Shrikrishna-Bedekar
Shrikrishna-Bedekar

इंदूरचे ‘सांस्कृतिक विद्यापीठ’

एका माणसाच्या अंगी एकाच वेळी किती कलांचा संगम असू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण बेडेकर. साहित्यिक, रंगावलीकार, चित्रकार, कवी, गीतकार, संपादक, गायक, हस्ताक्षरपटू, ध्वनिमुद्रिका संग्राहक अशी त्यांची ओळख असून, या कलांसाठी त्यांनी आयुष्य वेचलं आहे. एका अर्थानं ते इंदूरचे ‘सांस्कृतिक विद्यापीठ’ आहेत. पंचाहत्तरीनिमित्त (६ डिसेंबर) त्यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्‍न - मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहून मराठी भाषेची पताका गेली साठ वर्षे तुम्ही एकहाती फडकवत ठेवली, यामागं कोणाची प्रेरणा आहे?   
बेडेकर -
 खरंतर ही स्वयंप्रेरणा म्हणता येईल. माझ्यातील उर्जेचा योग्यप्रकारे वापर कसा करता येईल, या हेतूनेच मी याकडे वळलो. तसेच, पं. कुमार गंधर्व यांच्यासारख्या अनेक व्यक्तींना जवळून पाहिल्यामुळं त्यांच्याकडून बरंच काही शिकता आलं. त्यांच्यापासून प्रेरणा मिळत गेली आणि त्यातूनच गेल्या साठ वर्षांपेक्षा जास्त काळ इंदूरमध्ये विविध कला मी जोपासू शकलो.
    
तुम्ही मूळचे इंदूरचेच की..?  
नाही. मी मूळचा मुंबईचा. मात्र, वडिलांना व्यवसायात तोटा झाला. त्यामुळे त्यांनी आपला बाडबिस्तारा मुंबईवरून इंदूरला हलविल्याने आम्ही तेथे स्थायिक झालो. मात्र, येथे आल्यानंतर आमची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली. त्यातून मी उदरनिर्वाहासाठी अनेक गोष्टी केल्या. हे करताना मराठी साहित्याची आवड वाढत गेली. हस्ताक्षरावरील प्रेम वाढत गेले. गायनातही प्रगती साधली. एकातून एक कला गवसत गेल्या आणि मी त्यात  रमून गेलो.

साहित्यिक, चित्रकार, कवी, गीतकार, संपादक, गायक, हस्ताक्षरपटू, शास्त्रीय संगीताचे जाणकार आदी विविध भूमिका निभावताना ही तारेवरची कसरत कशी साधता? 
जे काही करायचं, ते मनापासून हा माझा पहिल्यापासून नियम आहे. त्यामुळे एकाच वेळी मी अनेक गोष्टी करत असलो, तरी प्रत्येकात समरसून काम करतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीतील आनंद मिळाला. त्यामुळे माझ्यावर कधीच कसलंही दडपण आलं नाही. या विविध भूमिका करताना अनेक अडचणी आल्या. मात्र, त्यातून तावून- सुलाखून बाहेर पडलो.

तुमच्या हस्ताक्षराला पु. ल. देशपांडे यांनी ‘लताच्या आवाजासारखा चमत्कार’ म्हटलं. त्या वेळी तुमच्या भावना काय होत्या? 
पु. ल. देशपांडे यांनी माझ्या हस्ताक्षराचं कौतुक पत्र पाठवून केलं, याचा खूप आनंद झाला. आपण हस्ताक्षराबाबत केलेल्या श्रमाचं चीज झाल्यासारखं वाटलं. त्याचबरोबर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही मी त्यांचे केलेले पोट्रेट खूप आवडले होते. त्यांनी ते घरी नेण्यासाठी मागितले. मात्र, मी नम्रपणे नकार दिला. अशा अनेक थोर व्यक्तींनी माझ्या कलेचं कौतुक केलं आहे. 

कविता व भावगीतांकडे कसे वळलात? 
कवितांची मला आवड होतीच. त्या मी सहजतेनं लिहीत गेलो. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी माझ्या कवितांचे कौतूक केले. ‘अंतर्याम’ हा माझा पहिला काव्यसंग्रह. सुरवातीला मी भावगीतगायन करत असे. त्यानंतर मी स्वतःच भावगीतं लिहू लागलो. याबाबत पं. जितेंद्र अभिषेकी यांनी ‘तुम्ही मराठी कवितांतली गेयता जपली आहे, ती अशीच वाढवा,’ असं म्हटलं. तसेच अरुण पौडवाल, अनिल मोहिले, दत्ता डावजेकर यांनी माझ्या अनेक गीतांना चाली लावल्या, तर प्रभा अत्रे, अरुण दाते यांनी अनेक गीतं गायली आहेत.  
 
‘शब्ददर्वळ’ या दिवाळी अंकाचा जन्म कसा झाला?
इंदूरमधून एखादे मासिक वा दिवाळी अंक काढावा, असं बरीच वर्षं माझ्या मनात होतं. त्याची मुहूर्तमेढ सोळा वर्षांपूर्वी रोवली. त्या वेळी माझं वय ६० होतं. एकट्याच्या बळावर व एका खोलीत बसून मी हा अंक काढतो. ‘सबकुछ मी’ असंच त्याचं वर्णन करावं लागेल. मराठी वाचकांनीही त्याला मोठा प्रतिसाद दिला, ही आनंदाची बाब आहे. 

हे सगळे सुरू असताना मधेच तुम्ही प्रकाशन व्यवसायातही उडी मारली. तो अनुभव कसा होता?
चांगलाच होता. जास्वंदी प्रकाशनाची मी स्थापना करून, त्याद्वारे मी डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंदिशींचं ‘स्वरांगिणी’ हे पुस्तक प्रकाशित केलं. पण मी यावरच थांबलो नाही, तर गावोगावी जाऊन पुस्तकाची विक्रीही केली.  

एवढ्या साऱ्या कला तुम्ही जोपासल्या? अजून काही करायचं राहिलं, असं वाटतं?
अजून खूप काही करायची इच्छा आहे. नवनवीन गोष्टी शिकायच्या आहेत. त्यातील एक म्हणजे मराठी भाषेतील फाँट करायचे आहेत. मात्र, त्यासाठी निधीची कमतरता आहे. या कामासाठी निधी उपलब्ध झाला, तर नव्या उत्साहानं व नव्या उमेदीनं या कामात झोकून देणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com