अग्रलेख : आता स्वप्न ‘रामराज्या’चे

Rammandir
Rammandir

स्वातंत्र्योत्तर भारताची राजकीय, सामाजिक, तसेच सांस्कृतिक दिशा आरपार बदलून टाकणारे एक स्वप्न १९८० या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तसेच त्या परिवारातील अनेक संघटनांनी देशापुढे उभे केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी अयोध्येत झालेल्या राममंदिराच्या भूमिपूजनामुळे, त्या दिशेने पहिले पाऊल टाकले गेले आहे. संघपरिवाराने देशापुढे हे स्वप्न उभे केले, तेव्हा ते कधीकाळी पूर्णत्वास जाऊ शकेल काय, याबाबत अनेकांच्या मनात संदेहच होता. मात्र, बघता बघता ‘रामलल्ला हम आयेंगे; मंदिर वही बनायेंगे!’ असा घोष देशभरातून दुमदुमू लागला. संघपरिवाराने दाखवलेल्या या स्वप्नपूर्तीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात भारतीय जनता पक्षाने उडी घेतली आणि या आंदोलनास वेगळेच परिमाण प्राप्त झाले. १९९०मध्ये ‘सोमनाथ ते अयोध्या’ ही लालकृष्ण अडवानी यांची  ‘रथयात्रा’ हे त्याचे ठळक उदाहरण.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यांनी या प्रश्नावर वातावरणनिर्मिती केली. त्यानंतरच्या तीन दशकांच्या काळात ‘रामजन्मभूमी मुक्‍ती आंदोलना’त अनेकांना प्राणांची आहुती द्यावी लागली. त्यामुळेच मोदी यांनी बुधवारी भूमिपूजनानंतर, या आंदोलनाची तुलना देशाच्या स्वातंत्र्य चळवळीशी केली. स्वातंत्र्याच्या आंदोलनात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली गरीब, श्रीमंत, शहरी, आदिवासी, दलित असे समाजाचे सर्व घटक जात-धर्म-भाषा-प्रांत असा भेद न मानता सामील झाले होते, त्याचप्रमाणे या मंदिर आंदोलनातही समाजातील सर्व घटक असाच भेदाभेद न मानता सामील झाले होते, हे मोदी यांनीच भाषणात सांगितले आहे. त्यामुळेच आता हे मंदिर उभे राहत असल्यामुळे समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन कारभार करण्याची जबाबदारीही शासनकर्त्यांवर आपसूकच आली आहे. आपल्या कल्पनेतील ‘रामराज्या‘चा तपशीलवार आराखडा आता त्यांनी सादर करावा.

वाल्मिकींच्या ‘रामायणा’तून ‘रामकथा’ कोणे एकेकाळी आपल्यापुढे संस्कृतमधून साकार झाली खरी; पण ती समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत नेऊन पोचवण्याचे काम तुलसीदासांनी आपल्या प्राकृतातील ‘रामचरितमानस’ या ग्रंथातून केले. हीच कथा कबीरानेही सांगितली आणि नानक यांनीही. पुढे महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीतही रामभजनांचा गजर केला होता, याचाही दाखला मोदी यांनी दिला. केवळ भारताच्या अनेक प्रांतातच नव्हे, तर कंबोडिया आणि अन्य देशांतही आज ही कथा गायली जाते. मात्र, या राममंदिराचा पाच शतकांचा प्रवास हाही प्रत्यक्ष ‘रामकथे’इतकाच चित्तचक्षूचमत्कारी आहे. मोगल बादशहा बाबर याचा सेनापती मीर बाँकी याने १५२८-२९ मध्ये अयोध्येत मशीद बांधली, ती प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानावर असलेले मंदिर जमीनदोस्त करून, अशी नोंद आहे.

त्यामुळे त्या मशिदीच्या जमिनीच्या तुकड्याच्या मालकी हक्‍काचा वाद प्रथम १८८०मध्ये न्यायालयात गेला आणि अखेर गतवर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम फैसल्यानंतर अखेर ही जमीन ‘रामलल्ला’स मिळाली! राम हे कोट्यवधी भारतीयांसाठी केवळ दैवत नव्हते, तर तो जसा ‘मर्यादापुरुषोत्तम‘ होता, तसाच तो समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन कारभार करणारा ‘आदर्श राजा’ही होता. त्याच्या राज्यात सर्वसामान्य माणसाचा विरोधी आवाजही ऐकला जात असे. त्यामुळेच आपल्या देशात आदर्श राज्यव्यवस्थेला ‘रामराज्य’ म्हणण्याचा रिवाज आहे. आता मंदिराच्या बांधकामास विधिवत सुरुवात झाली असल्याने आपला देशही अशाच ‘रामराज्या’च्या दिशेने घेऊन जाण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांवर आली आहे.

या मंदिरासाठी झालेल्या प्रखर आंदोलनानंतर मोठ्या हिंसाचारास देशाला सामोरे जावे लागले आणि त्यामुळेच ‘हम और वो’ अशी दुराव्याची दरी समाजात निर्माण झाली, हे विसरता कामा नये. त्यामुळे हे मंदिर खरोखरच आपल्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक बनणार असेल, तर ते त्याचवेळी ‘सब का साथ, सब का विकास!’ या घोषणेची पूर्ती करणारेही ठरायला हवे. अन्यथा, हे भव्य-दिव्य मंदिर आणि देशातील शेकडो देवळे यांच्यात फरक राहणार नाही.

‘राममंदिरा’च्या निमित्ताने देश जवळपास तीन दशके पुरता ढवळून निघाला होता आणि त्यातून उभ्या राहिलेल्या लाटेनेच भाजपला सत्तेचा सोपान दाखवला. त्यानंतर मोदी यांनी ‘अच्छे दिन!’ नावाचे आणखी एक स्वप्न देशाला दाखवले. स्वप्नातले राममंदिर प्रत्यक्षात येण्यासाठी आवश्‍यक ते पहिले पाऊल आता उचलले गेले असल्यामुळे आता हे दुसरे स्वप्नही प्रत्यक्षात आणण्यासाठी जोमाने पावले उचलायला हवीत. मंदिराच्या निमित्ताने सुरू झालेल्या राजकारणावरही आता पडदा पडला आहे. हे मंदिर या साऱ्या परिसराचे अर्थकारण बदलून टाकू शकते, असे मोदी यांनी स्पष्ट केले. मात्र, अयोध्येतील राम हा घराघरांत आणि लोकांच्या मनामनांत आहे. रामाच्या या मंदिरामुळे केवळ राज्यकर्त्यांचीच नव्हे, तर आपणा सर्वांचीच जबाबदारीही वाढली आहे.

आता पावले ‘रामराज्या’च्या दिशेने पडायला हवीत आणि तीही सर्वांना सोबत घेऊन... सर्वांना समान न्याय देत. तरच या भव्य राममंदिराच्या निर्माणाच्या कार्याला व्यापक सांस्कृतिक अर्थ प्राप्त होईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com