अग्रलेख : विखाराला बॅटीचे उत्तर

अग्रलेख : विखाराला बॅटीचे उत्तर

क्रिकेट कसोटी सामन्यात मैदानावर आणि मैदानाबाहेरही भारतीय खेळाडूंना जी वर्णद्वेषी वागणूक मिळाली, ती निषेधार्हच आहे; परंतु त्यामुळे विचलित न होता खेळाडूंनी सामना वाचवला. आपल्याला प्रक्षुब्ध करणाऱ्यांना उत्तर देण्याची ही सर्वोत्तम पद्धत म्हणायला हवी.

ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यापेक्षाही अधिक जहरी ठरू पाहणाऱ्या वर्णद्वेषी शेरेबाजीमुळे आपले मनोधैर्य जराही ढळू न देता भारतीय फलंदाजांनी ज्या जिद्दीने आणि ईर्षेने तिसरी कसोटी पराभवाच्या दाढेतून बाहेर काढली, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. भले, ही कसोटी जिंकून मालिकेत विजयी आघाडी भारताला घेता आली नाही, हे खरेच. मात्र, तोच आनंद वर्णद्वेषी शेरेबाजीतून आपल्या क्रिकेटपटूंना अवमानित करून, मिळवू पाहणाऱ्या कांगारूंना मिळू न दिल्याबद्दल अजिंक्‍य रहाणेच्या टीमचे अभिनंदनच करायला हवे. कोणे एके काळी क्रिकेट ‘सभ्य माणसांचा खेळ’ म्हणून ओळखला जाई. मात्र, केवळ वर्णाने गोऱ्या वंशात जन्माला आलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाच नव्हे तर प्रेक्षकांनाही या खेळाची ही ‘ओळख’ कधीच मान्य नव्हती. त्यामुळेच मैदानावर प्रतिस्पर्धी संघ हा आपल्यावर मात करू पाहत आहे, असे दिसू लागताच हे खेळाडू कधी त्याच्या कातडीच्या रंगावरून, तर कधी त्याच्या रूपावरून टीका-टिप्पणी, शेरेबाजी करून प्रतिस्पर्ध्यांचे मनोधैर्य खच्ची करतात, ही बाब नवी नाही. मात्र, सिडनी येथे जे काही घडले ते यापलीकडले होते. या कसोटीत दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी महमद सिराज तसेच जसप्रीत बुमरा या खेळाडूंना उद्देशून ‘ब्राऊन डॉग, गो होम’ अशा घोषणा स्टेडियममधील प्रेक्षकांचा एक समूह देत होता. एवढेच नव्हे तर या दोघांना उद्देशून ‘माकडे’ म्हटले गेले.याशिवाय शिव्याही दिल्या गेल्या. साहजिकच, त्याबाबत तक्रार झाली. स्टेडियममधून त्याबाबत सहा प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आले आणि ऑस्ट्रेलियनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाला या शिवीगाळीची तसेच वर्णद्वेषी शेरेबाजीची दखल घेणे भाग पडले. मात्र, भारतीय फलंदाजांनी या शेरेबाजीला आपल्या बॅटीने खणखणीत उत्तर दिले आणि सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवून ऑस्ट्रेलियातील या भंपकगिरीला योग्य चपराक दिली.

मात्र, यामुळे क्रिकेटच्या मैदानापलीकडले प्रश्न ऐरणीवर आले आहेत आणि ते सामाजिक तसेच मानसिक पातळीवरचेही आहेत. ऑस्ट्रेलियात गोरेतर खेळाडूंच्या संदर्भात अशा अश्‍लाघ्य शेरेबाजीचा हा प्रकार पहिला तर नव्हताच आणि एकदा हरभजनसिंग या आपल्या फिरकी गोलंदाजाने त्याच भाषेत ॲण्ड्रू सिमंड्‌सची अवहेलना केल्याचा आरोप करून ऑस्ट्रेलियाने आगडोंब उसळवला होता. मात्र, खरा प्रश्न कोणी आपल्याला ‘ब्राऊन’ म्हटल्यावर आपण आपले मनोधैर्य, उमेद आणि ईर्षा गमावून का बसतो, हा आहे. याचे कारण आपली तशी प्रतिक्रिया होणे म्हणजे आपणही गोऱ्यांचे वर्णवर्चस्व मानतो, असा अर्थ निघू शकतो.  त्यामुळे असला न्यूनगंड बाळगण्याचे काहीही कारण नाही. मात्र, सिडनीतील ज्या प्रेक्षकांनी शिविगाळ केली, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्‍यक आहे. रागावण्यास उद्युक्त करणाऱ्या प्रसंगाच्या वेळीही शांत राहून आपल्या कामगिरीवर परिणाम होऊ देणे महत्त्वाचे असते.  नेमके तेच आपण सिडनीत करून दाखवले. जखमी अवस्थेतील हनुमा विहारी आणि दीर्घ काळ फलंदाजीची सवय नसलेला गोलंदाज रवीचंद्रन अश्विन यांनी पाचव्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात बजावलेली विक्रमी कामगिरी. हे संपूर्ण सत्र त्या दोघांनी खेळून काढणे, हे केवळ अशक्‍यप्राय मानले जात होते. मात्र, त्या दोघांनी अत्यंत संयमाने खेळ केला आणि त्यांचा तो संयमच विखारी शेरेबाजीपेक्षा ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे मनोधैर्य खचवणारा ठरला. मग झेलही सुटत गेले आणि कर्णधार टीम पेन्सचे डावपेचही चुकत गेले.  अर्थात, भारतीय खेळाडूंबद्दल ही वर्णद्वेषी शेरेबाजी स्टेडियममधून व्यक्त होत असताना, मैदानातही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे रडीचे डावपेच सुरूच होते. ऋषभ पंत जेव्हा मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजी फोडून काढत होता, तेव्हा काही तर विजय आपल्याच हातात आहे, असेही वाटून गेले होते. मात्र, त्यामुळेच पंतने गार्ड घेण्यासाठी मैदानावर केलेल्या खुणा पुसून टाकण्याचे प्रयत्न स्टीव्ह स्मिथसारख्या मातब्बर खेळाडूने केल्याचा आरोप आता झाला आहे. अर्थात, स्मिथला हे वाद नवे नसले तरी त्यामुळेच ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडे आता ‘सभ्य माणसांचा खेळ’ या दृष्टीने बघू शकत नाही, हीच बाब अधोरेखित झाली. अर्थात, यापैकी कशाला म्हणजे कशालाही आपण बळी पडलो नाही आणि सामना अनिर्णित ठेवत आपण ऑस्ट्रेलियाला वेदना दिल्या त्या जणू पराभवच पदरात पडल्याच्या, हे विसरता येणार नाही.

खेळ क्रिकेटचा असो की फुटबॉलचा, तेथील झुंज ही अटीतटीची असते. फुटबॉलच्या मैदानावर तर कृष्णवर्णीयांचे वर्चस्व असतेच आणि त्यामुळे तेथे तर यापेक्षा अधिक विखारी शेरेबाजी होते. ही शेरेबाजी कोणत्या ना कोणत्या गंडातून होत असते. अर्थात, न्यूनगंडातून होणाऱ्या शेरेबाजीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याची मानसिकता आता भारतीय खेळाडूंमध्ये तयार होऊ लागल्याचे सिडनीत बघावयास मिळाले आणि त्यामुळेच आता शेवटच्या कसोटीबाबत कमालीची उत्कंठा जशी निर्माण  झाली आहे, त्याचबरोबर पाच दिवसांची कसोटी कशी रंगतदार आणि क्षणाक्षणाला काळजाचे ठोके चुकवणारी होऊ शकते, हेही भारतीय खेळाडूंनी दाखवून दिले आहे. खरे क्रिकेट ते हेच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com