अग्रलेख : उडत्या अफवांची लागणही रोखा

अग्रलेख : उडत्या अफवांची लागणही रोखा

‘बर्ड फ्लू’च्या मानवी संसर्गाचा शास्त्रीय पुरावा अद्याप कोठेही आढळलेला नाही. या रोगाच्या स्वरूपाबाबत आणि फैलावाबाबत योग्य ती माहिती देण्याची गरज आहे.‘बर्ड फ्लू’ला आळा घालण्याइतकेच अफवांच्या संसर्गाला आळा घालणेही महत्त्वाचे. 

कोरोनाचे संकट आटोक्‍यात येईल, असे वाटत असतानाच बर्ड फ्लूच्या फैलावाने नवे संकट ओढवल्याचे दिसते. मात्र अशा प्रकारच्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना करता येतो, हे लक्षात घेऊन याविषयी घबराट निर्माण होणार नाही, याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. सध्या कोणत्याही घटनेविषयी अफवांचा संसर्ग फार झपाट्याने पसरतो. बर्ड फ्लूला आळा घालण्याइतकेच या संसर्गाला आळा घालणेही आवश्‍यक आहे. भारतातील पोल्ट्री उद्योगाने अनेक आव्हानांना तोंड दिले आहे. वातावरणातील बदल, मागणीतील चढ-उतार, वाहतुकीतील अडथळे, कच्च्या मालापासून सरकारच्या सवलती अशा अनेकानेक समस्यांना त्याने तोंड दिले आहे. कोरोनाने तर त्याचे अक्षरक्षः कंबरडे मोडले. चिकन, अंडी खाल्ली तर त्यातून कोरोनाच्या विषाणूचा प्रसार होवून त्याची बाधा होते, अशी आवई उठली. खप कोसळला. पोल्ट्री उद्योग जमीनदोस्त होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. अंडी, तयार पक्षी (ब्रॉयलर) फुकट वाटून चालकांनी पोल्ट्रीशेड रिती केली. अनेकांचे दिवाळे निघाले. हातावर पोट असलेल्या या क्षेत्रातील अनेकांचा रोजगार सुटला. तथापि, कोरोनावर पोल्ट्रीच्या सेवनाने मात करता येते हे पटल्याने मागणी वाढली. या उद्योगाचे गाडे गेल्या दोन महिन्यांत रूळावर येत असतानाच बर्ड फ्लूने हिवाळ्यात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांद्वारे मागच्या दाराने भारतात प्रवेश केला. सुरवातीला राजस्थान, हिमाचल प्रदेश, केरळ या राज्यात त्याच्या पाऊलखुणा दिसू लागल्या. पाठोपाठ त्याने आता महाराष्ट्रासह शेजारील गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, झारखंड, दिल्ली अशा दहावर राज्यांत अस्तित्व दाखवून दिले आहे. राज्यात परभणी, लातूर, नांदेड, बीड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यातल्या पोल्ट्रीत बाधित पक्षी आढळल्याने सरकारने तातडीने पावले उचलली. प्रतिबंधात्मक उपायांपासून ते बाधित पक्ष्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यापर्यंत विविध सूचना दिल्या गेल्या, बारकाईने कार्यवाही केली गेली. 

कोरोनाप्रमाणेच बर्ड फ्लूदेखील भारतासह जगात पसरला तोदेखील १९९६मध्ये चीनमधूनच. तेथील कबुतरांद्वारे. महाराष्ट्रात आणि देशात त्याचे पहिले पाऊल उमटले ते नंदुरबार जिल्ह्यात २००६मध्ये. त्यानंतर २०१५ पर्यंत १५ राज्यात अडीचशेवर ठिकाणी त्याने तोंड वर काढले होते. २००६मधल्या बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री उद्योग कोसळल्यात जमा होता. तथापि, प्रतिकूलतेवर मात करून तो उभा राहिला. आजमितीला तैवान, इराण, इस्त्रायल, दक्षिण कोरिया, व्हिएटनाम, रशिया, युक्रेन, युरोपातील डझनावर देश अशा ५०वर देशात बर्ड फ्ल्यूने आपले अस्तित्व दाखवलेले आहे. योग्य काळजी आणि उपचाराने त्याच्याशी दोन हात करता येतात. परदेशातून आलेल्या स्थलांतरीत, त्यातही पाण्यावर उपजीविका करणाऱ्या पक्ष्यांतून तो आला. मग बदके, कबुतरे, कावळे, मोर अशा भारतातील पक्ष्यांसह पोल्ट्रीतील कोंबड्या शिकार बनत आहेत. 

भारतातला पोल्ट्री उद्योगातून अंडी, ब्रॉयलर असे सुमारे २०४९अब्ज रुपयांचे उत्पादन २०१९मध्ये झाले, २०२४ मध्ये ते ४३४०अब्ज रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. सुरवातीला परसबागेत सुरू झालेला हा उद्योग आता ८०टक्के संघटित झाला आहे. दरवर्षी शेकडो कोटींच्या पोल्ट्री उत्पादनांची निर्यात होते. विशेषतः अंडी, ब्रॉयलर, लेअरसह त्यावर आधारित अन्य उत्पादने बाजारात आहेत. महाराष्ट्रात या उद्योगाची उलाढाल १५हजार कोटी रुपयांची आहे. कोरोनाने देशातल्या उद्योगाला २०हजार कोटींचा फटका बसला. महाराष्ट्रात ५०हजारांवर शेतकऱ्यांना आणि व्यवसायिकांना त्यातून रोजगार मिळतो. तथापि, कोरोनानंतर सावरू पाहणारा हा उद्योग बर्ड फ्लूने अडचणीत पुन्हा जावू शकतो. ब्रॉयलरचे ९२ रूपयांपर्यंत गेलेले भाव ६० ते ६५कडे घसरू लागले आहेत. याला कारण ४० टक्‍क्‍यांनी घटलेला खप. विशेषतः महाराष्ट्राबाबत बोलायचे तर गुजरात, मध्य प्रदेशातून मागणी घटली, त्यातच काही राज्यांनी परराज्यांतून पक्षी आणण्याला मनाई केली आहे. त्यामुळे उत्पादन खर्च ७०-७५ रूपये आणि खिशात नफा काहीच नाही, अशी स्थिती पोल्ट्रीधारकांची होते आहे. विशेषतः छोट्या शेतकऱ्यांना ताण सोसावा लागतो आहे. त्यातच कोरोनाने मिळालेल्या धड्याने पिलांचे उत्पादन ५०टक्‍क्‍यांनी घटले, पक्ष्यांचे खाद्य, त्यातही सोयाबीनही महागले आहे. त्यामुळेदेखील व्यवसायावर परिणाम झालेला आहे. समाधानाची बाब म्हणजे सरकारी यंत्रणेने बर्ड फ्लूला तोंड देण्यासाठी दाखविलेली तत्परता.  विशेषतः पोल्ट्री उत्पादनांचा आस्वाद घेणाऱ्यांमध्ये केलेली जागृती, अंडी किंवा चिकन खाताना काय काळजी घ्यावी, ते कसे शिजवावे आणि कसे शिजवू नये, याबाबत दिलेल्या सूचना यामुळे घबराटीच्या व्याप्तीला काहीसा अटकाव बसला. परिणामी, बाजारातील मागणी पार कोसळली नाही. तरीही उत्पादकांना दिलासा मिळेल, अशी आणखी आश्वासक पावले टाकली गेल्यास पुन्हा सप्टेंबर२०१९ प्रमाणे भारतात ‘बर्ड फ्लूमुक्ती’ जाहीर करता येईल. महत्त्वाचे म्हणजे बर्ड फ्लूच्या मानवी संसर्गाचा शास्त्रीय पुरावा अद्याप कोठेही आढळलेला नाही. त्याही पुढील बाब म्हणजे मांस चांगले शिजवून खाल्ले ( ७० अंश सेल्सिअस तापमान) तर त्यात कोणताही विषाणू जिवंत राहत नाही. त्यामुळेच अफवांपासून सावध राहाणे आवश्‍यक आहे. इतरांनाही जागरूक करण्याच्या प्रयत्नांत वाटा उचलला पाहिजे. बर्ड फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षीदेखील केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार मदत करेल, असे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी जाहीर केले आहे. ही मदत तत्काळ कोंबडीपालकांपर्यंत पोहोचवून त्यांना दिलासा देण्याचे काम राज्य सरकारने करायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com