अभ्यासक्रमात मराठीचे स्थान दुय्यम का?

मराठी भाषा आज मंत्रालयात ‘राजभाषा’ म्हणून प्रस्थापित झालेली असेल; पण तिला मखरात बंद करून किंवा केवळ कागदावर तिचे गोडवे गाऊन ती समाजात उभी राहू शकेल का?
ravindra shobhane
ravindra shobhanesakal

अमळनेर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश.

मराठी भाषा आज मंत्रालयात ‘राजभाषा’ म्हणून प्रस्थापित झालेली असेल; पण तिला मखरात बंद करून किंवा केवळ कागदावर तिचे गोडवे गाऊन ती समाजात उभी राहू शकेल का? सरकार मराठी विषयाच्या संबंधाने आदेशावर आदेश काढत असताना मराठीची गळचेपी कोण करतं, हेही तपासून पाहणं गरजेचं झालं आहे.

मराठी माध्यमांच्या शाळा धडधड बंद पडत आहेत. सोळा हजार मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडल्याचा आकडा आहे. श्री. म. माटेंनी जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वी एक इशारा देऊन ठेवला होता- ‘देश म्हणजे देशातील दगड धोंडे नव्हेत, तर देशातील माणसे होत.’ आणि या देशातील माणसांचा विसर आपल्याला पडणे यासारखे अक्षम्य असे दुसरे काही नाही.

आज राज्यातील प्राथमिक शाळा वाचविणे, त्यासाठी वेगळा कृतिआराखडा निश्चित करणे अधिक महत्त्वाचे आहे. मराठी भाषेचे अध्ययन केवळ प्राथमिक किंवा माध्यमिक-उच्च माध्यमिक स्तरावरच राहू नये तर मराठी हा विषय पदवी परीक्षेपर्यंत सर्वच शाखांमधून शिकवणे आवश्यक करणे ही सरकारची जबाबदारी आहे. आज मराठी भाषेचे अध्ययन आणि अभ्यासक्रम सुमार झालेले आहे आणि याला विद्यापीठीय अभ्यासमंडळे जबाबदार आहेत.

सुलभीकरणाच्या प्रयत्नात केवळ वरवरची अशी क्रमिकपुस्तके तयार करून किंवा निवडून आपण मराठीचा उद्धार करतो,अशी धारणा आज झालेली आहे. ती बदलणे गरजेचे आहे. गावखेड्यातील गरिबांच्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी हा भाषाभ्यासाचा क्रम बदलून तो मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा असावा.

राजभाषा म्हणून आपण ज्या मराठीचे प्रासंगिक गोडवे गातो, त्या भाषेला अभ्यासक्रमांत दुय्यम, तिय्यम स्थान देणे ही आपल्या भाषाविषयक उदासीनतेची साक्ष देणारी गोष्ट आहे. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी अशी भावना सगळ्या मराठी जनतेची आहे. तिला ज्ञानभाषा करण्यासाठी सर्वप्रथम शासकीय स्तरावरूनच प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे.

सरकार कालचे असो की आजचे. पक्ष कुठलाही असो; पण आज सरकारी शिक्षणक्षेत्राचे चित्र पाहता प्रचंड निराशा पदरी पडते. आज उच्च महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी उच्चशिक्षित, संपूर्ण अर्हता असलेल्या उमेदवाराला डोनेशन म्हणून लाखो रुपये द्यावे लागतात. यावर कुणाचा अंकुश आहे? शिक्षणाचा बाजार करणारी मंडळी शिक्षणव्यवस्थेच्या केंद्रस्थानी बसलेली आहेत.

जो डोनेशन देऊ शकतो तो प्राध्यापक होतो आणि ज्यांच्याजवळ पैसा नाही अशी हुशार, प्रतिभासंपन्न तरुण-तरुणी खासगी महाविद्यालयात दहा हजारांवर नोकऱ्या करीत आहेत. हे चित्र कधी बदलणार आहे ? आज आपण शिक्षणाच्या गुणवत्तेच्या स्खलनावर चर्चासत्रांतून तावातावाने बोलतो. पण पुढे काय? सरकार यावर कोणती उपाययोजना करेल ? हा विषय साहित्याचा, कलाकृतीचा शोकात्म विषय आहे. सुशिक्षित तरुण-तरुणी उद्या आत्महत्या करू लागलीत तर त्याचे खापर कुणाच्या माथ्यावर फोडायचे?

वास्तव आणि यूटोपिया

साहित्याने काळासोबत चालावे असे म्हटले जाते. अर्थात यात दोन प्रकार संभवतात. पहिला म्हणजे अगदी समकालीन, वर्तमानकालीन समाजवास्तव रेखाटणारे साहित्य आणि दुसरा प्रकार म्हणजे बदलत्या काळाचा, वर्तमानाचा विचार न करता मानवी नात्यातील सनातन मूल्ये आपल्या प्रकृतीने मांडणारे लेखन. अर्थात समकालाचे, वर्तमानाचे साहित्यात चित्रण करताना मानवी नात्यातील सनातन मूल्ये येत नाहीत, असेही कुणी समजू नये.

पण काही लेखक समाजातल्या बदलांकडे, परिवर्तानांकडे, वृत्यंतरांकडे-स्थित्यंतरांकडे पूर्णतः पाठ फिरवून लेखन करीत असतात. अर्थात अशा लेखकांचे लेखन कमअस्सल असते असेही मानता येणार नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर मराठी कथेचा मानबिंदू समजले जाणारे जी. ए.कुलकर्णी, चिं. त्र्यं. खानोलकर, ग्रेस ही मंडळी या दुसऱ्या प्रकारच्या लेखन करणाऱ्या मंडळीत येतात.

समाजात बऱ्या वाईट घटना घडताना या लेखकांनी आपल्या डोळ्यांवर जणू कातडे ओढलेले असते. ते स्वतः संवेदनशील असतानाही त्यांच्या संवेदना समाजातील कुठल्याच घटनेने जाग्या होत नाहीत. त्यांचा विश्वास या अशा वास्तव जगातील घटनांपेक्षा आपल्या आंतरिक बळावर अधिक असतो. दैवावर, नशिबावर, नियतीवर त्यांची भिस्त अधिक असते.

आपण या प्रचंड, महाकाय शक्तीच्या हातातील बाहुले आहोत आणि त्या शक्तीच्या बळावर आपण खेळवले जातो अशी या प्रतिभावंतांची धारणा असते. त्यामुळे ते या असल्या स्थितिशील जीवनानुभवाच्या चित्रणात रंगून जातात. त्यांच्या लौकिक जगण्याला या असल्या व्यावहारिक जगातील घटनांनी काहीही इजा होत नाही, असे मानावे लागते.

दुष्काळ,अवर्षण,अतिवर्षण,युध्द,महामारी या अशा वर्तमानकालीन घटनांशी त्यांना काहीही देणे घेणे नसते. त्यामुळे हे लेखक जनमानसात आदरणीय, लोकप्रिय असले तरी ते आपण फार फार तर मखरात, देव्हाऱ्यात बसवून ठेवतो. त्यांचा चाहता वर्ग वेगळा असतो.

कदाचित त्यांच्या शब्दसामर्थ्याने, शब्दप्रभुत्वामुळे ते वाचकांवर गारुड करतात. उदा. ग्रेसची कविता आपल्याला फारशी कळलेच, हे सांगता येत नाही. उदाहरणच घ्यायचे झाले तर पुढील कवितेचे घेता येईल - भूलभिंगरी नदीकिनारी उत्तररात्री मला दिसे जळात अपुले पातळ सोडून वाऱ्याला ती गाव पुसे आता या कवितेतून अर्थ काढतांना भल्याभल्यांना चक्रावल्यासारखे वाटते; पण अर्थ कळला नाही.

तरी ती कविता आपल्या नजाकतीने, प्रभावाने आपल्याला खेचून घेते. ही मंडळी अनुकरणासाठी कठीण असतात. कारण त्यांच्या लेखनावर त्यांची त्यांची नाममुद्रा उमटलेली असते. ती अनुववंशहीन असते. त्यामुळे नवे लेखक त्यांच्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करू लागले तरी पाच दहा पावलातच ते माघारी वळतात, हेही तेवढेच खरे.

कालातीत आशय

याउलट सामाजिक परिवर्तनाच्या अंगाने, स्थित्यंतरांच्या दिशेने जाणारी मोठी परंपरा मराठी साहित्यात आहे. या लेखनाची परंपरा मराठी साहित्यात पूर्वापार, प्राचीन अशी आहे. आणि आपण आपल्या लेखनासाठी सातत्याने नव्या नव्या विषयांच्या शोधात असतो. या लेखनाला दुसरे नाव समस्याप्रधान लेखन असेही आहे. उदा. गोविंद बल्लाळ देवलांचे ‘शारदा’ हे नाटक.

एखादा नवा विषय आपल्या लेखनातून येत असेल आणि त्या लेखनाकडे आधी वाचकांचे, जाणकारांचे लक्ष जात असेल तर ते विषयाच्या नावीन्यामुळे. पण एवढ्यावरच ते लेखन महत्त्वाचे ठरत नाही. त्या लेखनाची प्रकृती सांगणारे ते एक वैशिष्ट्य ठरते. त्यापलीकडे ते टिकते ते त्यातील मानवी जीवनातील मूळ वृत्ती-प्रवृत्तींच्या दर्शनामुळे .कालातीत आशयामुळे.

ती त्या त्या काळातली समस्या असली तर त्यातील व्यक्तींचे वर्तन, नातेसंबंध, बदलते आस्थाबंध या गोष्टी कालातीत होऊन जातात. म्हणूनच या लेखनाला महत्त्व असते. उदाहरणार्थ व्यंकटेश माडगूळकरांची ‘बस सर्व्हिस’ ही कथा घेऊ. या कथेवर माडगूळकरांनी ‘तू वेडा कुंभार’ हे नाटकही लिहिले आहे.

यात गावात बस सुरू झाल्यानंतर बदलू लागलेल्या मूल्यांची, होऊ लागलेल्या वाताहतीची आणि मानवी स्वभावातील आसक्ती-लोभाची वेगळ्या पातळ्यांवरून येणारी प्रचीती ही काही त्या काळापुरती सीमित नसते. तर ती प्रातिनिधिक, सार्वकालिक ठरते.आणि स्वातंत्र्यानंतर बदलत्या सामाजिक संदर्भातील झालेले लेखन महत्त्वाचे लेखन म्हणून गणले जाते.

राजकीय, सामाजिक परिस्थिती बदलली की माणसांची मूल्येही बदलतात. हिंदी साहित्यातील एक कादंबरीकार फणीश्वरनाथ रेणू यांची ‘मैला आंचल’ ही कादंबरी त्यादृष्टीने भारतीय साहित्यात मैलाचा दगड म्हणून गणली जाते. मराठीत फारशी चर्चा न झालेली वसंत वरखेडकर यांची ‘प्रतिनिधी’ ही कादंबरीही या दृष्टीने तपासून पाहता येईल. किंवा त्र्यं. वि. सरदेशमुखांची ‘डांगोरा एका नगरीचा’ या कादंबरीचाही उल्लेख राजकीय रूपक म्हणून विचारात घेता येईल.

राजकीय रूपकाचा मराठी साहित्यात झालेला प्रयोग फार मोठा नसला तरी तो काही उदाहरणांच्या दृष्टीने फार अर्थपूर्ण आहे, असे म्हणावे लागेल. या प्रयोगाचे एक ताजे उदाहरण म्हणजे नागनाथ कोत्तापल्ले यांची अगदी नव्याने आलेली ‘काल- त्रिलाक’ ही बृहद कादंबरी. या कादंबरीत कोत्तापल्लेंनी वापरलेले राजकीय रूपक अधिक अर्थपूर्ण असे आहे.

राजेशाही, घराणेशाही, धर्मांधसत्ता, राजकीय प्रभुत्वाच्या सातत्यासाठी केला जाणारा धर्माचा आणि दंडशक्तीचा वापर आणि त्या सगळ्या काळाचा, सामान्य जनतेचा लोकशाही मूल्यांच्या अंगाने होऊ लागलेला प्रवास याचे अतिशय वेधक आणि प्रातिभ पातळीवरील श्रेष्ठत्वाकडे जाणारे चित्रण मुधोळ संस्थानाच्या माध्यमातून त्यांनी उभे केले आहे.

ही कादंबरी वाचताना सातत्याने समकालीन राजकीय परिप्रेक्ष्य समोर उभे राहते. साहित्यात जीवनविषयक गंभीर दृष्टिकोन आणि कालातीत आशय किती आहे, यालाच अधिक महत्त्व असते. कलाकृती ही नव्या किंवा जुन्या विषयावरील आहे यापेक्षा ती कोणता आशय मांडते, याला अधिक महत्त्व आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com