
अवघे जग ‘कोरोना’च्या संकटाशी मुकाबला करू पाहत असताना, याच विषाणूचे उगमस्थान असलेल्या चीनला आपल्या विस्तारवादी धोरणाचा विसर तर पडलेला नाहीच; पण त्या देशाची भारताबरोबर संघर्षाची खुमखुमीही उफाळून येत असल्याचे दिसते. चीन पूर्णपणे ‘कोरोना’मुक्त झाल्याचा दावा तेथील राज्यकर्ते करीत आहेत. याबाबत नेमके वास्तव जगापुढे येण्यात तेथील बंदिस्त व्यवस्थेमुळे अनेक अडचणी आहेत.
अवघे जग ‘कोरोना’च्या संकटाशी मुकाबला करू पाहत असताना, याच विषाणूचे उगमस्थान असलेल्या चीनला आपल्या विस्तारवादी धोरणाचा विसर तर पडलेला नाहीच; पण त्या देशाची भारताबरोबर संघर्षाची खुमखुमीही उफाळून येत असल्याचे दिसते. चीन पूर्णपणे ‘कोरोना’मुक्त झाल्याचा दावा तेथील राज्यकर्ते करीत आहेत. याबाबत नेमके वास्तव जगापुढे येण्यात तेथील बंदिस्त व्यवस्थेमुळे अनेक अडचणी आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
आपल्या लष्कराच्या शक्तीचे प्रदर्शन करणे आणि आक्रमक भूमिका घेऊन भारतावर दबावतंत्राचा वापर करणे, यामागे त्या दाव्याला पुष्टी मिळावी हा हेतूही असू शकतो. देशांतर्गत प्रश्नांवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न यामागे असणार. भारताला कमालीच्या सावधपणे, ठामपणे आणि कौशल्याने हा प्रश्न हाताळावा लागेल.
भारताच्या सीमेवरील लडाख हे सृष्टीसौंदर्यासाठी जगभरातील एक नयनरम्य स्थान म्हणून गणले जाते. या परिसरातील नितांत शांततेत एक खडा टाकण्याचे काम चीनने केले आहे. चीनने या परिसरात सुरू केलेल्या कारवायांची गंभीर दखल भारताने घेतली असून, तीन वर्षांपूर्वी डोकलाम भागात झालेल्या खडाखडीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लेह-लडाख हा आपल्या देशाच्या अविभाज्य भाग असून, तेथे रस्तेबांधणी वा विमानतळ उभारणी अशी पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देणारी कामे वर्षानुवर्षे सुरू आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांत भारताने ‘काराकोरम पास’नंतरच्या आपली शेवटची चौकी असलेल्या दौलतबाग ओल्डी परिसरात रस्ता, तसेच विमानतळ उभारणीचे काम सुरू करताच चीनच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आणि तेथे मोठ्या प्रमाणात सैन्याची जमवाजमव चीनने सुरू केली आहे, एवढ्यापुरती ही कारवाई मर्यादित नाही. गेल्या १५ दिवसांत या परिसरातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन वेळा थेट संघर्षही झाला आहे. सैन्याची ही जमवाजमव चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मार्फत सुरू असून, तेथे दाखल झालेल्या दोन ब्रिगेड्स बघता हा निर्णय सीमेवरच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून झालेला नसून, त्यास थेट बीजिंगहून हिरवा कंदिल मिळाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
अर्थात, भारत सरकारने डोकलाम प्रकरणात मिळालेल्या अनुभवानंतर आता खंबीर भूमिका घेतली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून आत घुसण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा नि:संदिग्ध पवित्रा भारताने घेतला आहे. तो योग्यच आहे. अर्थात, भारताने घेतलेल्या या पवित्र्यानंतर चीनने किमान काहीसा नरमाईचा देखावा उभा करण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. लडाखच्या सीमेवर समोरासमोर उभ्या ठाकलेल्या दोन्ही देशांच्या सैनिकांची खडाखडी सुरू असताना, चीनचे भारतातील राजदूत सुन वेईडोंग यांनी ‘भारत व चीन यांना एकमेकांपासून धोका नसल्याचे’ उद्गार नवी दिल्लीत काही मोजक्या मान्यवरांसोबतच्या संवादात काढले आहेत.
त्यास थेट बीजिंग येथून दुजोरा देण्याचे काम चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी केले आहे. लडाख परिसरातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपाशी दोन्ही देशांच्या सैन्याची जमवाजमव झाली असली, तरी परिस्थिती नियंत्रणाखाली आहे आणि संवादातून या प्रश्नावर तोडगा निघू शकतो, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. मात्र, चीन ज्या पद्धतीने येथे मोठी शस्त्रास्त्रे, तसेच सैन्याची व्यूहरचना करत आहे, ते बघता चीनची उक्ती आणि कृती यात विसंगती आहे हे स्पष्ट दिसते आहे.
चीनच्या राजनैतिक मुत्सद्यांनी ग्वाही दिल्यानंतरही सैन्य माघारीबाबत तो देश कोणतेच पाऊल उचलायला तयार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. एकूणच हा पेच भारताला राजनैतिक कौशल्य आणि व्यूहरचना या दोन्ही बाबतीत आपल्याच बळावर हाताळावा लागेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकीकडे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यामधून अंग काढून घेत आहेत आणि त्याचवेळी भारत-चीन यांच्यात सीमाभागात निर्माण झालेल्या तणावाची बातमी येताच मध्यस्थीची तयारी असल्याचे ‘ट्विट’ करून मोकळे होतात! एका वेगळ्या अर्थाने त्यांचीही सध्याच्या काळात आपले सामर्थ्य अधोरेखित करण्याची राजकीय गरज लपून राहणारी नाही. डोकलाम परिसरात चीनने निर्माण केलेल्या तणावानंतर भारताला तब्बल ७३ दिवस संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे आता चिनी राजनैतिक मुत्सद्यांच्या ओठावरील शब्द काहीही सांगत असले, तरी भारताला लडाखमध्ये अत्यंत सावधगिरीने पावले उचलावी लागणार आहेत. खरे तर आजमितीला ‘कोरोना’ प्रकरणानंतर अनेक मोठ्या देशांनी चीनशी असलेल्या आर्थिक संबंधांबाबत फेरविचार करायला सुरुवात केली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या चीनमधून काढता पाय घेत आहेत. अमेरिकी नेते सातत्याने ‘कोरोना’संदर्भात चीनवर आरोप करीत आहेत. याचा यत्किंचितही परिणाम आपल्यावर झालेला नसल्याचे चिनी राज्यकर्ते दाखवू पाहत आहेत. ‘ड्रॅगन’ फणा काढत आहे तो या पार्श्वंभूमीवर. हाँगकाँगमधील वाढता विरोध दडपण्यासाठीदेखील चीन सरसावला आहे. एकूणच इतिहास लक्षात घेऊन भारताने चीनबाबत सदैव सावध राहणे गरजेचे आहे, यात शंका नाही.