विज्ञानिका’चे आयोजन करण्यात आले होते. जगभरात विज्ञान लोकांपर्यंत पोचावे यासाठी लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचे, कादंबऱ्यांचे प्रदर्शन तसेच साहित्यिक चर्चांचे आयोजन यात करण्यात आले होते. यालाही  लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article samrat kadam