esakal | अग्रलेख : सिनेमा आणि घर!
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown-India

लॉकडाउनचा पाढा पुढे पुढे चालूच राहिल्याने घरातच गांजून गेलेल्या कोट्यवधी भारतीय सिनेमावेड्यांसाठी पुढला महिना जरा बरा जाण्याची शक्‍यता आहे. कारण जून महिन्याच्या बारा तारखेला अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणाचा ‘गुलाबो सिताबो’ हा हिंदी चित्रपट वाजत गाजत प्रदर्शित होईल.  त्याचा प्रीमियर शो होणार आहे, तुमच्या-आमच्या घरात!

अग्रलेख : सिनेमा आणि घर!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लॉकडाउनचा पाढा पुढे पुढे चालूच राहिल्याने घरातच गांजून गेलेल्या कोट्यवधी भारतीय सिनेमावेड्यांसाठी पुढला महिना जरा बरा जाण्याची शक्‍यता आहे. कारण जून महिन्याच्या बारा तारखेला अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणाचा ‘गुलाबो सिताबो’ हा हिंदी चित्रपट वाजत गाजत प्रदर्शित होईल.  त्याचा प्रीमियर शो होणार आहे, तुमच्या-आमच्या घरात!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कुठेही न जाता रिमोट कंट्रोलची चार बटणे दाबली, की हा चित्रपट घरबसल्या, सोफ्यावर किंवा पलंगावर हात-पाय पसरून आरामात पाहाता येईल. तेही फर्स्ट डे, फर्स्ट शो! तेवढ्यात एखादा महत्त्वाचा फोन आला, तर पॉजचे बटण दाबून थोडावेळ चित्रपट थांबवताही येईल. वेळ मिळेल तसा हप्त्याहप्त्यांतही बघायची सोय आहेच. कोरोना विषाणूने घातलेल्या मृत्यूच्या नृशंस थैमानाला ही रूपेरी किनार लाभली आहे, ती गेली काही वर्षे तरुणाईच्या हातातल्या मोबाइल फोनमध्ये किंवा घरातल्या टीव्हीच्या पडद्यावर नवे जादुई विश्व उलगडणाऱ्या ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्ममुळे. इंटरनेट आणि ‘वायफाय’च्या दुहेरी वरदानांमुळे हे शक्‍य होते आहे. अर्थात ही घटना क़्रांतिकारी खरीच, पण ती चंदेरी दुनियेच्या मुळावर उठणार आहे की नवा नवलाईचा प्रदेश उघडून देणार आहे, हे येणारा काळच ठरवेल.

अमिताभचा हा भव्य चित्रपट ‘अमेझॉन प्राइम’ या ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटाच्या निर्मात्यांनी काहीशा अपरिहार्यतेतूनच घेतला, हे मान्य करावे लागेल. संधी असती तर त्यांनी चित्रपटगृहांचा मार्गच निवडला असता. पण एका लॉकडाउनमधून दुसऱ्या लॉकडाउनमध्ये जाताना हात बांधून उगेमुगे राहावे की संकटातही अर्थचक्र चालू ठेवण्याची काही संधी शोधावी? या पर्यायापैकी चित्रपटसृष्टीने अखेर दुसरा पर्याय निवडला, कारण आता प्रश्न खरोखर जीवन-मरणाचा झाला आहे. तसे पाहता ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्म आता भारतीयांना नवे नाहीत. बव्हंशी सगळेच चित्रपट आज ना उद्या या माध्यमात शिरकाव करून घेतातच.

चित्रपटगृहांतून पुरेसा गल्ला गोळा करून झाला की ‘ओटीटी’मार्फत चित्रपट घरोघरी पोचवण्याचा प्रघातच हल्ली पडून गेला आहे. परंतु, या माध्यमाद्वारे थेट चित्रपट प्रदर्शितच करण्याची ही हिंदी चित्रपटांची पहिलीच वेळ आहे. खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात ‘ट्विटर’वर केलेली टिप्पणी बरीच बोलकी आहे. ‘गुलाबो सिताबो’च्या बरोबरीने अर्धा डझन बंगाली, कन्नड आणि मल्याळी चित्रपटही याच मार्गाने प्रदर्शित होणार आहेत. ही भविष्याची चुणूक तर नाही ना? हा खरा सवाल आहे. या साऱ्या घडामोडींचे स्वागत करावे की हिरमुसावे, असा प्रश्न काही रसिकांना पडेल, तर काहींना वाटेल की, एवढ्या मोठ्या संकटाच्या काळात एका चित्रपटासाठी इतकी उठाठेव कशासाठी? एवढे काय अडले आहे?  

भारतासारख्या चित्रपट आणि क्रिकेटच्या दिवाण्यांच्या देशात चंदेरी दुनियेचे महत्त्व वेगळे सांगायला नको. आजमितीला भारतीय चित्रपटसृष्टी वर्षभरात जवळपास १८० अब्ज रुपयांची उलाढाल करते. अक्षरश: हजारो, नव्हे, लाखो लहान-थोर कलाकार आणि तंत्रज्ञांची ही मनोहारी दुनिया आहे आणि तीदेखील शंभर टक्के लोकाश्रयावर जगणारी! इथे लॉकडाउनच्या काळात ‘आयपीएल’ खेळवायला काय हरकत आहे? असेही विचारणारे लोक आहेत, आणि पहाटे पाच वाजता रजनीकांतच्या चित्रपटाचे साग्रसंगीत प्रदर्शन मांडणारेदेखील याच देशाचे रहिवासी आहेत. बंद पडलेल्या चित्रगृहांमधल्या रिकाम्या खुर्च्यांवर धुळीचे थर जमा होत असताना मनोरंजनाचे हे विश्व असेच निमूटपणे विलयाला जाताना बघणे दुष्करच झाले असते. ‘ओटीटी’ने मात्र या सृष्टीला मदतीचा हात देऊ केला आहे. ‘आयनॉक्‍स’ या चित्रपट प्रदर्शनाच्या क्षेत्रात दबदबा असलेल्या कंपनीने मात्र ‘गुलाबो सिताबो’च्या निर्मात्यांच्या नावे बोटे मोडली आहेत. संकटाच्या काळात आपलेच साथीदार असे सोडून गेल्यास चित्रपटीय ‘मूल्य साखळी’ला गंभीर इजा होणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. ही भीतीदेखील अनाठायी नसली, तरी पूर्णत: सत्य वाटत नाही. कारण  चित्रपट म्हणजे साराच ‘लार्जर दॅन लाइफ’ मामला असतो. तो ७० एमेमच्या पडद्यावर, डॉल्बीच्या सुस्पष्ट ध्वनियंत्रणेनिशी पॉपकॉर्न, समोसे आदीकरोन सामग्री छातीशी धरून जिव्हाळ्याच्या साथसोबतीनिशीच बघावा, हा एक संस्कार आहे.

‘ओटीटी’ ही निव्वळ सोय आहे. चित्रपटाचा तो सारा माहौल त्याच्यासोबत येत नाही. अंधाऱ्या थिएटरातल्या खुर्च्या ओलांडताना धडपडणे, तो सामूहिक हशा किंवा मुसमुसणे, भावभावनांचा कल्लोळ हे सारे घरबसल्या चित्रपट बघताना आपोआप वजा होते. तरीही घरोघरी आजही सिनेमे बघितले जातातच. पण त्यात आजवर ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’चा अंतर्भाव नव्हता. हे चित्र आता बदलेल. भविष्यकाळात बिल्डर मंडळी अनेक सोयीसुविधांच्या यादीसोबत तुमचं स्वत:चं ‘होम थिएटर’ असेही कलम आपल्या जाहिरातीत जोडतील, अशी शक्‍यता नाकारता येत नाही. अर्थात कितीही झाले तरी भारतीय मानसिकतेला ‘ओटीटी’चा पर्याय संपूर्णत: मान्य होईल, हे कठीणच.

म्हणूनच लॉकडाउननंतरच्या काळात भारतीय रसिक चित्रपटगृहांना रिकामे ठेवणार नाहीत, याचीही खात्री वाटते. चंदेरी दुनियेचे  हे स्थित्यंतर नसून, विस्तार मानायला हवा.

loading image