सामंजस्याच्या ग्वाहीची खोली किती?

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.

चीनला अमेरिकेवर मात करायची आहे. अमेरिकेच्या चीनविरोधी व्यूहापासून भारताला रोखण्याचेही त्याचे उद्दिष्ट आहे. भारताचे बळ वाढू नये म्हणून पाकिस्तानसह शेजारील देशांमार्फत जखडण्याचे चीनचे डावपेच आहेत. त्यामुळेच एकमेकांच्या संवेदनशील मुद्द्यांवर सामंजस्याचे आवाहन हे फसवे ठरते.

प्रेम आणि मैत्रीचा मार्ग पोटातून जातो, असे म्हटले जाते. भारावून टाकणारे आतिथ्य आंतरराष्ट्रीय व्यवहारात सलोख्याची हमी देत नाही. दुसऱ्या महायुद्धाआधी ब्रिटन आणि रशियाने जर्मनीशी जुळवून घेतले होते. परंतु तो तह टिकला नाही. भारत आणि चीन या दोन देशांचे हितसंबंध, उद्दिष्टे परस्परांना पूरक न राहता छेदणारे असतील तर मेजवान्या आणि पाहुणचार निरर्थक ठरतो. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि त्यांच्या शिष्टमंडळाला दिलेल्या मेजवानीतील खाद्यपदार्थांची यादी वाचून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. परंतु चीनचा आजवरचा इतिहास बघता त्यांची भारताबाबतची धोरणे खऱ्या अर्थाने सकारात्मक होण्याची हमी नाही. अमेरिकेपासून पाकिस्तानपर्यंतच्या नेत्यांना जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आंब्याच्या पेट्या पाठवीत. नरेंद्र मोदींनी नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला अनाहूत हजेरी लावली होती. पुढे काय झाले ते सर्वांनीच पाहिले आहे.

नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यातील अनौपचारिक चर्चेची पहिली फेरी चीनमधील वुहान येथे झाली. नुकतीच झालेली महाबलीपुरमची भेट दुसरी होती. पहिल्या चर्चेला डोकलाममधील चिनी लष्कराच्या घुसखोरीचा संदर्भ होता. ७३ दिवसांनंतर उभय सैन्य मागे गेल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात चीनने त्या परिसरातील आपली ठाणी आणखी मजबूत केली.

अरुणाचलमधील तवांगवर चीनचा दावा आहे. या राज्यातील सीमा ओलांडून चीनचे लष्कर रस्ते बांधत असल्याचे भाजपच्या खासदारानेच म्हटले आहे. भारतीय लष्कराने मात्र त्याला दुजोरा दिलेला नाही. ‘घरमें घुसकर मारेंगे’ असे पाकिस्तानला इशारा देणाऱ्या भारतीय नेत्यांनी चीनच्या घुसखोरीबाबत मात्र मिठाची गुळणी धरणे ही कमजोरीची कबुली ठरते. वुहान चर्चेनंतर चीनच्या भारतविरोधी भूमिकेत सकारात्मक बदल दिसलेले नाहीत. मौलाना मसूद अझरवरील संयुक्त राष्ट्रांच्या कारवाईत चीनने अखेरपर्यंत अडथळे आणले. आण्विक पुरवठादार संघटनेच्या (एनएसजी) सदस्यत्वाच्या भारताच्या प्रयत्नांना चीनने विरोध करणे थांबलेले नाही. राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या कायम सदस्यत्वासाठी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स व रशिया हे इतर चारही कायम सदस्य भारताला अनुकूल असूनही चीन बोलत नाही.

जम्मू-काश्‍मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या भारताच्या निर्णयावर चीनने केवळ पाकिस्तानची बाजूच घेतली नाही, तर लडाख केंद्रशासित प्रदेश करण्यासही आक्षेप घेतला आहे. भारतात येण्याआधी शी जिनपिंग यांनी इम्रान खान यांच्याशी बीजिंगमध्ये झालेल्या भेटीत कोणत्याही परिस्थितीत चीन पाकिस्तानच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील, अशी ग्वाही दिली. चीनची परराष्ट्र व संरक्षणविषयक धोरणे ‘वेदर कॉक’सारखी क्षणाक्षणाला बदलत नाहीत. आधुनिक चीनच्या स्थापनेपासूनच (१९४८) माओ, चौ एन लाय, दंग ज्याव फिंग ते शी जिनपिंग असे भिन्न शैलीचे नेते सत्तेवर आले. परंतु त्यांची ‘ब्लू प्रिंट’ बदललेली नाही. महाबलीपुरममधील सहा तासांच्या चर्चेत शी जिनपिंग यांचा सामंजस्याचा सूर राहिला असला, तरी प्रत्यक्षात त्यांची पावले कशी पडतील, हे पाहावे लागेल.

राजनैतिक शिष्टाचाराचे अवडंबर बाजूला सारून अनौपचारिकपणे भूमिकांची देवाणघेवाण होण्यासाठी दीपविणाऱ्या नेपथ्याच्या पार्श्‍वभूमीऐवजी गृहपाठाची गरज असते. दोन देशांचे नेते चर्चेला बसतात तेव्हा साध्य काय करायचे, तडजोड कुठवर करायची याची पक्की बांधणी असते. संवादात संयम, सावधपणा असतो. मुत्सद्देगिरीत भाबडेपणा, भावनेला स्थान नसते. चीन आणि भारत या दोन्ही देशांची लोकसंख्या सव्वाशे कोटींच्या वर असली आणि दोन्हींना जुना ऐतिहासिक वारसा असला, तरी चीनने गेल्या चाळीस वर्षांत मिळविलेले सामर्थ्य लक्षात घेता त्यांना भारताचे भय वाटत नाही.

आंतरराष्ट्रीय संबंधातील उच्चस्तरीय चर्चा, वाटाघाटीतील सर्वच बाबी उघड केल्या जात नाहीत. परंतु, अशा भेटीअखेर जाहीर होणाऱ्या निवेदनात मोघमपणा ठेवला जातो. नाजूक अडचणीच्या मुद्द्यांवर आपल्याला सोईचा अन्वयार्थ सांगितला जातो. चीनमधील एकाधिकारशाही राजवटीला त्याचीही गरज नसते. भारत-चीन संबंधाची घसरण रोखण्यासाठी मोदी-शी जिनपिंग चर्चा कितपत उपयोगी ठरली, याचा विचार आवश्‍यक आहे. चीनने १९६८च्या युद्धात अक्‍साई चीनसह ईशान्येत भारताचा बराच मोठा टापू बळकावला आहे. उभय देशांतील सीमानिश्‍चितीसाठी चर्चेच्या २२ फेऱ्या झाल्या, नकाशांची देवाणघेवाण झाली. परंतु हे काम पूर्ण करण्यात चीनला रस नाही. भारतीय प्रदेशावरील दावा त्यांना गमवायचा नाही. 

ईशान्य भारतातील बंडखोरीला चीन आता उघडपणे पाठिंबा देत नसला, तरी काश्‍मीर प्रश्‍नावर तो पाकिस्तानच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. दक्षिण आशियातील भारताचे मध्यवर्ती स्थान व शेजाऱ्यांवरील प्रभाव कमजोर करण्यासाठी चीन पाकिस्तानद्वारे होणारा उपद्रव संपवू इच्छित नाही.

भारताची राजकीय, आर्थिक व सामरिक कोंडी करण्यासाठी पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मालदीवमध्ये गुंतवणुकीद्वारे चीन सक्रिय आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सिपेक) आणि ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ या चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला भारताने घेतलेली हरकत शी जिनपिंग यांना मानवलेली नाही. चीनची तिबेटवरील मालकी, ‘वन चायना पॉलिसी’ (चीन आणि तैवान एकच देश) भारताने नाकारलेली नाही. दक्षिण चीन समुद्राच्या ९० टक्के टापूवरील चीनचा दावा अमेरिका, जपानसह भारताने मान्य केलेला नाही. हिंद महासागर - प्रशांत महासागर टापूतील पाच हजार अब्ज डॉलरच्या मालाची सागरी वाहतूक अनिर्बंध चालावी, या भूमिकेला भारत बांधील आहे. चीनच्या सामरिक महत्त्वाकांक्षेला रोखण्यासाठी भारताने अमेरिकेशी लष्करी, राजकीय भागीदारी पत्करली आहे.

भारत-चीन व्यापारातील ६० अब्ज डॉलरची दरी मिटविण्याबाबत चीन प्रामाणिक नाही. आताच्या चर्चेत तो प्रश्‍न हाताळण्यासाठी कार्यकारी गट स्थापन करण्यात आला असला, तरी त्यातून भारताच्या हाती फार काही लागणार नाही. अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा भारत लाभ उठवू शकतो, हा भ्रमही त्यांच्यातील ताज्या समेटामुळे दूर झाला आहे. आशिया-प्रशांत टापूत अमेरिकेच्या सहकार्याने आपल्याला शह देण्याच्या मोहिमेतून भारत अलिप्त राहावा, यासाठी शी जिनपिंग हे सलोख्याचा, सहकार्याचा सूर लावीत असले, तरी चीनला २०५० पर्यंत जगातील एकमेव महासत्ता करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यातील अडथळे ते निश्‍चितपणे मोडून काढतील. चीनला शांतता, सहकार्य व सहजीवन हवे असते, ते स्वतःच्या शर्तीवर.

पाच हजार वर्षांत चीनमध्ये अनेक साम्राज्ये झाली. तेव्हापासूनच चीन स्वतःला जगाचे केंद्र मानीत आला आहे. माओ-दंग ते शी जिनपिंग या नेत्यांनी जगाची फिकीर कधीच केली नाही. आर्थिक सुधारणांद्वारे देशाचे औद्योगिक, राजकीय व लष्करी सामर्थ्य बिनतोड होईपर्यंत  शेजाऱ्यांबरोबरील वाद चिघळू द्यायचे नाहीत, हे दंग ज्याव फिंग यांचे धोरण पुढे चालू आहे. बळाचा वापर करून तैवान ताब्यात घेण्याच्या धमक्‍या दिल्या जात असतात. ‘दलाई लामांचा वारस आम्ही नेमू,’ असे भारतालाही बजावले जाते. धार्मिक पाखंड रोखून वैज्ञानिक प्रगतीद्वारे अमेरिकेला शह देणारे तंत्रज्ञान हस्तगत करण्याची जिद्द ठेवून चीनची वाटचाल सुरू आहे. त्यांची राजकीय, आर्थिक, लष्करी उद्दिष्टे स्पष्ट आहेत. त्यात ‘पर्सनल केमिस्ट्री’द्वारे बदल घडविण्याचा विचार हा भाबडेपणाच ठरतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com