
From Bombings to Boundaries: Cricket, Afghanistan's Unbreakable Spirit
Sakal
युद्ध, दहशतवाद आणि दारिद्र्याने दीर्घकाळ होरपळत असलेल्या गांधार देशीचा अंधार दूर होईल का, हा प्रश्न केवळ दक्षिण आशियाच्या दृष्टीनेच नव्हे, तर जगाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. गेल्या चार दशकांत दोन महासत्तांनी या भूमीवर आक्रमण केले; परंतु त्यांचीही दमछाक झाली. इथली दुर्गम, डोंगराळ अशी भौगोलिक परिस्थिती, चिवट आणि लढाऊ वृत्तीच्या टोळ्या आणि त्यांची गनिमी काव्याने लढण्याची पद्धत यांमुळे बलाढ्य देशांनाही तेथून काढता पाय घ्यावा लागला. परंतु या सगळ्या काळात देश म्हणून जी वाताहत झाली, त्यामुळे राष्ट्रजीवनाची विविध अंगे विकसित झाली नाहीत. सर्वसामान्य माणसांचे जीवनही हलाखीचे झाले. तालिबान सत्तेवर आल्यानंतर सामाजिक जीवनही झाकोळले गेले. देशाचे एकाकीपण आणखी ठळक झाले. अशा परिस्थितीत एक प्रकारचे वैफल्य त्या देशाला ग्रासून टाकण्याचा धोका असतो. भारताने त्या देशाला विविध प्रकारे केलेल्या मदतीचा मुद्दा यासंदर्भात फार महत्त्वाचा ठरतो.