अग्रलेख : अजब न्याय झुंडीचा!

Crime-Scene
Crime-Scene

लोक कायदा हातात घेऊ पाहत असतील, तर ते धोकादायक आहे. गुन्हा करणाऱ्यांवर जरब बसेल अशी कारवाई आणि तीही तातडीने करण्याची गरज आहे.

पालघर तालुक्‍यात जमावाने तीन जणांना गुरुवारी मध्यरात्री अक्षरशः ठेचून मारले. झुंडीच्या हिंसाचाराचा (मॉब लिंचिंग) हा प्रकार संवेदना जाग्या असलेल्या प्रत्येकाच्या मनाचा थरकाप उडवणारा तर आहेच; पण त्याचबरोबर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीबाबतही काळजी वाटायला लावणारा आहे. झुंडीने हे क्रूरकर्म पोलिसांच्या साक्षीने केले होते. हा जमाव इतक्‍या इरेला पेटला होता की पोलिसांनी त्या तिघांना आपल्या गाडीत घातल्यावरही झुंडशाहीने अखेर त्या तिघांचा बळी घेतला. झुंडबळी मग तो कोणाचाही असो; त्यावर तातडीने कारवाई करणे, हे जाणत्या सरकारचे पहिले कर्तव्य असायला हवे. पालघर तालुक्‍यात बळी पडलेल्या या तिघांमध्ये त्र्यंबकेश्‍वर येथील प्रख्यात हनुमान मंदिराचे पुजारी महंत कल्पवृक्षगिरी तथा चिकणे महाराज यांचा समावेश असल्यामुळे या झुंडबळीच्या प्रकाराला वेगळेच वळण लागू पाहत आहे.

सध्याच्या अस्वस्थतेच्या काळात तसे होणे कोणाच्याच हिताचे नसले, तरी त्याहीपेक्षा निषेधाची बाब म्हणजे गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख तोंडात मिठाची गुळणी धरून बसले होते. रविवारी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. मात्र, जनतेचे समुपदेशन करताना, उद्धव ठाकरे यांनी कायदेकानू धाब्यावर बसवून झुंडशाहीने केलेल्या या तिघांच्या हत्येबद्दल चकार शब्दही उच्चारला नाही. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेचे व्हिडिओ गेल्या दोन दिवसांत व्हायरल झाल्यावर हे प्रकरण आपल्या अंगाशी येऊ शकेल, अशी जाणीव सरकारला झाली. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री पुन्हा एकदा जनतेसमोर आले आणि त्यांनी या दुर्दैवी घटनेचा साद्यंत तपशील विशद केला. सरकारने धरपकड सुरू करून शंभराहून अधिक लोकांवर गुन्हे दाखल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रसार माध्यमांनी तसेच भारतीय जनता पक्षाने हे प्रकरण पहिल्या दिवसापासूनच लावून धरले होते. मात्र, आता केंद्र सरकारही यात लक्ष घालत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून, या घटनेचा तपशील मागवला आहे. तर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबरच विविध आखाड्यांचे धर्मगुरूही यानिमित्ताने राजकारण करू पाहत असल्याचे दिसू लागले आहे.

झुंडबळींची घटना निषेधार्ह आहेच आणि त्यावर कठोर कारवाईचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतरही त्या घटनेचा वापर राजकीय हेतूंसाठी करणे, हेही तितकेच निषेधार्ह आहे. त्याचवेळी ही घटना नेमकी कशामुळे घडली, हा तपशीलही जाणून घ्यायला हवा. महंत कल्पवृक्षगिरींच्या गुरुंचे सुरत येथे निधन झाल्यामुळे ही मंडळी मुंबईतून तिकडे जाण्यास निघाली होती.

आपल्या देशात अंत्यदर्शनाचे महत्त्व मोठे आहे आणि धार्मिक परंपरा मानणाऱ्यांना तर आपल्या गुरुचे अंत्यदर्शन घेण्याची इच्छा होणे, हे स्वाभाविकच होते. मात्र, "कोरोना'मुळे लागू करण्यात आलेल्या नियमांमुळे त्यांचे वाहन अडवून परत पाठवण्यात आल्यावरही या मंडळींना रस्ता बदलून पुढे प्रवास सुरू केला. तेव्हा एका चेक नाक्‍यावर त्यांना परत अडविले गेले. या परिसरात अलीकडे चोऱ्या वाढल्यामुळे जमावाला ते कोणी चोर आहेत, असे वाटले आणि बघताबघता जमावाचे रूपांतर झुंडशाहीत झाले. कुठून आली ही हिंसक वृत्ती? भीती आणि असुरक्षिततेची भावना त्यामागे असावी असे दिसते. प्रसंगी या भावनेतून काय उत्पात घडू शकतात, याचा भीषण प्रत्यय या घटनेने आला.      

आपल्या देशात अलीकडील काळात झालेल्या काही झुंडबळींना धार्मिक विद्वेषाची पार्श्‍वभूमी असली, तरी या घटनेला मात्र तसा कोणताही जातीय वा धार्मिक रंग नव्हता, हे मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले आहे. तरीही झुंडीच्या उन्मादात एकही पोलिस वा अन्य कोणी जखमी झाला नाही आणि फक्‍त महंतासह अन्य दोघे मृत्युमुखी पडल्याने अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

महाराष्ट्र सरकारने दोन पोलिसांना निलंबित केले असून, या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचाही निर्णय घेतला आहे. झुंडीला जात वा धर्म नसतो, हे लक्षात घेतले पाहिजे. गेला जवळपास महिनाभर ठाणबंद होऊन राहणे भाग पडल्यामुळे लोकांना काय करावे, ते कळेनासे झाले आहे, हे खरेच आहे. मात्र, पोलिसांच्या निगराणीखाली असलेल्या चेक नाक्‍यावर मध्यरात्रीच्या वेळी हा एवढा मोठा जमाव कशासाठी हजर होता, या प्रश्‍नाचे उत्तरही या चौकशीतून मिळायला हवे. पोलिस आपले संरक्षण करण्यास असमर्थ आहेत, अशी भावना निर्माण होऊन लोक कायदा हातात घेऊ पाहत असतील, तर ते अत्यंत धोकादायक आहे आणि त्यातून काय होऊ शकते, तेच यानिमित्ताने पुढे आले आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने जरब बसेल अशी कारवाई आणि तीही तातडीने करण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com