

From Diwali Smoke to Plastic Scourge: Why India's Pollution Problem Persists Annually
Sakal
दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्याला प्रदूषणाची आठवण झालेली आहे. हवा अत्यंत वाईट दर्जाची झाली असून त्यापासून सर्वच जीवसृष्टीला धोका आहे, हे वाक्य एका सुविचाराप्रमाणे आपण ऐकत आहोत. दिल्लीची हवा अतिप्रदूषित झाली; तर त्यामागोमाग मुंबईची हवा बिघडली आहे. गणेशोत्सवात जशी पाणी, ध्वनिप्रदूषणाची आठवण होते, तशी आता दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची चर्चा रंगू लागते. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे त्यावर गांभीर्याने उपाय करण्याची गरजही तेवढाच काळ व्यक्त केली जाते. याची चर्चा करण्याचे कारण म्हणजे यंदाही सर्वाधिक पैसा फटाक्यांवर उधळल्याचे वृत्त सगळीकडे झळकले. तिकडे शिवकाशीत व्यापाऱ्यांनीही म्हणे सर्वाधिक कमाई केल्याचा आनंद साजरा केला. दिवाळी उत्सव असल्याने त्यांनाही बरकत आली याचा आनंद होणारच. दिल्लीत पूर्वी म्हणे शेतकरी काडीकचरा जाळतात म्हणून हवा दूषित होते. मग त्यावर बंदी आणली गेली. यंदा तर म्हणे हरित फटाके वाजविण्यास परवानगी देण्यात आली. मग हवा बिघडली कशी, हे असे प्रश्न आपल्याला दरवर्षी पडतात आणि आपण तीच चर्चा करीत राहतो. बाकी हवा तशीच, त्यामागची कारणे तशीच आणि उपाययोजनांबाबत फक्त प्रश्न आणि प्रश्नच.