स्वप्नं सुंदर असतात

शेषराव मोहिते
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

स्वप्नं पशू-पक्ष्यांना पडतात की नाही ठाऊक नाही; पण माणसांना पडतात. स्वप्नं पाहण्याची फार मोठी देणगी निसर्गानं माणसांना बहाल केलेली आहे. पुन्हा स्वप्नं कुणी पाहावीत याच्या काही अटीही टाकलेल्या नसतात. तुम्ही एखाद्या महालात जन्मलात, की झोपडीत अथवा रानावनात जन्मलात याच्याशी तुमच्या स्वप्नं पाहण्याच्या वृत्तीला काही देणं-घेणं नसतं. स्वप्नं काही वस्तू नाही, की जी बाजारात जाऊन विकत घेता येईल. माणूस हा मूलतः स्वार्थी आहे आणि त्याचं स्वार्थी असणं हेदेखील नैसर्गिकच आहे.

स्वप्नं पशू-पक्ष्यांना पडतात की नाही ठाऊक नाही; पण माणसांना पडतात. स्वप्नं पाहण्याची फार मोठी देणगी निसर्गानं माणसांना बहाल केलेली आहे. पुन्हा स्वप्नं कुणी पाहावीत याच्या काही अटीही टाकलेल्या नसतात. तुम्ही एखाद्या महालात जन्मलात, की झोपडीत अथवा रानावनात जन्मलात याच्याशी तुमच्या स्वप्नं पाहण्याच्या वृत्तीला काही देणं-घेणं नसतं. स्वप्नं काही वस्तू नाही, की जी बाजारात जाऊन विकत घेता येईल. माणूस हा मूलतः स्वार्थी आहे आणि त्याचं स्वार्थी असणं हेदेखील नैसर्गिकच आहे.

माणूस स्वार्थी नसता तर तो स्वतःच्या प्रगतीच्या, मोठं होण्याच्या, काही तरी जगावेगळं करून दाखविण्याच्या जिद्दीनं पेटलाच नसता. त्यानं केलेली एखादी कृती जगाच्या भल्यासाठी खूप महत्त्वाची ठरलेली असेल; पण ती करण्याच्या प्रेरणेचा उगम तर त्या व्यक्तीनं पाहिलेल्या स्वप्नातच असतो ना! आणि ही स्वप्नं पाहण्याची वृत्ती तर अतिशय व्यक्तिगत, त्याने स्वतःपुरती, स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी अंगीकारलेली असते.

पण या स्वप्नांना वास्तवात उतरविण्यासाठी, त्या व्यक्तीला कोणत्या दिव्यातून जावं लागतं, हे जगाला केव्हा कळतं, तर त्या स्वप्नाची पूर्ती झाली तर. अन्यथा अनेकांनी पाहिलेली अनेक स्वप्नं अर्ध्यातच विरून गेलेली असतात. स्वप्नं पाहणारी आणि स्वप्नं न पाहणारी माणसं, कदाचित असंही माणसांचं वर्गीकरण होऊ शकतं. नेमाडेंच्या ‘हिंदू’तील नायक खंडेराव एके ठिकाणी म्हणतो, ‘‘ज्या शोधाला सुरवातीस वेड्यात काढलं नाही, असा जगात एकही शोध नाही,’’ ही शोधाला किंवा शोध लावण्याच्या स्वप्नांना वेड्यात काढणारी माणसंही नेहमीच जगात बहुसंख्येनं असतात.सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा हे काहीही तुमच्याकडे नाही अन्‌ तरीही तुम्ही स्वप्नं पाहता, तेव्हा तर तुम्हाला वेड्यात काढण्याची एकही संधी जग सोडत नाही.

त्यामुळेच तर अल्बर्ट आईनस्टाईनलादेखील शेवटी म्हणावं लागलं होतं, ‘‘या पृथ्वीतलावर मला जे जे नाकारण्यात आलं, त्याचा शोध मी आकाशातील तारा-तारकांत घेतला.’’

सगळं जग प्रचलित जगरहाटीला धरून वाटचाल करतं, तेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या मागं धावत असता, तेव्हा तुमचं मन मस्त असतं. त्याच दृष्टीनं तुम्ही जगाकडं आणि जगाच्या आंधळ्या व्यवहाराकडं पाहता. पण त्यात शिरून आपलंही कल्याण करून घेण्याचा तात्कालिक मोह टाळण्याची ताकद तुम्हाला, तुम्ही पाहत असलेल्या स्वप्नांनी पुरविलेली असते. कुणी तुम्हाला लाख वेड्यात काढो, तुम्ही त्याची पर्वा करीत नाही. समजा तुम्ही तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी काही एका विशिष्ट मार्गानं वाटचाल करीत आहात, त्यात लिहिणं-वाचणं हे तुमचं सहज जगणं बनून गेलं अन्‌ एखादा म्हणाला, ‘‘काय हो! तुमच्या या लिहिण्या-वाचण्याचा फायदा? मी आत्ता मनात आणलं तर पाहिजे ती गाडी क्षणात खरेदी करू शकतो. तुम्ही करू शकता का?’’ तुम्ही मनात काय म्हणता? ‘अरे! हा माणूस स्वतःलाच किती सहजपणे फसवू पाहतोय. मी पाहिलेल्या स्वप्नांची किंमत याला या जन्मात तरी कळेल का, अन्‌ त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं सुरू असलेला माझा प्रवास किती सुंदर आहे, हे त्याला केव्हा कळेल?’

Web Title: editorial article sheshrao mohite