अग्रलेख :  चाळिशीतील कमळ! 

bjp
bjp
Updated on

आपल्या देशाच्या राजकारणाला संपूर्णपणे नवे नेपथ्य बहाल करणारा भारतीय जनता पक्ष आज चाळिशीत प्रवेश करत आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या गंभीर सावटामुळे या चाळिशीचा महाउत्सव साजरा होऊ शकलेला नसला, तरीही या प्रवासाची दखल घेणे अनेक कारणांमुळे भाग आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात पहिल्या निवडणुका १९५१-५२ मध्ये झाल्या, तोच मुहूर्त साधून पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय मंत्रिमंडळातून बाहेर पडून डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या जनसंघाफनेच भाजपफ नावाने १९८० मध्ये नवा अवतार घेतला. मात्र, तोपावेतो देशाच्या राजकीय रंगमंचावर अनेक चित्तचक्षुचमत्कारी प्रवेश सादर झाले होते आणि ते सर्वच स्वातंत्र्यप्राप्तीनंत पहिली दोन दशके राजकीय अस्पृश्‍यतेचा विजनवास सहन करणाऱ्या जनसंघाफला बळ देणारे होते. आणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवर लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली झालेला जनता पक्षाफचा प्रयोग प्रारंभीच्या तुफानी यशानंतर फसला आणि पुन्हा इंदिरा गांधी यांचे राज्य येताच, याच जनता पक्षाफतील संघपरिवाराने बाहेर पडून, दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर सहा एप्रिल १९८० रोजी आपले भाजप या नावाने नवे बारसे केले, तरी या पक्षाच्या प्रवासातील एक चिरस्मरणीय क्षण हा त्याच वर्षीं डिसेंबरात मुंबईत झालेल्या पक्षाच्या पहिल्या अधिवेशनाचाच आहे. या अधिवेशनात ज्येष्ठ कायदेपंडित एम. सी. छागला यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या रूपाने मला भावी पंतप्रधान दिसत आहे!फ असे उद्‌गार काढले होते. तर खुद्द वाजपेयी यांनी अधिवेशनाच्या शिवाजी पार्कवरील सांगता सोहळ्यात अंधेरा छटेगा, सूरज उगेगा, कमल खिलेगा!फ अशी भविष्यवाणी उच्चारली. ही दोन्ही भाकिते खरी होतील, असे तेव्हा कोणालाच वाटले नव्हते. मात्र, काळाने ते शब्द खरे करून दाखवले आहेत. 

भाजपने २०१४ तसेच १९ या दोन्ही निवडणुकांत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत निखळ बहुमत प्राप्त केले आणि त्यामुळेच आपल्या राजकारणानेही एक वर्तुळ पूर्ण केले आहे. १९६० या दशकात ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांनी बिगर-कॉंग्रेसवादाचे राजकारण सुरू केले आणि आपल्या समवेत जनसंघालाही घेतले. तेव्हा आणि पुढे आणीबाणीनंतर जयप्रकाशांनी जनता पक्षफ उभा करतानाही, त्यात जनसंघाला सामावून घेतल्यामुळे केवळ जनसंघालाच नव्हे तर संघपरिवारालाच मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली. मात्र, त्यानंतर तीन वर्षांतच नव्या अवताराची धुरा खांद्यावर घेताना, वाजपेयींनी दिलेला गांधीवादी समाजवादाफचा नारा भाजपमध्येच वादंग माजवणारा ठरला होता. अर्थात, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये झालेल्या निवडणुकांत भाजपच्या पदरात केवळ दोन जागा आल्या. त्यानंतर भाजपला गांधीवादी समाजवादाचा मुखवटा तत्काळ उतरवून, त्याच काळात संघपरिवाराने सुरू केलेल्या मंदिर वहीं बनायेंगे!फ या प्रयोगात सामील होणे भाग पडले. या नव्या प्रयोगातील भाजपचे नायक होते लालकृष्ण अडवाणी. पुढच्या पाच वर्षांतच, १९९० मध्ये अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील सोमनाथ से अयोध्याफ ही रथयात्रा आणि त्याच काळात मिस्टर क्‍लीनफ राजीव गांधी यांच्या पदरी आलेला बोफोर्सफचा कलंक, या दोन गोष्टींचा भाजपच्या पुढच्या वेगवान वाटचालीत मोठा हिस्सा आहे. त्यानंतरच वाजपेयी हे सुमारे साडेसहा वर्षं पंतप्रधानपद गाजवू शकले आणि त्यात बिगरकॉंग्रेसवादाच्या वेडाने पछाडलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या समाजवादी नेत्यांमुळेच भाजपला बहुमत नसतानाही वाजपेयींना निर्विध्नपणे राज्य करता आले. 

अर्थात, भाजपच्या या वाटचालीत डिसेंबर १९९२ मध्ये अयोध्येत अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, प्रमोद महाजन, उमाभारती आदींच्या साक्षीने उन्मादी हिंदुत्ववाद्यांनी घडवून आणलेले बाबरीकांडफ आणि त्यानंतरच्या हिंसक दंगली तसेच गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेला गोध्राकांडाफनंरचा अमानुष हिंसाचार यांचा मोठा वाटा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १९२५ मध्ये झालेल्या स्थापनेपासून हिंदुत्ववाद्यांना हवेसे असलेले धार्मिक ध्रवीकरण याच हिंसाचाराने घडवून आणले आणि त्यातूनच देशात हम और वोफ अशी दुराव्याची मोठी दरी उभी राहिली. २००४ मध्ये वाजपेयीच्या नेतृत्वाखाली भाजपचा केंद्रात पराभव झाला, मात्र त्याच काळात मोदी यांनी आपल्या तथाकथितफ विकासाच्या जोरावर गुजरातेत भाजपची सत्ता अबाधित राखली होती. त्यामुळेच १९८०च्या दशकात लोकसभेच्या अवघ्या दोन जागांपासून सरकार स्थापनेपर्यंत भाजपला घेऊन जाणाऱ्या अडवाणी यांना वनवासात धाडून संघपरिवाराने २०१३ मध्ये मोदी यांच्याच हातात पक्ष दिला आणि ते भाजपला एका नव्याच विजयपथाफवर घेऊन गेले. मात्र, डॉ. मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, बलराज मधोक आणि मुख्य म्हणजे वाजपेयी-अडवाणी यांच्या अथक मेहनतीच्या पायावरच आज मोदी आणि अमित शहा यांनी नव्या रूपात सादर केलेला भाजप उभा आहे, हे कोणालाच विसरता येणार नाही. मोदी यांची घोषणा सब का साथ!फ अशी असली, तरी वास्तव वेगळेच आहे. त्यामुळे बिगर-कॉंग्रेसवादाची जागा आता बिगर-भाजप राजकारण घेऊ पाहत आहे. त्यामुळेच केवळ बहुमतवादाचे राजकारण न करता या पुढे मोदी-शहा यांनी खऱ्या अर्थाने लोकशाहीवाद अमलात आणला तरच जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून इतिहासात भारताची नोंद होईल, हाच या चार दशकांच्या प्रवासाचा बोध आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com