अग्रलेख : आशेचे किरण

CoronaVirus
CoronaVirus

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे एकीकडे जगभरातील अनेक धोरणकर्ते दिग्मूढ झाल्याचे चित्र दिसत असताना विज्ञानाच्या क्षेत्रात मात्र या विषाणू संसर्गावरील उपचाराची दिशा शोधण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांवर व लसींवर संशोधन सुरू आहे. सध्या वापरात असलेल्या औषधांचा कोरोनाच्या विषाणूंवर होणारा परिणामही तपासला जात आहे. जगभरात कोरोनावर १३५ हून अधिक लसींवर संशोधक काम करीत आहेत. होल व्हायरस व्हॅक्सिन, जेनेटिक व्हॅक्सिन, व्हायरल व्हेक्टर व्हॅक्सिन, प्रोटिन बेस्ड व्हॅक्सिन असे त्याचे प्रकार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लस तयार करण्यासाठी किमान सात ठळक टप्पे असतात. त्यामुळे लस तयार होण्यासाठी लागणारा कालावधी हा किमान वर्षभराचा असतो. परंतु, सध्याच्या आव्हानात्मक काळात जगभरातील शास्त्रज्ञ रात्र-दिवस एक करून लस तयार करण्यासाठी अक्षरशः युद्धपातळीवर काम करीत आहेत. याचबरोबर औषधांवरही मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू असून, या प्रवासातील एक उल्लेखनीय टप्पा म्हणून भारतातील ‘ग्लेनमार्क’ या कंपनीने तयार केलेल्या ‘फॅबिफ्लू’ या औषधाचा उल्लेख करता येईल. याशिवाय, जगभरात उपयोगी पडत असलेल्या ‘रेडमेसिविर’ या औषधाचे भारतात उत्पादन करण्याची परवानगी ‘हेटेरो’ आणि ‘सिप्ला’ या दोन कंपन्यांना मिळाली आहे. अर्थात, औषध बाजारात आले असले तरी धोका टळला, असे मानता येणार नाही.

त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सतत प्रयत्न करीत राहणे गरजेचे आहेच. पण, या संशोधनकार्याची दखल यासाठी घ्यायला हवी, की कितीही मोठे संकट आले, तरी हतबल न होता विज्ञानाची मदत घेऊन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन न सोडता केले जाणारे हे मानवी प्रयत्न प्रेरणादायी आहेत. अशा धडपडीतूनच माणसाच्या प्रगतीचा इतिहास साकारला आहे. 
भारतातील कोरोना रुग्ण आता दररोज किमान १३ हजारांच्या पटीत वाढत आहेत.

लॉकडाउन शिथिल केल्यापासून ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशावेळी फॅबिफ्लू हे औषध कोरोनाच्या रुग्णांना नवसंजीवनी ठरेल, असा आशेचा किरण निर्माण झाला आहे. जगभरात कोरोनाच्या साथीची दुसरी लाट येण्याचा धोका ‘जागतिक आरोग्य संघटने’ने व्यक्त केला आहे. भारतातील रुग्णसंख्या वाढत असली, तरी अजूनही कोरोनाच्या संसर्गाचा प्रस्फोट झालेला नाही, असे ‘जागतिक आरोग्य संघटने’चे म्हणणे आहे. कोरोनाचा प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असेल, तर त्यास सामोरे जाण्याचे दोन पर्याय आहेत. इतक्या सगळ्यांच्या उपचारांची व्यवस्था करीत राहणे अथवा समूहप्रतिकारशक्ती तयार होईल, याची वाट पाहणे.

समूहप्रतिकारशक्ती वाढायची झाल्यास, या आजाराची बाधा होऊन बरे झालेल्यांची संख्या किमान ६०-६५ कोटी व्हायला हवी. म्हणजे, एकूण लोकसंख्येतील साधारण निम्म्या लोकांना कोरोना होऊन ते त्यातून बरे व्हायला हवेत. किंवा त्यांच्या शरीरात लस टोचून प्रतिकारशक्ती वाढवायला हवी. सध्या लस काही उपलब्ध नाही, त्यामुळे या संकटाला सामोरे जाणे एवढेच आपल्या हातात आहे. या सगळ्या परिस्थितीचे वर्णन व अंदाज ‘इंडियन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ’च्या ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांसाठी दोन औषधे उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. ग्लेनमार्कच्या सिन्नर येथील प्रयोगशाळेत ‘फॅबिफ्लू’चे संशोधन झाले व हिमाचल प्रदेशातील प्रकल्पात त्याचे उत्पादन घेण्यात येणार आहे. जपानमधील फुजिफिल्म टोयामा केमिकल्सने ‘एन्फ्लूएंझा’वर ‘फेव्हीपिराविर’ हे औषध तयार केले होते. त्यातील मूळ घटकांचा वापर करून कोरोनावरील औषध तयार केले गेले.

कोरोनाची मध्यम लक्षणे असणारे रुग्ण या औषधामुळे बरे झाल्याचा कंपनीचा दावा आहे. ‘फेव्हीपिराविर’ औषधाचा उपयोग यापूर्वी रशिया, जपान आणि चीनमध्ये करण्यात आला आहे आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत. मधुमेह आणि हृदयविकार असणाऱ्या कोरोना रुग्णांनाही याचा उपयोग होणार आहे. या औषधाच्या कार्यपद्धतीमुळे ते विषाणूच्या प्रतिकृती निर्माण होण्याची प्रक्रिया मंदावण्यास मदत करते. सध्या भारतामध्ये कोरोनावरील उपचारांत ‘रेमडिसिविर’ आणि ‘टोसिलिझुमाब’ या औषधांचा वापर केला जातो. ही तिन्ही औषधे ‘अँटिव्हायरल’ आहेत. औषधांचा उपयोग ढोबळ मानाने दोन पद्धतींनी केला जातो. एक म्हणजे रोग होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक (म्हणजे लस) आणि दुसरा म्हणजे रोग झाल्यानंतर त्यातून बरे होण्यासाठी. ‘फॅबिफ्लू’ हे दुसऱ्या प्रकारातील औषध आहे.

डेक्सामिथेसोन, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, ‘ओवायए १’ अशी इतर औषधेही जगभरात वापरली जात आहेत. परंतु, या सर्व औषधांची उपयुक्तता पूर्णपणे सिद्ध झालेली नाही, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या संसर्गाच्या काळात ‘सार्वजनिक आरोग्य’ हा विषय केंद्रस्थानी आला आहे. आत्तापर्यंत या क्षेत्राची किती हेळसांड केली गेली आहे, हेही यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले. ही हेळसांड थांबविण्यासाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहण्याची गरज नाही. याबाबतीत तातडीने पावले उचलली पाहिजेत. प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत. सर्व आघाड्यांवर प्रयत्न करूनच समस्येतून बाहेर येता येईल; अन्यथा सगळ्यांनाच मोठी किंमत पुढच्या काळात मोजावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com