अग्रलेख : बंधनातील मुक्ती !

Crowd
Crowd

स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात आजचा दिवस हा एक ठळक नोंद करणारा दिवस आहे. गेल्या वर्षी याच पाच ऑगस्ट रोजी जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० संसदेने रद्दबातल ठरविले आणि याच दिवशी आज भारताच्या राजकीय रंगमंचावर अगदीच अकल्पित असे नवे नेपथ्य उभे करणाऱ्या राममंदिराचे भूमिपूजन अयोध्येत होत आहे. मात्र, ‘कोरोना’च्या सावटाखाली गेले साडेचार महिने ठाणबंद होऊन, घरकोंबड्याचे आयुष्य नशिबी आलेल्या सर्वसामान्यांच्या मनात आजच्या दिवसाची नोंद वेगळ्याच कारणाने होत आहे! ‘अनलॉक ३’ हे पर्व आजपासून सुरू होत असून, त्यामुळे आता ‘कोरोना’च्या सावटाला सोबत घेऊन, अधिक खुल्या आणि मुक्त वातावरणात आपण सारेच नवे आयुष्य सुरू करत आहोत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘कोरोना’शी मुकाबला करण्याची जबाबदारी आता केंद्र, राज्य सरकारे वा स्थानिक संस्था यांच्याकडून सगळीच नाही; पण बऱ्याच अंशी प्रत्येक नागरिकावर आलेली आहे. या बदलाचा योग्य तो अर्थ प्रत्येकाने नीट लक्षात घेतला पाहिजे. 

महाराष्ट्राच्या राजधानी मुंबापुरीत आता सर्व म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंची दुकाने आठवड्याचे सर्वही दिवस खुली ठेवण्यास मुभा मिळाली आहे. त्यामुळे मुंबापुरी पूर्वीसारखीच गजबजून जाणार आहे आणि अशीच काहीशी परिस्थिती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर गेली दीड-दोन दशके आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून गेलेले शॉपिंग मॉलही आता ग्राहकांसाठी खुले होत आहेत. ‘टाळेबंदीमुक्त’ च्या या नव्या पर्वात योग संस्था आणि जिम सुरू करण्याचाही निर्णय झाला आहे. मात्र, अद्यापही महानगरांतीलच नव्हे, तर लहान-सहान शहरांतीलही रस्ते व्यापून टाकणाऱ्या आणि दैनंदिन जीवनासाठी आवश्‍यक अशा असंख्य वस्तू थेट आपल्या हातात देणाऱ्या फेरीवाल्यांवरील बंदी कायम आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. अनेक बाबींवर गेल्या मार्चमध्ये गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला जारी केलेल्या ठाणबंदीनंतर जारी झालेले अनेक निर्बंध शिथिल होत असले, तरीही काही बंधने कायम आहेत. याचाच अर्थ या नव्या स्वातंत्र्यात आपल्याला ‘कोरोना’सोबतच जगायचे आहे. साडेचार महिन्यांनंतर मिळालेल्या या स्वातंत्र्याचा आनंद आहेच; मात्र तो उपभोगताना काही पथ्ये सर्वांनाच कसोशीने पाळावी लागतील. हे स्वातंत्र्य आपल्याला मिळत आहे, ते काही ‘कोरोना’ची साथ आपण परतवून लावली आहे म्हणून नव्हे, हे कटू सत्य सतत मनात जागे ठेवावे लागेल. कोरोना विषाणू अद्याप आपल्या सभोवतालातच आहे आणि अवघ्या दोनच दिवसांपूर्वी म्हणजे रविवारीच भारतातील कोरोनाबाधितांची संख्या जगात त्या दिवशी झालेल्या बाधितांपेक्षा अधिक आहे. त्या काळ्याकुट्ट रविवारी देशात ५३ हजार ६४१ लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.

त्याचबरोबर गेल्या एका आठवड्यातच बाधितांची भारतातील संख्या ही ब्राझीलला ओलांडून पुढे गेली असून, त्या आठवड्यात या दुर्दैवी आकडेवारीत आपल्यापुढे फक्त अमेरिका हा एकच देश होता. याचा अर्थ हे संकट अद्याप टळलेले तर नाहीच; उलट हा विषाणू अधिक जोमाने आपल्यावर स्वारी करू पाहत आहे. त्याला अर्थातच गेल्या महिनाभरात अनेक निर्बंध शिथिल करण्यात आल्यावर अत्यावश्‍यक असलेली पथ्ये न पाळण्याचे आपले बेजबाबदार वर्तनच कारणीभूत आहे. मात्र, हे असे संकट घोंगावत असले तरी त्यावरचा उपाय ‘पुनश्‍च ठाणबंदी!’ हा निश्‍चितच नाही. याच ठाणबंदीमुळे आपली अर्थव्यवस्था कोसळत गेली. असंख्य हात कामाविना रिकामे राहिले आणि साहजिकच त्यामुळे अनेकांची पोटेही रिकामीच राहिली. आता अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि या विषाणूने हिरावून घेतलेले कोट्यवधींचे रोजगार पुन्हा सुरू करण्यासाठीच आजपासूनचे हे आणखी मुक्त  वातावरण सरकार उभे करत आहे. त्यामुळे या स्वातंत्र्याबरोबरच असलेल्या ‘कोरोना’च्या सोबतीमुळे आपली जबाबदारीही काही पटींनी वाढली आहे. 

स्वातंत्र्य कधीच सहजासहजी मिळत नसते, त्यासाठी मोठी किंमत तर द्यावी लागतेच. ती अर्थातच आपण चुकती केली आहे. मात्र, स्वातंत्र्याबरोबरच जबाबदारीही येते. मोठ्या कष्टाने मिळवलेल्या या स्वातंत्र्यानंतर ही जबाबदारी पाळण्याचे भान आपल्याला सदोदित ठेवावे लागेल. देशाचा स्वातंत्र्यदिन  अवघ्या दहा दिवसांवर आला आहे. सद्यःस्थितीत हा राष्ट्रीय सणही आपल्याला संयमाने साजरा करावा लागणार आहे. त्या पाठोपाठ गणेशोत्सव आणि पुढे दसरा-दिवाळीसारखे सण आहेत. काळ तर मोठा कठीण आला, हे तर खरेच. मात्र, या कठीण काळातही आजपासून मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करतानाही संयम सोडता कामा नये. अन्यथा, या विषाणूला मुक्त संचारासाठीच वाव मिळेल आणि मग त्यातून बाहेर पडताना कराव्या लागणाऱ्या अकटोविकट प्रयत्नांत अनेकांची आयुष्ये उद्‌ध्वस्त होऊन जाऊ शकतात. आजपासून मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद आहेच; पण तो उपभोगताना कोरोना विषाणूंवर नियंत्रण आणताना रिकाम्या झालेल्या बेड्‌सवर तर जाऊन पडावे लागणार नाही ना, ही बाबही सर्वांनीच ध्यानात घेणे, हेच या स्वातंत्र्याचे ब्रीदवाक्‍य आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com