esakal | लसीची एक मात्रा पुरेशी
sakal

बोलून बातमी शोधा

लसीची एक मात्रा पुरेशी

लसीची एक मात्रा पुरेशी

sakal_logo
By
डॉ. नानासाहेब थोरात thoratnd@gmail.com

भारतात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असताना सरकारकडून लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सध्या देशात दोन लशींचा वापर सुरू झाला असून नुकतीच रशियाच्या लस आपत्कालीन परिस्थितीतील वापरण्यास परवानगी दिली. सध्याच्या आणीबाणीसदृश परिस्थितीत कमी वेळेत अधिकाधिक लोकांचे लसीकरण कसे करता येईल, यावर भर देण्याची गरज आहे. महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा प्रादर्भाव वेगाने वाढत असल्याने लशीची मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण जगात लशीबाबत आणीबाणी निर्माण झाली आहे. त्यावर काही शास्त्रज्ञांनी उपाय सुचवले आहेत. त्यापैकी दोन उपाय हे सोपे आणि लगेचच अमलात येऊ शकतात. परिणामी काही प्रमाणात का होईना लशीच्या तुटवड्यावर मार्ग काढता येऊ शकेल.

पहिला महत्त्वाचा उपाय म्हणजे ज्या लोकांना सहा महिन्यांपूर्वी कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे, त्यांना लशीची केवळ एकच मात्रा द्यायची. लशीचा तुटवडा आहे म्हणून ही सबब नव्हे; तर याबाबत शास्त्रीय अभ्यास करण्यात आला आहे. अमेरिका आणि युरोपमधील शास्त्रज्ञांनी तो नुकताच प्रसिद्ध केला आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊन तो बरा झाल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात आणि या अँटीबॉडीज किमान सहा महिने तरी शरीरात टिकून राहतात. सहा महिन्यानंतर त्या कमी होत जातात आणि त्यानंतर त्या रुग्णांना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे गेल्या सहा महिन्यात कोरोनातून बरे झालेल्या लोकांना पहिली मात्रा दिल्यास त्यांच्या शरीरात पुन्हा अँटीबॉडीज तयार होतात. विशेष म्हणजे त्यांची क्षमता ही निरोगी लोकांना दोन मात्रा दिल्यानंतर तयार होणाऱ्या अँटीबॉडीजएवढी असते. या अभ्यासासाठी अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी फायजर कंपनीची लस, तर इंग्लंडमधील राष्ट्रीय हेल्थ सर्व्हिसच्या डॉक्टरांनी ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेका लस वापरली. दोन्हीकडे सारखेच निष्कर्ष मिळाले असून इंग्लंडमध्ये ‘राष्ट्रीय हेल्थ सर्व्हिस’च्या ज्या डॉक्टरांना किंवा परिचारिकांना कोरोना होऊन गेला, त्यांना केवळ एकच मात्रा देण्याचा प्रयोग सुरू केला आहे. विशेष बाब म्हणजे हा नवा निष्कर्ष प्रसिद्ध होण्यापूर्वीच फ्रान्स सरकारने कोरोना होऊन गेलेल्या लोकांना दोनऐवजी लशीची एकच मात्रा आवश्यक असल्याचे धोरण जाहीर केले. आणि तशी उपाययोजना करणारा फ्रान्स हा जगातील पहिलाच देश ठरला आहे.

हेही वाचा: राज्यात ‘डबल म्युटंट स्ट्रेन’चा प्रभाव

दुसरा उपाय म्हणजे ज्या लोकांना नुकताच कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे, त्यांना पहिली मात्रा उशिराने म्हणजे तीन महिन्यांच्या अंतराने दिली तरी चालेल. या लोकांमध्ये नैसर्गिकरीत्या बऱ्यापैकी अँटीबॉडी तयार झाल्याचे दिसून आले आणि त्या जवळपास तीन ते सहा महिने टिकतात. या दोन्ही नव्या अभ्यासाचे आणि उपाययोजनांचे निकाल गेल्या काही आठवड्यांत ब्रिटिश मेडिकल जर्नल तसेच इतर काही आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. या दोन्ही अभ्यासांचा विचार केल्यास आणि त्याची अंमलबजावणी केल्यास काही प्रमाणात लशीचा तुटवडा कमी होईल आणि अधिकाधिक निरोगी व्यक्तींचे लसीकरण करता येईल. याबाबत फ्रान्स सरकारने निर्णय घेतला आहे. इतर देशदेखील या प्रकारचा निर्णय घेतात का, हे लवकरच समजेल. भारतात आणि मुख्यतः महाराष्ट्रात हा निर्णय कदाचित यशस्वी होऊ शकतो आणि त्यामुळे लसीकरणाचा वेग आणखी वाढवता येऊ शकतो.
(लेखक ऑक्सफर्ड विद्यापीठात वरिष्ठ संशोधक आहेत.)