esakal | अग्रलेख : उद्‌ध्वस्त धर्मशाळा!
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख : उद्‌ध्वस्त धर्मशाळा!

काँग्रेस पक्षाच्या फेररचनेची चर्चाही घराण्याभोवतीच फिरत राहावी, हे पक्षाची अवस्था किती बिघडली आहे, याचेच द्योतक आहे.

अग्रलेख : उद्‌ध्वस्त धर्मशाळा!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

एकशे पस्तीस वर्षांच्या आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीची धुरा वाहणाऱ्या ‘काँग्रेस’ नावाच्या पक्षाची अवघ्या पाच-सात वर्षांत इतकी दुर्दशा होईल, याची कोणी कल्पनाही केली नसेल. मात्र, २०१४मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने देशात एक वादळ आणले आणि या सर्वसामान्य जनतेच्या एकेकाळच्या आधारवडाची अवस्था ‘एक एक पान गळावया’, अशी होऊन गेली. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला शतकी मजल तर गाठता आली नाहीच; शिवाय लोकसभेत किमान विरोधी पक्षनेता हे पद मिळवता येईल, इतपतही खासदार निवडून आणता आले नाहीत. त्यानंतरही या पक्षाला वास्तवाचे भान आले नाही. आठ महिन्यांपूर्वी झालेल्या दुसऱ्या लढाईतही या पक्षाचे पुन्हा पानिपतच झाले. त्यानंतर अलीकडेच झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीतही गेल्या वेळेप्रमाणेच या पक्षाचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. पक्षातील शशी थरूर यांच्यासारख्या नेत्यांना त्यामुळेच काँग्रेसचा भविष्यकाळ दिसू लागलेला दिसतो. आता या पक्षाच्या भवितव्याबाबत ट्विटरबाजी सुरू झाली आहे. अर्थात, शशी थरूर असोत की संदीप दीक्षित असोत की उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत असोत; ही सारी चर्चा गांधी घराण्याभोवतीच घोटाळत आहे. थरूर यांनी पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी त्वरित निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केल्यावर संदीप दीक्षित यांनी दिल्लीच्या निवडणुकीत बड्या नेत्यांनी काहीच न केल्याची टिप्पणी केली आणि एका वादाला तोंड फुटले. त्यानंतर आपण याच घराण्याच्या पालखीचे प्रथम क्रमांकाचे भोई आहोत, हे दाखवून देण्यासाठी रावत मैदानात उतरले आणि त्यांनी पुनश्‍च एकवार पक्षाची सूत्रे राहुल यांच्याकडेच द्यावीत, असा सूर लावला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खरे तर लोकसभा निवडणुकीतील सलग दुसऱ्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर गांधी घराण्याची पालखी वाहणाऱ्यांनी कोणे एकेकाळी ‘चिरेबंदी वाडा’ असलेल्या या पक्षाच्या मुखत्यारपदाची जबाबदारी घ्यायला अन्य कोणालाच पुढे येऊ दिले नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे अध्यक्षपदाची सूत्रे खाली ठेवणाऱ्या सोनियांकडेच पुन्हा ती धुरा सोपविण्यात हे दरबारी राजकारणी यशस्वी झाले. काँग्रेसमध्ये आता फोफावलेल्या या दरबारी राजकारणाचा प्रारंभ सत्तरच्या दशकात इंदिरा गांधी यांच्याच काळात आणि त्यांच्याच प्रोत्साहनाने झाला आहे. त्या काळात केवळ ‘इंदिरा नामा’च्या गजरावर हा पक्ष निवडणुका जिंकत असे. मात्र, जनता पक्षाच्या लाटेत इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांनाच पराभूत व्हावे लागल्यावर मात्र पक्षाला उतरती कळा लागली. तरीही दरबारी आणि चमचेगिरीच्या राजकारणातून हे नेते बाहेर यायला तयार नाहीत आणि त्याचीच कटू फळे आता या पक्षाला चोहोबाजूंनी लगडली आहेत. थरूर यांच्यासारखा विचारवंतही या घराणेशाहीच्या महिम्यातून बाहेर यायला तयार नाही. त्यामुळेच ‘राहुल पुन्हा पक्षाची धुरा घ्यायला तयार नसतील तर प्रियांका हाच नैसर्गिक पर्याय आहे!’ असे ते बोलत आहेत. काँग्रेस पक्षापुढील मुख्य प्रश्‍न हा नेतेपदाबरोबरच धोरणाचाही आहे. गेली पाच-सात वर्षे हा पक्ष भाजप आणि विशेषत: मोदी उभे करत असलेल्या अजेंड्याच्या जाळ्यात गुरफटून गेला आहे. मोदी यांनी उभ्या केलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यातच गुंतून पडल्यामुळे स्वपक्षाचा काही अजेंडा वा कार्यक्रम वा धोरण असू शकते, हेच या पक्षाचे नेते विसरून गेले आहेत. त्यामुळेच हा नव्हे तर तो; पण ‘गांधी’च याशिवाय नेतेपदासाठी दुसरे नावही घेण्याची हिंमत या पक्षाच्या नेत्यांमध्ये उरलेली नाही. 

गांधी घराण्याशिवाय काँग्रेस पक्ष देशावर राज्य करू शकतो, हे राजीव गांधी यांच्या निर्घृण हत्येनंतर अपघाताने पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरसिंह राव यांनी दाखवून दिले होते. मात्र, नंतर सीताराम केसरी यांच्या हातात पक्ष गेला आणि त्यातून या चिरेबंदी वाड्याची दुर्दशा झाली. त्यानंतर लगेचच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी काही हालचाली करण्याऐवजी सोनिया गांधी यांना साकडे घातले आणि त्याची परिणती अखेर २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे सत्तेची फळे चाखण्यात गेली. आताही पुन्हा त्याच मार्गाने जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे काँग्रेसजनांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे; कारण मोदी तसेच अमित शहा यांनी वेगळेच ‘नॅरेटिव्ह’ उभे केले आहे. केवळ गांधी नावाचा महिमा त्यास पुरा पडणार नाही. त्यासाठी मैदानात उतरून तळागाळात जाऊन, झडझडून काम करावे लागेल. त्यास कोणाचीच तयारी नसल्यामुळे पुन्हा पुन्हा गांधीजप सुरू आहे. त्यामुळे या पक्षाचे भले होण्याऐवजी तो अधिकच रसातळाला जाईल. मात्र, ते वास्तव स्वीकारायची कोणाचीच तयारी नाही, हाच या साऱ्याचा अर्थ आहे.

loading image