esakal | सुमंगल दंगल!
sakal

बोलून बातमी शोधा

Wrestling

क्रिकेट, क्राइम, सिनेमा या भारतात विकल्या जाणाऱ्या तीन ‘सी’ची नेहमीच चर्चा होते. पण, त्याइतकीच आणखी एक लोकप्रिय गोष्ट म्हणजे कुस्ती. मुळात राजाश्रय आणि लोकाश्रय लाभलेल्या कुस्तीसमोर लोकप्रियतेची समस्या कधी नव्हतीच; पण दर चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिंपिक आणि दर वर्षी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनानंतर एकच चर्चा होते ती म्हणजे ऑलिंपिक पदकांचा दुष्काळ संपणार तरी कधी?

सुमंगल दंगल!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

क्रिकेट, क्राइम, सिनेमा या भारतात विकल्या जाणाऱ्या तीन ‘सी’ची नेहमीच चर्चा होते. पण, त्याइतकीच आणखी एक लोकप्रिय गोष्ट म्हणजे कुस्ती. मुळात राजाश्रय आणि लोकाश्रय लाभलेल्या कुस्तीसमोर लोकप्रियतेची समस्या कधी नव्हतीच; पण दर चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिंपिक आणि दर वर्षी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनानंतर एकच चर्चा होते ती म्हणजे ऑलिंपिक पदकांचा दुष्काळ संपणार तरी कधी?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कुस्तीतून आपल्या किती अपेक्षा आहेत, हेच यातून अधोरेखित होते. हर्षवर्धन सदगीरसारख्या मल्लाच्या कामगिरीमुळेदेखील या अपेक्षा निर्माण होतात. ‘महाराष्ट्र केसरी’पदाची गदा जिंकणाऱ्या सदगीरविषयी ‘भले शाब्बास!’ असेच उद्‌गार प्रत्येक कुस्तीप्रेमीच्या तोंडून निघाले असतील. पहिलवान म्हटला म्हणजे तो शिक्षणाबाबत उदासीनच असणार, असे मानले जाते. या पार्श्‍वभूमीवर हर्षवर्धन राज्यशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतो आहे, ही उल्लेखनीय बाब आहे. त्यामुळेच त्याच्या रूपाने या मराठमोळ्या खेळाला केवळ ‘महाराष्ट्र केसरी गदे’चा मानकरीच नव्हे, तर एक ‘ब्रॅंड अँबॅसेडर’ मिळाला आहे, असे म्हणावे लागेल. हर्षवर्धनच्या विजयाइतकेच सद्‌गदित केले ते त्याच्या खिलाडूवृत्तीने. उपविजेत्या शैलेश शेळकेला खांद्यावर घेऊन मॅटच्या आखाड्याला फेरी मारून मगच त्याने गदा खांद्यावर घेतली. खेळ म्हणजे फक्त जिंकणे, अशी व्याख्या झालेल्या व्यावसायिक क्रीडायुगात हर्षवर्धनची ही कृती कुस्तीच्या वा खेळाच्याच नव्हे, तर समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रांसाठी प्रेरणा देणारी आहे. प्रत्येकाने त्यातून शिकण्यासारखे आहे. 

‘अधिवेशन’ असे आगळे नाव असलेली महाराष्ट्र केसरी ही नुसतीच राज्यस्तरीय स्पर्धा नाही. ज्यांनी ज्यांनी हे अधिवेशन याचि देही याचि डोळा पाहिले, त्यांची भावना कृतार्थतेची असते. साठी पार केलेल्या या अधिवेशनाचे स्वरूप आणि त्याचा मूळ उद्देश या अनुषंगाने होणाऱ्या चर्चेचा सूर निराशाजनक, तर निष्कर्ष हताश करणारा असायचा. या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या ६३व्या अधिवेशनात काही ठोस पावले उमटली.

त्यामुळे आशांना पालवी फुटली. आकांक्षापूर्तीची नांदी झाली. संयोजकांचा ढिसाळ कारभार, मल्लांनी निकाल अमान्य करणे, त्यांच्या समर्थकांनी पंचांच्या निर्णयाविरुद्ध अरेरावी करणे, आखाड्यात ठिय्या मारणे, अशा घडामोडींमुळे या अधिवेशनात राजकीय रंग उमटायचे आणि त्यातून कुस्तीचा बेरंग व्हायचा. म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील अधिवेशन याबाबतीत ‘न भूतो...’ ठरले. ‘सिटी कॉर्पोरेशन’च्या रूपाने पाच वर्षांसाठी प्रायोजक मिळाल्यामुळे संयोजक व्यावसायिक पद्धतीने आयोजन करू शकले. त्यामुळे आखाड्यासारख्या स्पर्धक, पंच, स्वयंसेवक वगळता इतरांसाठी निषिद्ध असलेल्या क्षेत्रात कुणीही मोकाट वावर करून मनमानी करू शकले नाही.

अधिवेशनापूर्वी आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड यांनी दिवसभराची कार्यशाळा घेतली. त्यामुळे पंचांच्या पातळीवर आत्मविश्वास निर्माण झाला. याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे पराभवानंतर सूडभावनेने पछाडत ‘अपिलाचा डाव’ टाकण्याचे प्रमाण ९० टक्के कमी झाले. संयोजनात राजकीय व्यक्तींचा पुढाकार हे कुस्तीसाठी वरदान नव्हे, तर शाप ठरते. ते चित्र बदलण्यास या अधिवेशनाने प्रारंभ केला आणि हे फार मोठे फलित मानावे लागेल. क्रिकेटमधील पंचांच्या तुलनेत कुस्तीच्या पंचांवर असलेल्या दडपणाची कल्पनाही करता येणार नाही. कुस्तीमधील हा नकारात्मक मुद्दा या वेळी निकालात निघाला, ही समाधानाची बाब. पहिलवानांचा खुराक आणि त्याचा खर्च, हा मराठी मल्ल आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यातील मुख्य अडथळा मानला जातो. त्यामुळे मल्लांना सुमारे आठ महिने विविध ठिकाणी होणाऱ्या जत्रा-यात्रांमध्ये कुस्ती करावी लागते आणि त्या मानधनातून मिळणाऱ्या खर्चातून खुराक घ्यावा लागतो. जत्रा-यात्रांमुळे हातात थोडे पैसे पडत असले, तरी ३६५ दिवस सराव करण्याचे नियोजन कोलमडते.

याचा अंतिम परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरील यशासाठी नव्हे, तर सहभागाचे प्राथमिक ध्येय साध्य करण्यापुरता होतो. प्रायोजकांनी सुवर्णपदक विजेत्याला २० हजार, रौप्यविजेत्याला १० हजार, तर ब्राँझपदक विजेत्याला पाच हजार रुपये देण्याची घोषणा म्हणूनच स्वागतार्ह ठरली. अलीकडे कोणत्याही खेळाचे मार्केटिंग करायचे असेल, तर समाजमाध्यमांच्या पातळीवर सक्रिय व्हावे लागते. ही गरजही या अधिवेशनात पूर्ण झाली. त्यामुळे वयोमानामुळे प्रवास करू न शकलेली अनेक मंडळी कुस्त्यांचा आस्वाद घेऊ शकली. यानिमित्ताने महाराष्ट्रातील कुस्तीच्या स्थितीगतीचा मागोवा घ्यायला हवा. व्यापक अर्थाने ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटन, मुष्टियुद्ध, नेमबाजी अशा अनपेक्षित खेळांमधून पदकविजेते उदयास येत असताना, त्यांच्यावर सिनेमे निघत असताना, कुस्तीत मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी पाऊल अपवादाने, अभावाने पडते, अशी स्थिती आहे. हरियाना, पंजाबसारखी राज्ये पुरुषच नव्हे, तर महिला कुस्तीतही मुसंडी मारत असताना महाराष्ट्राचे अस्तित्व ठळकपणे दिसत नाही. हे चित्र बदलून महाराष्ट्रातील कुस्ती पुन्हा पूर्वीप्रमाणे बहरावी, यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करण्याचा निर्धार यानिमित्ताने करायला हवा.

loading image