esakal | अग्रलेख : विकृतीच्या झळा
sakal

बोलून बातमी शोधा

Women-Burnt

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात एका तरुण प्राध्यापिकेचा पाठलाग करून तिला अत्यंत निर्दयपणे पेटवून देण्यात आले. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’वाल्यांच्या देशात हे घडले आहे. यापूर्वी अनेकदा घडले आहे. काही दशकांपूर्वी दहावीतल्या रिंकू पाटीलच्या बाबतीत घडले आणि आता एका उमलत्या प्राध्यापिकेच्या बाबतीतही घडले आहे. ​

अग्रलेख : विकृतीच्या झळा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

स्त्रीविषयीच्या आदराची आणि सन्मानाची भावना निर्माण करण्याचे आव्हान किती व्यापक आणि कठीण आहे, याची जाणीव हिंगणघाट येथील घटनेने करून दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात एका तरुण प्राध्यापिकेचा पाठलाग करून तिला अत्यंत निर्दयपणे पेटवून देण्यात आले. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’वाल्यांच्या देशात हे घडले आहे. यापूर्वी अनेकदा घडले आहे. काही दशकांपूर्वी दहावीतल्या रिंकू पाटीलच्या बाबतीत घडले आणि आता एका उमलत्या प्राध्यापिकेच्या बाबतीतही घडले आहे.

कधीतरी समाज याचा गांभीर्याने विचार करणार की नाही? हा नराधम युवतीवर पेट्रोल ओतत असताना काही जण व्हिडिओ शूट करीत होते. ही संवेदनबधिरता चिंताजनक आहे. अशा घटनांना ‘एकतर्फी प्रेमातून’ झालेले कृत्य म्हणण्याची पद्धत आहे. ती ताबडतोब बंद केली पाहिजे. प्रेम म्हणजे काय, हेच न कळलेल्या विकृत मानसिकतेतून असे गुन्हे घडतात. एखाद्या व्यक्तीविषयी आदराची भावना नसेल तर कसले प्रेम? ही तर केवळ मालकी हक्काची जाणीव. स्त्री ही माणूस आहे आणि तिला मन आहे, स्वीकार किंवा नकाराचे स्वातंत्र्य आहे, हा विचारच अद्याप पचनी न पडलेल्या समाजात असे गुन्हे घडतात. त्यामुळेच हे आव्हान व्यापक आहे. 

सर्वदूर व्याप्ती असलेल्या राजकीय प्रक्रियेतून लोकशिक्षण व्हावे, प्रसारमाध्यमांतून मूल्यांची रूजवण व्हावी, कुटुंबातून-घरांतून आणि शिक्षणसंस्थांतून चांगले संस्कार व्हावेत, या अपेक्षाच चुकीच्या वाटाव्यात, असे वातावरण तयार झाले आहे काय, याचा विचार करण्याची ही वेळ आहे. अलीकडे आपला समाज केवळ दुभंगलेला नाही. एकेकाळी बहुढंगीपणाचा आदर करणारा हा समाज आता ‘बहुभंग’ झाला आहे.

भलत्याच संघर्षांमध्ये ऊर्जा खर्च होत आहे. माध्यमांतून तेच ते वाढले जातेय, हेही आपल्याला लक्षात येत नाही. मुलांच्या भौतिक गरजा भागत असल्या, तरी त्यांच्या मानसिक गरजांवर, संस्कारावर लक्ष देण्यात पालक कमी पडत आहेत. आपला मुलगा शाळेत काय शिकतो आहे, कुणाबरोबर बाहेर जातो, काय खातो-पितो याकडे पालकांचे दुर्लक्ष होते. मुलांना जणू काही साऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींचा परवाना असल्याच्या थाटात चाललेले असते. मुलींवर नको तितके निर्बंध आणि मुलगे सारे निरंकुश अशी स्थिती आजही अनेक घरांत दिसते. स्त्रीला सन्मान देणे, हा संस्कारच त्यामुळे होत नाही. ‘मला जे हवे, ते तत्काळ आणि विनासायास मिळाले पाहिजे, अन्यथा मला सहन होणार नाही’, ही जी मुलांची-मुलींची मानसिकता घरांमध्ये जोपासली जाते आणि ज्यासाठी मायबाप काबाडकष्ट करतात, त्यातून निर्माण होणारे प्रश्‍न आणखी वेगळे आहेत. 

पुरुषकेंद्री समाजात स्त्रीकडे एक वस्तू म्हणून पाहिले जाते. वस्तूवर मालकी गाजवता येते. विक्की नगराळे नावाच्या विवाहित पुरुषाचे प्रेम मालकीत शिरले. आपण विवाहित आहोत व आपल्या बायकोने सहा महिन्यांपूर्वी मुलीला जन्म दिलाय याचेही त्याला भान राहिले नाही. एक महिला (तिला अधिकारच नसताना) नकार देते कशी, अशीच त्याची मानसिकता असणार. त्यामुळे तो पूर्ण तयारीनिशी आला होता. तिच्या नकाराचा कायमचा पाडाव करण्याच्या इराद्याने आला होता. त्याने अग्निकांड घडवून आणले. ही एखाद-दुसरी अपवादात्मक घटना नाही. अनेक वेळा आणि अनेक ठिकाणी हे होत असते. कधी त्यात मुलीचे शरीर जळते, कधी भावविश्‍व उद्‌ध्वस्त होते, तर कधी आयुष्यातील कोवळीकच खाक होते. हे कधी थांबेल, असा प्रश्‍न आपण अशी घटना घडल्यावर एखाद-दुसरा दिवस विचारतो. पुढारी-पोलिस-प्रशासन कठोर कारवाईच्या घोषणा करतात. सामाजिक कार्यकर्ते स्वतःच अशा प्रश्‍नांचा निवाडा करणार असतात.

कुणीच मूळ दुखण्याकडे लक्ष देत नाही. खरे तर हे दुखणे आपल्या घरात निर्माण झाले आहे. आपण भौतिकदृष्ट्या पुढारत असलो तरी मानसिक रानटीपण बव्हंशी तसेच राहिले आहे. फक्त कायद्याचा धाक असे प्रकार रोखण्यासाठी पुरेसा नाही हे सिद्ध करणाऱ्या भीषण घटना घडत असतात. या प्रश्‍नाकडे कुटुंब, समाज, सरकार यांनी डोळसपणे पाहण्याची गरज आहे. अशा अनेक युवती अनेक विक्कींच्या निशाण्यावर असू शकतात. त्यांच्या पेट्रोलच्या बाटल्या आणि टेंभेही तयार असतील कदाचित.

घटना घडल्यावर कायद्याने जे व्हायचे, ते होतेच. ते थोडे वेगाने आणि निष्पक्षपणे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे होणार नाही. मात्र, चुकीच्या संस्कार प्रक्रिया, पुरुषीवर्चस्वाच्या जाणीवा याचे आपण काय करणार आहोत? यांपासून मुक्त होणार की नाही? स्त्री-पुरुष सहजीवनातील आनंदच समाज घालवून बसतो आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. एखाद्याला पाहून स्त्रीच्या नजरेत भीती दाटत असेल तर तो त्या पुरुषाच्या मर्द असण्याचा नव्हे, तर बदमाश असण्याचा पुरावा मानावा लागेल.

पुरुषकेंद्री वातावरणात स्त्रियांचे अर्धे जग गुदमरून जात असेल आणि त्यांना आगीच्या तोंडी दिले जात असतानाही आपल्या मुलग्यांच्या निरंकुश वागण्याचे कौतुक वाटत असेल तर हे वैचारिक दारिद्य्र लवकरात लवकर हटविण्याची गरज आहे.

loading image