
‘...मग काश्मिरांचे स्वयंभ, कां रत्नबीजां निघाले कोंभ,
अवयवकांतीची भांब, तैवी दिसे’
योगियाचे वर्णन करताना ज्ञानेश्वरमाऊलीने रत्नबीजाच्या अंकुरण्याची उपमा वापरली आहे. रत्नबीजाला अंकुर फुटण्याची तेजोमय सृजनक्रिया माऊलींनी पाहिली, अनुभवली, आणि तोच अमृतानुभव सहस्त्र हस्तांनी वाटून आपली मऱ्हाटी भाखा समृद्ध केली. सृजन हे तर विश्वाचे प्रयोजन. माऊलींनी त्याचे वर्णन करावे यात नवल ते काहीच नाही. मानवाने या सर्जनशक्तीच्या जोरावरच तर उत्क्रांतीचे सर्व टप्पे ओलांडून गगनाला गवसणी घातली. ही सर्जनाची देवाणघेवाण अशी सतत चालू असते. ‘हे हृदयींचे ते हृदयी’ जातानाही काही निर्मिती होतच असते. सरहद्दी समरांगणाला असतात, सर्जनाला तो नियम लागू नाही. म्हणूनच महानगरी मुंबईत पार पडणाऱ्या ‘वेव्हज’ या जागतिक सर्जनोत्सवात सत्तरेक देशांचे निर्माते, कलावंत, आशयकर्ते एकत्र आले, एकमेकांशी हितगुज करते झाले.