मुलांना शिकवू अर्थसाक्षरतेचे धडे

सुहास राजदेरकर
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

आर्थिक नियोजन, टर्म व मेडिकल इन्शुरन्स, योग्य गुंतवणूक आणि इच्छापत्र या चार खांबांवर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा आणि स्वप्नांचा डोलारा उभा राहू शकतो. हे लक्षात घेऊन आजच्या बालदिनानिमित्त पालकांनी संकल्प केला पाहिजे.

आर्थिक नियोजन, टर्म व मेडिकल इन्शुरन्स, योग्य गुंतवणूक आणि इच्छापत्र या चार खांबांवर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा आणि स्वप्नांचा डोलारा उभा राहू शकतो. हे लक्षात घेऊन आजच्या बालदिनानिमित्त पालकांनी संकल्प केला पाहिजे.

चौदा नोव्हेंबर हा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस. त्यांचे स्वप्न होते की देशातील मुलांवर पैशांअभावी शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येऊ नये. नेहरूंचे मुलांविषयीचे प्रेम लक्षात घेऊन त्यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा होतो. ज्याप्रमाणे, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी, प्रत्येकाने किमान एक रोपटे लावण्याची आवश्‍यकता आहे, त्याचप्रमाणे या दिवशी पालकांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतः आर्थिक साक्षर होऊन, मुलांनासुद्धा आर्थिक साक्षर करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. आज देशात आर्थिक साक्षरतेची स्थिती फारशी चांगली नाही. आर्थिक साक्षरता फक्त आठ-दहा मोठ्या शहरांपुरतीच मर्यादित दिसते.

पंतप्रधान जन धन योजनेला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतरसुद्धा आज देशात साधारण वीस कोटी लोकांचे बॅंक खाते नाही आणि ज्यांचे बॅंक खाते आहे, त्यापैकी ५० टक्‍क्‍यांवर खात्यांमध्ये एकही व्यवहार झालेला नाही. केवळ दोन टक्के लोक म्युच्युअल फंड अथवा शेअरमध्ये गुंतवणूक करतात. आर्थिक गुन्हे अर्थात सायबर क्राइमला बळी पडणाऱ्यांची संख्या भयावह आहे आणि दरवर्षी त्याचे प्रमाण दुपटीने वाढते आहे. आर्थिक साक्षरता याचा अर्थ, पैशांशी संबंधित प्राथमिक माहिती व ज्ञान असणे. आर्थिक साक्षरता याचा अर्थ, मुळात उपलब्ध पैशांचे योग्य नियोजन करून ते परिणामकारकरीत्या आपल्या मूलभूत गरजांसाठी कसे वापरता येतील याचे संपूर्ण ज्ञान असणे. थोडक्‍यात, आर्थिक साक्षरता याचा अर्थ पैसे कसे कमवावेत, कसे, कोठे व केव्हा खर्च करावेत, कसे वाचवावेत आणि कसे गुंतवावेत, हे स्वतःला माहिती असणे. तेव्हा भावी पिढी आर्थिक साक्षर होण्यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरता विषय समाविष्ट करण्याची गरज वाटते. मुलांनाही आर्थिक व्यवहाराचे, आर्थिक शिस्तीचे धडे लहानपणापासून शिकविले, तर भावी आयुष्यात त्यांना त्याचा निश्‍चितच उपयोग होईल.

मुलांसाठी गुंतवणूक कोठे करावी?
मुलांकरिता गुंतवणूक हा बहुतेकांचा दीर्घकालीन उद्देश असतो. कारण हातामध्ये दहा ते पंधरा वर्षे सहज असतात. त्यामुळे अशी गुंतवणूक फक्त बॅंक योजनांपुरती मर्यादित न ठेवता, इतर योजनांचाही लाभ घेतला पाहिजे. पीपीएफ, ‘सुकन्या समृद्धी’, तसेच म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजना त्या दृष्टीने उपयुक्त आहेत. इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत यात परतावा अधिक मिळण्याची मोठी शक्‍यता असते. दहा ते पंधरा वर्षे गुंतवणूक व तीसुद्धा ‘एसआयपी’मार्फत केल्याने, ‘इक्विटी’मधील जोखीम मोठ्या प्रमाणात कमी होते. मुले लहान असताना ही गुंतवणूक केली, तर त्यांच्या पदव्युत्तर शिक्षणाकरिता या गुंतवणुकीचा निश्‍चितपणे उपयोग होऊ शकतो.

काय काळजी घ्यावी?
१) योग्य आर्थिक नियोजन करून, मुलांच्या शिक्षणाकरिता किती खर्च येणार आहे हे माहिती करून घ्या आणि त्यानुसार गुंतवणूक करा. उदाहरणार्थ, तुमच्या मुलीचे वय सध्या आठ वर्षे आहे. तिच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी तिच्या वयाच्या २१व्या वर्षी काही खर्च येणार आहे, ज्याची आज किंमत समजा दहा लाख रुपये आहे. त्यामुळे तुम्ही दहा लाख रुपयांची सोय करून चालणार नाही. कारण, चलनवाढ, जी शिक्षणासाठी साधारण दहा टक्के आहे, गृहीत धरली तर शिक्षणासाठी तिला साधारणपणे ४२ लाख रुपये लागतील. साधारणपणे ८५०० रुपये दरमहा ‘एसआयपी’द्वारे इक्विटी म्युच्युअल फंड योजनेत तेरा वर्षे गुंतविले आणि दरवर्षी बारा टक्के परतावा गृहीत धरला, तर हे उद्दिष्ट सहज शक्‍य होऊ शकेल. यासाठी ‘सुकन्या समृद्धी’ आणि ‘पीपीएफ’ योजनांचासुद्धा लाभ घेता येईल.

२) गुंतवणुकीची सुरुवात लवकर शक्‍यतो, मुलांच्या जन्मापासूनच करा.

३)  ‘मुलांकरिता’ असे शब्द असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांचा सावधपणे नीट अभ्यास करा. कारण शक्‍यतो या विमा किंवा बॅलन्स्ड योजना असतात. परंतु, तुमच्याकडे गुंतवणुकीचा भरपूर काळ असल्याने, म्युच्युअल फंड इक्विटी (डायव्हर्सिफाइड) योजना  अधिक चांगला परतावा देऊ शकतील.

४) मुलांच्या शिक्षणाकरिता सुरू केलेल्या गुंतवणूक योजनांचे पैसे इतर कोणत्याही कारणांसाठी वापरू नका. बरेच वेळा असे दिसते, की मुलांना उपयोग होईल किंवा मुलांची आवड आहे असा गोड गैरसमज करून घेऊन स्वतःची नवी गाडी घेण्याची हौस भागविली जाते.

५) अशी शिस्त पाळणे जमणार नसेल, तर मात्र म्युच्युअल फंडांच्या मुलांसाठी असलेल्या योजनांमध्ये पैसे गुंतवा. कारण त्या गुंतवणुकीला ‘लॉक इन’ काळ असतो.

६) मुलांसाठी असलेली गुंतवणूक, शक्‍यतो त्यांच्याच नावावर करा. त्यासाठी त्यांचा फक्त जन्मदाखला लागतो. बाकी कागदपत्रे आई किंवा वडिलांची चालतात. बॅंक खाते मात्र लहान मुलांचे असले पाहिजे, ज्यात पालक म्हणून आई किंवा वडिलांचे नाव असते. महत्त्वाचे म्हणजे ही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला घ्या, जेणेकरून, योग्य योजना निवडल्या जातील आणि मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article suhas rajderkar