डाव्यांकडे पुन्हा वळतेय जनमत

पाला विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागण्याआधीचे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिरुअनंतपुरम येथील कार्यालयातील वातावरण.
पाला विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागण्याआधीचे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिरुअनंतपुरम येथील कार्यालयातील वातावरण.

केरळमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी वाहत असलेले वारे आता उलट्या दिशेने वाहू लागले आहे. डाव्यांना लोकसभा निवडणुकीत केरळ राज्यात सत्ताधारी असूनही मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला होता. आता जनमत पुन्हा डाव्यांकडे वळू लागल्याची चिन्हे आहेत. बदलाचे निदर्शक असणारे हे वारे पाला या मतदारसंघातून सुरू झाले आहे. तब्बल चार दशकांनंतर डाव्या आघाडीने हा मतदारसंघ काबीज करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. राज्यात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससाठी ही धोक्‍याची घंटा ठरणार आहे.

केरळमधील पाला विधानसभा मतदारसंघ. गेली चार दशके या मतदारसंघावर डाव्यांना विजय मिळवता आला नव्हता. मात्र, नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत हा मतदारसंघ मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षप्रणित डाव्या लोकशाही आघाडीने (एलडीएफ) ताब्यात घेतला. लोकसभा निवडणुकीत चार महिन्यांपूर्वी केरळमध्ये डाव्या आघाडीला बसलेल्या फटक्‍यानंतर आता हा दिलासा देणारा निकाल आला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील वीसपैकी केवळ एक जागा डाव्या आघाडीच्या पदरात पडली होती. ‘एलडीएफ’मधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मणी सी. कप्पन यांनी पालामध्ये हा अभूतपूर्व विजय मिळविला आहे. चौथ्या प्रयत्नात अखेर मणी हे या मतदारसंघात यशस्वी ठरले. याआधी डाव्यांना १९८० मध्ये पालावर विजय मिळविला, त्या वेळी उमेदवार होते केरळ काँग्रेसचे संस्थापक के. एम. मणी. त्या वेळी आणीबाणीमुळे ते डाव्या आघाडीच्या कंपूत आले होते. त्यांनी १९६५ पासून या वर्षी एप्रिलमध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व राखले. आता हा मतदारसंघ पुन्हा डाव्या आघाडीकडे आला आहे. 

काँग्रेसकडून राहुल गांधी यांना वायनाडमधून उमेदवारी देण्यात आल्याने लोकसभा निवडणुकीवेळी अल्पसंख्याक मते काँग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडीकडे (यूडीएफ) वळली. याचबरोबर शबरीमला मंदिरात १० ते ५० वयोगटातील स्त्रियांना प्रवेश देण्याची घाईघाईने केलेली अंमलबजावणीही जनतेमध्ये रोष निर्माण करणारी ठरली होती. सरकार जर हिंदूंच्या श्रद्धेला जुमानत नसेल तर आपल्या श्रद्धेला कितपत जुमानेल, अशी भीतीही अल्पसंख्याक समुदायामध्ये निर्माण झाली होती. हिंदुत्ववादी शक्तींना काँग्रेस देशपातळीवर उत्तर देईल, असेही त्या वेळी वातावरण होते. मात्र, त्यानंतर काँग्रेसची देशपातळीवर वाताहत झाल्याने केरळमध्ये पक्षाचा जनाधार घसरला आहे. पालामधील विजयाने पुन्हा अल्पसंख्याक मते डाव्या आघाडीकडे वळाल्याचे समोर आले आहे. याचबरोबर शबरीमला प्रवेशामुळे निर्माण झालेला गोंधळा कमी करण्यात सरकारला यश आले आहे. 

केरळमध्ये २१ ऑक्‍टोबरला आणखी पाच विधानसभा पोटनिवडणुका होत आहेत. पालामधील विजयाने डाव्या आघाडीचे मनोधैर्य आणखी उंचावले आहे. वट्टीयूरकवू, कोन्नी, अरूर, एर्नाकुलम आणि मंजेश्वरम या पाच विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत डाव्या आघाडीला फायदा होण्याची चिन्हे आहेत. याचवेळी ‘यूडीएफ’ मात्र या विजयाचे श्रेय डाव्यांना देण्यास तयार नाही. के. एम. मणी यांच्या मृत्यूनंतर केरळ काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष पी. जे. जोसेफ आणि मणी यांचे पुत्र जे. के. मणी यांच्यात पक्षाच्या अध्यक्षपदावरून झालेल्या वादातून कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि याचा फटका बसला, असे ‘यूडीएफ’चे म्हणणे आहे. 

भाजपचा जनाधार घटतोय...
पाला विधानसभा मतदारसंघात २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला २४ हजार ८२१ मते मिळाली होती. आता झालेल्या पोटनिवडणुकीत या मतदारसंघात भाजपची मते कमी झाली आहेत. भाजप उमेदवाराला १८ हजार ४४ मते मिळाली आहेत. याआधी वेंगारा आणि चेंगन्नूर या विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीतही भाजपची मते कमी झाली होती. यामुळे भाजपला राज्यात बस्तान बसविण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागतील, हे निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com