esakal | राजधानी दिल्ली : काँग्रेसचे भरकटले तारू
sakal

बोलून बातमी शोधा

Jitin Prasad_ J.P. Nadda

राजधानी दिल्ली : काँग्रेसचे भरकटले तारू

sakal_logo
By
अनंत बागाईतकर

काँग्रेस पक्षातून जुन्या निष्ठावंतांचे अन्य पक्षांत जाणे वाढले आहे, त्यातीलच एक जितीन प्रसाद. अजून किती पडझड झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला जाग येणार आणि त्यांची कार्यपद्धती बदलणार हा प्रश्‍नच आहे. पक्षाचे नेतृत्व अद्यापही आपल्याच एकारलेल्या कार्यपद्धतीत मग्न आहे. (Capital Delhi Wandering boatman of Congress article by Anant Bagaitkar)

हेही वाचा: नक्षलवाद्यांनो मुख्य प्रवाहात सामिल व्हा; संभाजीराजेंचं आवाहन

वर्तमान काँग्रेस पक्षाला अनेक चपखल उपमा दिल्या गेल्या आहेत. ‘जुनी पडकी उद्धवस्त धर्मशाळा’, ‘गळका हौद’ वगैरे वगैरे! उपमा देणे किंवा नावे ठेवणे भरपूर झाले. पण हा पक्ष किंवा त्याहीपेक्षा नेमकेपणाने सांगायचे झाल्यास पक्ष चालविणारे किंवा ‘पक्ष-संचालक’ हे त्यांच्या कामाच्या पद्धतीत किंवा कार्यशैलीत बदल करताना दिसत नाहीत. पक्षनेतृत्वाच्या पातळीवर अद्याप अनिश्‍चितता आणि अधांतरी अवस्थाच आहे. त्यामुळे पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत नेमकी दिशा काय असावी याबाबतही कमालीची अस्पष्टता आहे. मुळातच पक्षाचे नेते, अनभिषिक्त अध्यक्ष किंवा अनौपचारिक अध्यक्ष असलेले राहूल गांधी यांना पक्षसंघटनेशी काही देणेघेणे आहे, याचा कोणताही ठोस पुरावा मिळत नाही. ते त्यांच्या मनाला येईल त्या पद्धतीने काम करताना आढळतात. पक्षात तर राहायचे, सर्व फायदेही घ्यायचे, परंतु जबाबदारीशिवाय एकांड्या शिलेदाराप्रमाणे तऱ्हेवाईक वागायचे असा त्यांच्या कामाचा एकंदर खाक्‍या दिसतो. त्यामुळे पक्षात त्यांच्याकडे जबाबदारी काय आहे, त्यांचे स्थान काय, पक्षाचा कारभार कसा असावा याबाबत त्यांचे मार्गदर्शन काय हे कुणालाच माहीत नाही. येऊन-जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अधूनमधून टीकास्त्र सोडणे, त्यांच्या विरोधात ट्विट करणे यापलीकडे राहूल काही करीत आहेत, हेही कुठे ठळक दिसत नाही. त्यामुळे पक्ष चालवितो कोण, पक्ष चालतो कसा, पक्षाची भावी रणनीती, डावपेच याबद्दल पक्षात पूर्णतया अंधार दिसतो.

विरोधक म्हणूनही निष्प्रभ

विरोधी पक्षाला किमान पाच वर्षे तरी स्वतःची संघटना मजबूत करण्याची संधी मिळते. कारण सत्तेत आल्यानंतर संघटनेपेक्षा सरकार आणि राज्यकारभाराद्वारे जनतेपर्यंत पोहोचता येते. विरोधी पक्षात असताना संघटना व कार्यकर्त्यांच्या व्यापक जाळ्याद्वारे जनतेपर्यंत जाणे, त्यांचे प्रश्‍न घेऊन आंदोलने करणे आणि सरकारच्या जबाबदारीबाबत सातत्याने प्रश्‍न उपस्थित करणे यावर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित असते. दुर्दैवाने विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला छाप पाडता आलेली नाहीच; प्रभावी विरोधी पक्ष म्हणून जनतेत जागाही निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत. संसदेत, संसदेबाहेर हा पक्ष निष्प्रभ ठरलाय. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी एकाकी झुंज देऊन मोदी-शहा जोडगोळीस पाणी पाजले, पण आता भाजपने फोडलेल्या तृणमूल काँग्रेसच्या लोकांना पुन्हा ‘घरवापसी’ची संधी देण्याचा राजकीय मोठेपणा दाखवून त्यांनी भाजपला घाम फोडलेला आहे. भाजप नेतृत्वाला बंगालचा पराभव महागात पडणार आहे, तो याचसाठी! ममता या काँग्रेस संस्कृतीच्या मुशीतून निघालेल्या नेत्या आहेत. परंतु काँग्रेसला त्या परवडल्या नाहीत. त्यांना काँग्रेसबाहेर पडूनच स्वतःचे कर्तृत्व व कामगिरी सिद्ध करावी लागली. काँग्रेसमधून नुकतेच जितीन प्रसाद नावाचे तरुण नेते बाहेर पडले आणि त्यांनी भाजपमध्ये आश्रय घेतला. त्या पार्श्‍वभूमीवरच काँग्रेसच्या गळतीच्या इतिहासावर नजर टाकावी लागेल.

हेही वाचा: कुंभमेळ्यातील बनावट कोरोना अहवालांच्या चौकशीचे आदेश!

पन्नाशीच्या आतले जितीन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीपासूनच त्यांचे भाजप प्रवेशाचे संकेत मिळत होते. कसेबसे दोन वर्षे काँग्रेसमध्ये काढून अखेर ते भाजपवासी झाले. जितीन प्रसाद कोण? काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील एक वरिष्ठ ब्राह्मण नेते जितेंद्र प्रसाद यांचे ते पुत्र आहेत. जितेंद्र प्रसाद यांनी राजीव गांधी व पी. व्ही. नरसिंह राव या दोघांचे राजकीय सचिव म्हणून काम पाहिले होते. काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. २००० मध्ये त्यांनी सोनिया गांधींविरुद्ध काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली, त्यात पराभूत झाले. परंतु नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर जानेवारी २००१ मध्येच त्यांचे निधन झाले. जितीन प्रसाद हे त्यावेळी फारच तरुण होते. नंतर ते राहूल यांच्या तरुण नेत्यांच्या गटात सहभागी झाले. युवक नेते म्हणून त्यांना मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात एकदा केंद्रीय राज्यमंत्रिपद दिले होते. काँग्रेसच्या पराभवानंतर त्यांना संघटनेत स्थान देण्यात आले. नुकत्याच झालेल्या पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना त्या राज्याचे सरचिटणीस नेमले होते. तेथे काँग्रेसचा खात्मा झाला. त्यानंतर या तरुण नेत्याचे नैराश्‍य वाढले असावे. त्यामुळेच स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी त्यांनी भाजपचा आश्रय घेतला.

नाहीतर ओसाड गावची पाटीलकी!

जितीन प्रसाद हे काँग्रेसशी निष्ठावंत कुटुंबाचे प्रतिनिधी असल्याने त्यांचा काँग्रेसत्याग हा जाणवणारा आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. ज्योतिरादित्य शिंदे हे याच परंपरेतले! वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांचे उदाहरणही कसे विसरता येईल. त्यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाबरोबरच यूपीए सरकारच्या काळात काँग्रेसला त्या राज्यातून लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकून दिल्या होत्या. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या पुत्राला (जगनमोहन) सत्तेचा मोह होणे स्वाभाविकच होते. परंतु त्यांना योग्य रीतीने हाताळण्याऐवजी काँग्रेस नेतृत्वाने त्यांना दडपण्यातच शक्ती खर्च केली. परिणामी ते काँग्रेसबाहेर पडले, आज ते आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रातही अनेक काँग्रेसी घराण्यांमधील मंडळींनी हाच प्रयोग केला. विखे-पाटील घराण्यातील राधाकृष्ण आणि सुजय पिता-पुत्र असोत की हर्षवर्धन पाटील असोत ही याच मालिकेतली उदाहरणे. सांगण्याचा मुद्दा हा की वर्षानुवर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या राजकीय कुटुंबातील तरुण पिढीच काँग्रेसला राम राम करीत आहे. याचा गांभीर्याने विचार काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी करण्याची वेळ आली आहे. काँग्रेस आणि घराणेशाहीचे नाते अतूट आहे. त्यामुळेच आता या घराण्यांना अचानक काँग्रेसची ॲलर्जी का वाटते, याचा तपास, संशोधन काँग्रेसच्या वर्तमान सूत्रधारांना करावे लागेल. तेही घराणेशाहीचेच आविष्कार आहेत, हे त्यांना विसरून चालणार नाही. ही केवळ झलक दाखविण्यापुरती उदाहरणे दिली कारण देशभरातील उदाहरणे द्यायला जागा पुरणार नाही.

हेही वाचा: राज्यात १५ जूनपासूनच शाळा होणार सुरु

या घडामोडींचे तात्पर्य काय? काँग्रेसकडे तूर्तास सत्तेचे चुंबकत्व नाही. पक्षात लोकांनी टिकून राहावे, यासाठी त्यांना नेतृत्वाकडून जो विश्‍वास आवश्‍यक असतो तो देण्यात नेतृत्व असफल ठरत आहे. पक्षसंघटनेच्या पातळीवरील अनिश्‍चितता व अनिर्णित अवस्था यामुळे विविध फळ्यांमधील कार्यकर्ते व नेते भरकटल्यासारखे झाले आहेत. त्यात निष्ठावंत म्हणविणाऱ्यांनी पक्षत्याग केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मानसिक गोंधळ होतो आणि पक्षनेतृत्वाबाबत त्यांच्या मनातला विश्‍वास हा प्रत्येक पक्षत्यागाने खालावत जातो. काँग्रेस अजूनही राष्ट्रीय पक्ष मानला जातो. परंतु ती प्रतिमा टिकविण्यासाठी नेतृत्वाला निष्ठावंतांना उचित स्थान देणे क्रमाप्राप्त आहे. हौदाला छिद्र पडल्यानंतर ते बुजवले तर पाणी साठून राहते, अन्यथा तो कोरडा होतो. काँग्रेस नेतृत्वाने पक्षत्याग करणाऱ्यांना हिणवण्यापेक्षा याबाबत आत्मपरीक्षण करावे; अन्यथा नेत्यांवर ओसाड गावच्या पाटीलकीची वेळ येईल!

loading image