
सरतेशेवटी भारतातील सोळाव्या जनगणनेचा मुहूर्त सोळा वर्षांनंतर निघाला. दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेचा शिरस्ता सहा वर्षांच्या विलंबामुळे मोडीत निघाला असला तरी प्रस्तावित जनगणनेच्या अंतिम आकडेवारीतून अनेक अनुत्तरित प्रश्नांची उकल होणार आहे. भारतातील जनगणनेच्या विलंबासाठी कोरोना, तसेच डिजिटल स्थित्यंतर कारणीभूत ठरल्याचे म्हटले जात असले तरी कोरोनापश्चात चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, ब्रिटन, बांगलादेश, पााकिस्तान, नेपाळ, घाना, नायजेरिया आदी १४३ देशांनी जनगणना ठरल्यावेळीच पार पडली. युक्रेन आणि रशियासह काही देश त्यास अपवाद ठरले. इलेक्ट्रॉनिक डेटा संकलन आणि ऑनलाइन स्व-गणनेच्या माध्यमातून अनेक देशांत जनगणनेचे काम झटपट आटोपले.