पहाटपावलं : ठिपक्‍यांची रांगोळी

Sonali-Navangul
Sonali-Navangul

चालणं नेमकं कसं घडतं याचा अनुभवातला भाग मी विसरून गेलेय, असं लक्षात आलं ते स्वागत एका मोबिलिटी ट्रेनिंगविषयी सांगत होता तेव्हा. तर तो एक अंध असणारा तरुण मुलगा बाकी शरीरानं धडधाकट असला तरी चालायला प्रचंड घाबरायचा. समजा उजवं पाऊल पुढे टाकलंय, तर डावं त्याच्याबरोबरीत आणून मग उजवं पुन्हा पुढे टाकायचा. ते खरं चालणं नव्हतं नि खरं चालणं काय हे त्याला कुणी सांगितलंही नव्हतं. त्यामुळं क्रियेचा आनंद व त्यातून मिळणारं आऊटपुटही तितकं सुखकर नसायचं.

श्रम, वेळ अधिकचा खर्ची पडायचा. तेही ठाऊक नव्हतं त्याला. शिवाय असं वेगळं चालणारी माणसं तोल गमावून पडतील किंवा निराळेच अपघात होतील म्हणून लोकही अशांकडे अवघडलेलं बघत राहतात. तर हे लक्षात आल्यावर, स्वागतनं जमिनीवर बसून त्याचं एकेक पाऊल हातानं मागेपुढे करत त्याला अंदाज दिला नि चालणं नेमकं कसं असतं याची संकल्पना त्याला समजली. तोल सावरण्याची किंवा तो जाऊ न देण्याची युक्ती समजली. तासाभरात तो तरतरीत झाला. गोष्ट बारीकशीच होती खरंतर, पण योग्य ठिकाणी काम करणं गरजेचं होतं.

आणखी एक होते साठी उलटलेले गृहस्थ. काही कारणानं त्यांना पूर्ण अंधत्व आलं. मग बायकोच्या मदतीनंच ते बाहेर पडायचे. काहीही झालं तरी उंबऱ्याबाहेर तिची सोबत असायचीच. दहा वर्षे असंच चाललं होतं.

सोबतीसारख्या काही गोष्टी आपण गृहीतच धरलेल्या असतात नि अचानक ती जाते तेव्हा रोजचा दिवसच उलटापालटा होऊन जातो. आपला आजवरचा बाळगलेला आत्मविश्‍वास किती नाजूक होता ते कळतं नि हातपाय डळमळतात. काकांचं तसंच झालं. बायको आजारी पडली, खोलीबाहेर जाणं कठीण झालं तेव्हा लक्षात आलं की मदतीसाठी एकच स्रोत मानला होता नि पर्यायांचा विचार किंवा आपणही पर्याय असू शकतो याचा विचार झालाच नव्हता. स्वागतने त्यांना पांढरी काठी समजावली. दिशा, पावलं मोजणं, भवतालातले आवाज, वास, जमिनीचा उंच-सखलपणा स्वत:त कसा झिरपवायचा, काठीशी संवाद कसा करायचा हे शिकवलं. निर्जीव वाटणाऱ्या पांढऱ्या, चार तुकड्यांत दुमडलेल्या काठीची संवेदनशीलता ‘पाहायला’ लावली. एक दिवस त्या काकांचा स्वागतला मेसेज आला, ‘मी बाहेर पडून दुकानातून अंडी, दूध, ब्रेड आणले. बॅंकेतून पैसे काढले. मेडिकलमधून जरूरीची औषधं आणली. बस प्रवास केला. घरी येऊन मस्त नाश्‍ता स्वत: स्वयंपाकघरात उभं राहून रांधला. फार बरं वाटतंय. फार मोकळं वाटतंय.’
मोकळं, स्वतंत्र वाटण्याची भावना माणसामाणसांनुसार बदलणारी. आपल्या शरीरमनाच्या गुंतागुंतीच्या रांगोळीत नेमके ठिपके जोडून मनाजोगतं चित्रं जोखण्या-रेखण्याची शक्‍यता अमर्याद. - स्वातंत्र्याच्या चवीचा अनुभव गृहीत धरता येत नाही मात्र!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com