अग्रलेख : बिहारमधील बिगुल

BJP
BJP

देशभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरू असताना आणि बिहारमध्ये बाधितांच्या संख्येने पाच हजारांचा आकडा ओलांडला असताना, भारतीय जनता पक्षाला त्या राज्यात चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. देशातील ठाणबंदी उठवण्याच्या पहिल्या टप्प्यातील शिथिलीकरणास सोमवारपासून सुरुवात होत असतानाच, रविवारी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी बिहारी जनतेला साद घातली आणि ‘नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील आघाडी दोन तृतीयांश बहुमत मिळवेल!’ अशी ग्वाही दिली. निवडणूक प्रचाराचे एक नवे युग शहा यांनी या ‘डिजिटल रॅली’मुळे सुरू केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शहा यांचे हे विचार बिहारी जनतेपर्यंत पोचावेत म्हणून त्या राज्यात ७२ हजार ‘लेड’ टीव्ही ठिकठिकाणी लावण्यात आले होते. बिहारमध्ये भाजप, तसेच नितीशकुमार यांचे जनता दल (यु) यांच्या आघाडीच्या विरोधात सर्वात मजबूत पक्ष अर्थातच लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हा आहे आणि त्या पक्षाची निशाणी कंदिल म्हणजेच ‘लॅण्टर्न’ ही आहे. ते ध्यानात घेऊनच शब्दांचे खेळ करण्यात मशहूर असलेल्या भाजपच्या देशातील या पहिल्या-वहिल्या ‘डिजिटल रॅली’ची घोषणा होती ‘लॅण्टर्न ते लेड’! अर्थात तंत्र आधुनिक वापरले असले, तरी मुद्दे नवे नव्हते. शहा यांनी या आपल्या भाषणात लालूप्रसादांच्या ‘राजद’वर थेट हल्ला चढवला नाही. आणीबाणी, इंदिरा गांधी यांची राजवट आदी अनेक विषय त्यांनी उपस्थित केले. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या पर्वात पाकिस्तानवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’च्या आठवणी त्यांनी जागवल्या. एका अर्थाने भाजपने येत्या ऑक्‍टोबरमध्ये बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणूक प्रचाराची नांदीच या सभेच्या माध्यमातून गायली आणि ते लक्षात घेऊनच ‘राजद’ने राज्यभरात त्याविरोधात आंदोलनही केले.

मात्र, शहा यांच्या मते या डिजिटल रॅलीत राजकारण ते काहीच नव्हते! होता तो केवळ बिहारी जनतेशी संवाद. त्यामुळेस या रॅलीचे नामकरण ‘जनसंवाद रॅली’ असे केले गेले होते! शहा यांच्या म्हणण्यानुसार, या रॅलीचा निवडणुकीशी काही संबंध नसून, जनतेशी संवाद साधण्याचे संस्कार आपण विसरू शकत नसल्यामुळेच हा जनसंवाद आयोजित करण्यात आला होता. मात्र, ‘कोरोना’ काळात आवर्जून साधण्यात आलेल्या या संवादात ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडलेल्यांविषयी ‘संवेदना’ व्यक्‍त करण्यापलीकडे होते ते फक्‍त राजकारण आणि बिहारची गौरवगाथा. खरे म्हणजे लालूप्रसाद, तसेच ‘राजद’ यांना त्यांनी लक्ष्य करायला हवे होते. मात्र, त्याऐवजी त्यांनी काँग्रेसवरच निशाणा साधणे पसंत केले.

‘कोरोना’संबंधात मोदी सरकारच्या  ठाणबंदीसंबंधातील धोरणाच्या विरोधात आवाज उठवला आहे तो राहुल गांधी यांनीच. यापलीकडे त्याचे दुसरे कारण असू शकत नाही. त्यामुळेच आता बिहार विधानसभा निवडणूक जिंकून, ‘कोरोना’बाबतच्या सरकारी उपाययोजनांना जनतेची कशी संमती आहे, हे दाखवून देण्याचा शहा, तसेच भाजप यांचा उद्देशही उघड झाला. बिहारच्या निवडणुकीचे बिगुल अशा रीतीने फुंकल्यानंतर कोरोना विषाणूविरोधातील कारवाईचे ढोल पुढचे चार महिने वाजविण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. त्यामुळेच बिहारच्या निवडणुका तेथील स्थानिक जनतेचे प्रश्‍न, स्थलांतरित बिहारी कामगारांना ‘स्वगृही’ परतण्यात नितीशकुमार यांनी उभ्या केलेल्या अडचणी असे अनेक मुद्दे बाजूला सारत ही निवडणूक म्हणजेच जनतेचा ‘कोरोनासंबंधातील उपाययोजनांना संपूर्ण देशाने दिलेला कौल’ असा रंग देण्याचा भाजपचा इरादाही स्पष्ट झाला आहे.

बिहारमध्ये पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुका नितीशकुमार व लालूप्रसाद यादव या पारंपरिक विरोधकांनी हातात हात घालून लढवल्या होत्या आणि त्यामुळे भाजपला मोठा फटका बसला होता. मात्र, नंतरच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच नितीशकुमार यांनी लालूप्रसादांशी काडीमोड घेत पुनश्‍च भाजपशी म्हातूर लावले आणि आपली गादीही कायम राखली. भाजप, नितीशकुमार आणि रामविलास पासवान यांच्या आघाडीने नंतर लोकसभा निवडणुकीतही मैदान मारले. अर्थात, त्यानंतर अनेक निवडणुकांत जनता राज्य आणि केंद्र पातळीवर वेगळा विचार करून मतदान करते हे दिसून आले आहे. मध्य प्रदेश व राजस्थानात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारल्यावरही नंतरच्या लोकसभा निवडणुकीत मात्र या दोन्ही राज्यांत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती, हे लक्षात घ्यायला हवे. मात्र, रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग यांनी नेतृत्वाच्या मुद्यावरून काही वादळ उठविले असले, तरीही पासवान त्यामुळे तातडीने सत्ताधारी गोट सोडण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे तूर्तास तरी भाजपने या शहा यांच्या ‘डिजिटल रॅली’च्या माध्यमातून आपला अजेंडाच जाहीर केला आहे. आता ‘राजद’ आणि काँग्रेस आगामी निवडणुका एकत्र लढवतात काय आणि भाजपच्या अजेंड्याला ते कसे उत्तर देतात, यावरच ही रणधुमाळी आता नेमक्‍या कोणत्या दिशेने जाते, ते ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com