esakal | अग्रलेख : परीक्षांचा गुंता
sakal

बोलून बातमी शोधा

SSC Exam

अग्रलेख : परीक्षांचा गुंता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दहावीच्या रद्द केलेल्या परीक्षेऐवजी आता विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुणदान करून मूल्यमापन होईल, याचे सूत्र सरकारने जाहीर केले आहे. अकरावीसाठी वैकल्पिक सामायिक प्रवेश परीक्षाही होणार आहे. तथापि, गर्दी, संपर्क टाळण्याचा उद्देश कितपत साध्य होईल, अशी शंका आहे. शिवाय, अनेक बाबतीत अधिक स्पष्टतेचीही गरज आहे.

कोणतीही प्रणाली, योजना, सूत्र निर्माण करताना ते अधिकाधिक सुसह्य, व्यवहार्य केले तर उपयुक्तता वाढते. संबंधित घटकांना दिलासा मिळतो. त्याच्यात जेवढी गुंतागुंता, संदिग्धता, संशयाला वाव तितका गुंता वाढत जातोे. त्याची अवस्था रोगापेक्षा उपाय जालीम अशी होते. अर्थात, शंभर टक्के समाधान कोणतीही व्यवस्था करू शकत नाही, हेही खरे. महाराष्ट्र सरकारने ‘सीबीएसई’पाठोपाठ दहावीची परीक्षा रद्द केली, आता अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक स्वरूपाच्या सामायिक प्रवेश परीक्षेचे सूत्र जाहीर केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या छायेत परीक्षा टाळण्याच्या उद्देशालाच अंशतः हरताळ फासला आहे. कोरोनाच्या दीड वर्षांच्या ठाणबंदीत अडकलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या मुद्यावर आणि त्यानंतरच्या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अशा बाबींची कशी पूर्तता करायची, असा प्रश्न सरकारसह शिक्षण व्यवस्था आणि त्यातील तज्ज्ञांना सतावत आहे. दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. बारावीच्या परीक्षा होतील; पण कशा, याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. दोन-तीन दिवसांत त्याची स्पष्टता मिळेल, असे वाटते. मात्र, पालक आणि विद्यार्थी दोघांच्याही जिवाची तगमग होते आहे. न्यायालयानेही राज्य सरकारला या प्रश्नावर खडसावल्यानंतर दहावीच्या परीक्षा न घेता कसे गुणदान करणार याचे सूत्र सरकारने जाहीर केले आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. तथापि, या सूत्रावर लवकरच अंतिमतेची मोहोर उमटेल, अशी आशा आहे. पण तिढा सोडवताना गुंता वाढतो काय, अशी भीती आहे. जरी आत्ताच्या घडीला दहावीची परीक्षा घ्यायचे ठरवले तरी तयारीसाठी २०-२२दिवस, निकाल लावण्यासाठी आणखी सुमारे ४०दिवस लागतील. परिणामी, ऑगस्टअखेर निकाल लागेल. शिवाय, सध्या परीक्षा नाही म्हणून विद्यार्थी, पालक गाफिल राहिले आहेत, त्यांची अवस्था काय होईल, याचा विचारच न केलेला बरा.

सध्या दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी पहिली ते आठवी परीक्षा झाल्या तरी अनुत्तीर्ण न होता पुढील वर्गात अलगद गेले. नववीच्या अंतिम परीक्षेच्या वेळीच कोरोनाचा बागुलबुवा आला. नववीची सत्रान्त परीक्षाच रद्द करावी लागली. विद्यार्थ्यांना दोन चाचण्या आणि सहामाही परीक्षेतील गुणांवरून गुणदान करून दहावीत पाठवले. आता सरकारच्या नव्या सूत्रानुसार दहावीत त्यांना नववीच्या दोन चाचण्या, सहामाही परीक्षेतील गुणांवरून ५०, त्याचप्रमाणे दहावीचे ५०गुण हे अंतर्गत परीक्षा, गृहपाठ, चाचण्या, सहामाही परीक्षा, सराव परीक्षा यांच्यावर आधारित दिले जाणार आहेत. त्याचे सविस्तर सूत्र जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दहावीत मिळालेल्या गुणांबाबत असमाधानी असल्यास विद्यार्थी श्रेणी सुधार परीक्षा देऊ शकतील. हे पाऊल रास्तच आहे. त्याबाबत सरकारचे आभार. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक थांबेल, अशी आशा आहे. तथापि अकरावी प्रवेशाचा गुंता अधिक जटील होतो की काय अशी धास्ती वाटते. विशेषतः अकरावीसाठीची सामायिक प्रवेश परीक्षा वैकल्पिक आहे. तथापि, अकरावीत प्रवेश देताना वैकल्पिक परीक्षा देणाऱ्यांना प्राधान्य, त्यानंतर जागा उरल्यास जे परीक्षा देणार नाहीत, त्यांना दहावीच्या गुणांवर प्रवेश मिळणार आहे.

गळतीचे कटू वास्तव

मुळात दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आघाडीच्या महाविद्यालयांत अकरावीला प्रवेश घेतानाच टोकाची स्पर्धा असते. अगदी ९८-९९टक्‍क्‍यांवरच प्रवेश बंद होतो. मग ज्याला तेथे प्रवेश हवा तो सामायिक परीक्षा न देता राहील काय? त्यासाठी पुन्हा अर्र्फर्जाचे सोपस्कार. सामायिक परीक्षा जरी बहुपर्यायी असली तरी ती १००गुणांची आणि दोन तासांची असेल. ती ज्या प्रकारे होईल, ऑनलाईन किंवा ऑफलाईन, तिला सामोरे जावे लागेल. मग कोरोनाच्या धास्तीने परीक्षा रद्द करण्याला अर्थ काय राहणार? मुलांनी एकत्रित येऊ नये, गर्दी टळावी, यासाठी तर परीक्षा रद्द करण्याचा सोपस्कार केला ना? मग या सामायिक परीक्षेने सारे मुसळ केरात अशी अवस्था होणार नाही काय? दहावीला बोर्ड कोणतेही असले तरी विद्यार्थ्याला सामायिक परीक्षा स्पर्धेसाठी का होईना अनिवार्यच आहे. यावर्षी, अकरावीला प्रवेश घेणारे विद्यार्थी वाढणार आहेत. विज्ञान शाखेला नेहमीच गर्दी आणि कला शाखेला यथातथा प्रवेश अशी स्थिती असते. शहरांत आघाडीच्या प्रथितयश महाविद्यालयांना पसंती आणि ग्रामीण तसेच सामान्य महाविद्यालयात जागा रिक्त असे चित्र असते. यावर्षी सुमारे १६लाख विद्यार्थी अकरावीत प्रवेश घेतील, असा अंदाज आहे. यातील काही अभियांत्रिकी पदविका, शिक्षणशास्त्र पदविका, आयटीआयला जातील. सामायिक तसेच श्रेणी सुधार परीक्षा यांचे वेळापत्रकही वेळीच जाहीर करावे. विशेषतः सामायिक परीक्षेसाठी विषयनिहाय प्रश्न किती, गुणदान कसे करणार, त्याची काठिण्य पातळी कशी राहणार असे एक ना अनेक प्रश्न आहेत. अशा अनुत्तरीत बाबींसंदर्भात वेळीच खुलासा, स्पष्टता आणि पारदर्शकता राखावी. शिवाय, नववी उत्तीर्ण होऊन दहावीत गेलेल्या आणि परीक्षेला अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची तुलनात्मक संख्या पाहता, सुमारे अडीच लाख विद्यार्थी शिक्षणाबाहेर फेकले गेल्याचे कटू वास्तव आहे. पालकांचे स्थलांतर, ऑनलाईन शिक्षणाबाबतची असमर्थता यांपासून ते पुन्हा फोफावणारी बालविवाहाची प्रथा अशी अनेक कारणे यामागे सांगितली जातात. एकूण कोरोनाने शिक्षणात आलेले उदासीनतेचे मळभ दूर करण्यासाठी सरकारने वेळीच धोरणात्मक पावलेही उचलावीत.

loading image