esakal | अग्रलेख : अफवांची कीड
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi-Riot

देशाच्या राजधानीत भडकलेली हिंसक दंगल आता शमली असली, तरी ही महानगरी अद्यापही कशी धुमसत आहे, त्याचे प्रत्यंतर गेल्या रविवारी सायंकाळी आले. त्या दिवशी सायंकाळी अचानक पुन्हा एकदा दिल्लीत हिंसाचार सुरू झाल्याच्या बातम्या समाजमाध्यमांवरून एका मागोमाग प्रसृत होऊ लागल्या आणि पुनश्‍च एकवार दिल्लीकरांचा जीव टांगणीला लागला. या नुसत्या बातम्याच नव्हत्या, तर त्यात काही चित्रफितीही होत्या.

अग्रलेख : अफवांची कीड

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

देशाच्या राजधानीत भडकलेली हिंसक दंगल आता शमली असली, तरी ही महानगरी अद्यापही कशी धुमसत आहे, त्याचे प्रत्यंतर गेल्या रविवारी सायंकाळी आले. त्या दिवशी सायंकाळी अचानक पुन्हा एकदा दिल्लीत हिंसाचार सुरू झाल्याच्या बातम्या समाजमाध्यमांवरून एका मागोमाग प्रसृत होऊ लागल्या आणि पुनश्‍च एकवार दिल्लीकरांचा जीव टांगणीला लागला. या नुसत्या बातम्याच नव्हत्या, तर त्यात काही चित्रफितीही होत्या. मात्र, त्यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे हे संदेश वा चित्रफिती यांची कोणतीही खातरजमा करून न घेता, त्या वायुवेगाने पुढे पाठवण्याची अहमहमिका दिल्लीकरांतच नव्हे, तर देशभरातील समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या फाजील उत्साही लोकांमध्ये सुरू झाली. मग असा कोणताही हिंसाचार दिल्लीत नव्याने सुरू झाला नसल्याची खातरजमा अखेर दिल्ली पोलिसांना करावी लागली आणि अर्थातच त्यांना त्यासाठीही समाजमाध्यमांचाच आधार घेणे भाग पडले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र, सर्वसामान्य नागरिक त्यांच्याकडे आलेल्या तद्दन खोट्या संदेशांवरच विसंबून राहिले. ही गत काही सर्वसामान्य माणसांचीच झाली, असे नाही, तर ‘दिल्ली मेट्रो’वरही त्याचा परिणाम झाला. रेल्वेची काही स्थानके काही काळासाठी का होईना प्रवाशांना बंद करण्यात आली. त्याचा परिणाम उलटाच झाला आणि त्यामुळे नव्याने हिंसाचार सुरू झाल्याचे संदेश पुन्हा प्रसृत झाले. दिल्ली पोलिसांनी अशा अफवा पसरवणाऱ्या लोकांना हुडकून काढण्याची मोहीम हाती घेतली असून, आतापावेतो किमान २४ संशयित समाजकंटकांना ताब्यात घेतले आहे. 

गेल्या काही वर्षांत देशातील किमान ७० कोटी लोकांच्या हातात स्मार्टफोन आले असून, त्या माध्यमातील ‘व्हॉट्‌सॲप’ विद्यापीठाच्या पदवीधारकांचे पीकही झपाट्याने पसरले आहे. त्यावरून येणारे संदेश कसलाही विचार न करता, म्हणजेच त्यातील माहितीची खातरजमा करण्याच्या भानगडीत न पडता झपाट्याने पुढे पाठविले जात आहेत. त्याचे भयावह परिणाम दिसू लागले आहेत. समाजात दुही माजवणाऱ्या द्वेषमूलक संदेशांचे प्रमाण फार मोठे आहे. त्यामुळे या माध्यमावरील गट हा मित्रांचा असो, कौटुंबिक असो की व्यावसायिक कारणांसाठी तयार झालेला असो; तेथे एकमेकांमध्येही विसंवादाची दरी निर्माण होताना दिसते. अशा समस्या समोर आल्या, की एक सोपा उपाय पुढे केला जातो, तो म्हणजे या माध्यमांवर बंदी घालण्याचा. बंदीच्या माध्यमातून कोणतेही उद्दिष्ट साध्य होत नाही, हे वास्तव अनेकवेळा सिद्ध झाले आहे. त्यामुळे माध्यमविवेक जागा करण्याची गरज आहे. त्यासाठी या माध्यमांच्या वापराच्या आचारसंहितेविषयी समाजात व्यापक प्रमाणात जागृती घडवायला हवी. नियमन यंत्रणाही अधिक कार्यक्षम करायला हव्यात. या समाजमाध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर तातडीने कारवाई होते, असा अनुभव सातत्याने आल्यास आवश्‍यक तो धाक निर्माण होऊ शकतो. 

गेल्या काही वर्षांत प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे कोणत्या चित्रफिती बनावट आहेत, हे शोधून काढता येणे सहज शक्‍य झाले आहे  दिल्लीतील दंगलीत पसरवल्या गेलेल्या अफवांच्या चित्रफितींचे अनेक दाखले ‘ऑल्ट न्यूज’ नावाच्या एका वेबसाईटने  दिले आहेत. ते बघितल्यावर असे बनावट व्हीडिओ बनवणारे समाजात द्वेष पसरवण्यासाठी कोणत्या थराला जातात, ते बघायला मिळते. मुस्लिम बिर्याणीविक्रेता कुटुंबनियोजनाच्या गोळ्या घातलेली बिर्याणी हिंदूंना विकत होता, अशी मध्यंतरी व्हायरल झालेली चित्रफीत बनावट होती. त्याचबरोबर युवतीवरील बलात्काराची पाकिस्तानी प्रसारमाध्यमातील चित्रफीतही बनावट निघाली. या वेबसाइटला अशा चित्रफितींचा खरेखोटेपणा पडताळून बघता येत असेल, तर ते काम आपल्या पोलिसांना तेवढ्याच तत्परतेने का जमू नये? अफवांची कीड नष्ट करण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

पोलिसांच्या ‘सायबर सेल’ने आता तरी धडाडीने हे काम हाती घेऊन, संबंधितांना जबर शिक्षा कशी होईल, हे पाहिले पाहिजे. अन्यथा, समाजमाध्यमांच्या वापरातून समाजात दुही निर्माण करून माथी भडकवण्याचे सध्या सुरू असलेले सत्र असेच सुरू राहील. दिल्लीतील दंगलीत समाजमाध्यमांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांत जे काही घडले, त्यापासून बोध घेऊन पोलिसांनी तातडीने कामाला लागणे जरूरीचे आहे. आपल्याला आलेला कोणताही संदेश खातरजमा न करताच पुढे पाठविला, तर काय होऊ शकते ते दिल्लीतील अफवांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे लोकांनीही हे माध्यम अधिक सजगतेने वापरण्याची गरज आहे. दिल्लीतील हिंसाचाराने आपल्याला दिलेला हा आणखी एक धडा आहे.

loading image