esakal | अग्रलेख : उजेडाची झाडे
sakal

बोलून बातमी शोधा

Happy-Teachers-Day

‘जगात सर्वांत सर्जनशील मन कोणाचे असेल तर ते शिक्षकांचे असते, असा विश्‍वास बाळगणाऱ्या सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिन ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा होतो. यंदाच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने ‘शिक्षक’ या भूमिकेचे आणि जबाबदारीचे बदलते स्वरूप यावर मंथन व्हायला हवे.

अग्रलेख : उजेडाची झाडे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

‘जगात सर्वांत सर्जनशील मन कोणाचे असेल तर ते शिक्षकांचे असते, असा विश्‍वास बाळगणाऱ्या सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिन ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा होतो. यंदाच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने ‘शिक्षक’ या भूमिकेचे आणि जबाबदारीचे बदलते स्वरूप यावर मंथन व्हायला हवे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

समाजातल्या सर्व चांगल्या बदलांच्या मुळाशी शिक्षकांनी पेरलेली बीजे असतात. ही पेरणी नीट होणार किंवा नाही, हे शिक्षकांच्या कौशल्यावर, तळमळीवर अवलंबून आहे. स्वातंत्र्यासाठी आणि नंतर देशाच्या उभारणीतही अत्यंत महत्त्वाचा वाटा कोणी उचलला असेल तर या गुरुजींनी. आता काळाची नवी आव्हाने उभी ठाकली असताना आजच्या शिक्षकांना तो वारसा तर पेलायचा आहेच; पण त्याबरोबरच नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत, शैक्षणिक उद्दिष्टांशी समरस होत विद्यार्थ्यांना घडवायचे आहे. या शिक्षणातून विद्यार्थ्याला स्वतःच्या पायावर उभे राहता आले पाहिजे, म्हणजे उपजीविकेचा मार्ग तर मिळायला हवाच; पण त्याचबरोबर जीवनमूल्यांचा संस्कारही व्हायला हवा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्याच्या आरपार ध्रुवीकरणाच्या वातावरणात तर ही जबाबदारी आणखीनच वाढते. त्याहीपेक्षा आणखी एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे जगभर नवकल्पना, चौकटीबाहेरचा विचार, शोधवृत्ती यांना अपार महत्त्व आले आहे. अशा प्रकारच्या वृत्ती अचानक विकसित होत नाहीत, त्यासाठी शालेय पातळीपासून प्रयत्न करावे लागतात. स्वतंत्र विचार करायला प्रवृत्त करणे, त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, हे शिक्षक प्रभावीपणे करू शकतो. देशाचे भवितव्य शिक्षक घडवू शकतो म्हणतात, ते या बाबतीत महत्त्वाचे आहे.  संकट ही एक संधीही असते असे म्हणतात. कोरोनामुळे जे बदल करावे लागले आहेत, त्यातून ऑनलाइन वर्ग ही संकल्पना पुढे आली आहे. शिक्षकांना  तंत्रस्नेही तर व्हावे लागणार आहेच, पण त्याचबरोबर नव्या गोष्टी शिकणे आणि काही बाबतीत स्वतःचे ‘अनलर्निंग’ही करावे लागणार आहे. अशा बदलांसाठीची मानसिक तयारी करणे महत्त्वाचे आहे. 

भारतातील शिक्षकांना मोठा ऐतिहासिक वारसा असला तरी दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत समाजातील शिक्षकाचे महत्त्वही कमी कमी होत गेले. समाजव्यवस्थेत, एकूण निर्णयप्रक्रियेत असलेले शिक्षकांचे महत्त्वाचे स्थानही दुरावत गेले. अवघ्या तीन-चार दशकांपूर्वीपर्यंत आपल्या संसदीय व्यवस्थेत निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींमध्ये शिक्षक आणि विचारवंत यांचा मोठा सहभाग असे. पुढे राजकीय रंगमंचावरील सारेच नेपथ्य बदलत गेले.

समाजव्यवस्थाही नव्या बदलास सज्ज झाली आणि शिक्षक हा फक्‍त विद्यार्थ्याला, गुणवत्तेच्या नव्हे तर गुणांच्या जीवघेण्या स्पर्धेत पुढे घेऊन जाणारा ‘गाइड’ ठरू लागला. नवी बाजारव्यवस्था अस्तित्वात आली. एकंदरित ज्ञानाचे महत्त्व कमी होऊन, घोकंपट्टीच्या जोरावर निव्वळ माहिती ओकणारे ‘रोबो’ तयार करणारी शिक्षणपद्धतीही त्यास जबाबदार आहे, असे म्हटले गेले. पण आता ही पद्धती बदलण्याचा संकल्प नव्या धोरणाच्या माध्यमातून केला जात असताना त्या बदलांची परिणामकारकता, गुणवत्ता शिक्षकांच्या कामगिरीवरच अवलंबून असणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे. 

या पार्श्‍वभूमीवर आता शिक्षकवर्गाला नव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. मग तो शिक्षक ‘केजी’चा असो की ‘पीजी’चा, त्याला ‘ऑनलाइन’ तंत्रानुसार किमान पुढचा काही काळ तरी जुळवून घ्यावे लागणार, असे सध्याचे वातावरण सांगत आहे. अर्थात, कोरोनानंतरही माहिती-तंत्रज्ञानातील साधनांचा परिणामकारक, सर्जनशील उपयोग करून घ्यावा लागणार आहेच.

त्यामुळेच हा नव्या मनूचा, नवा शिक्षक हा एकाचवेळी ‘टेक्नोसॅव्ही’ आणि त्याचवेळी आपल्या विषयात पारंगत असावा लागणार आहे. वर्गात शिकवणे आणि ‘ऑनलाइन’ शिकवणे, या दोन पद्धती पूर्णपणे वेगळ्या आहेत, हे ध्यानात घेऊन त्याला आपल्या शिकवण्याचे तंत्र बदलावे लागणार आहे.

नवनवे विषय, नवनव्या संकल्पना या वेगवान युगात धबधब्यासारख्या अंगावर कोसळत असताना, त्याला स्वत:ला कायम ‘अपडेट’ राहावे लागणार आहे. आपण स्वत: विद्यार्थी असताना, जे शिकलो तेच आणि त्याच पद्धतीने आता  त्याला ‘विद्यादान’ म्हणून करता येणार नाही, अशी परिस्थिती रोजच्या रोज समोर येत आहे. त्यामुळेच आता शिक्षकाला स्वतःच विद्यार्थी बनून स्वतःही विद्यार्थ्यांपेक्षा अधिकच जोमाने ‘गृहपाठ’ करावा लागणार आहे. अर्थात, शिक्षकांना या बदलाला सहजगत्या सामोरे जाता यावे, असे मित्रत्वाचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आता समाजावरही आहे. शिक्षण ही केवळ शिकवण्याची प्रक्रिया नाही, तर त्यात शिकण्यालाही तितकेच महत्त्व आहे, हे सर्वांनीच यानिमित्ताने जाणून घेतले, तरच आजचा ‘शिक्षकदिन’ यशस्वी झाला, असे म्हणता येईल. आता कालचेच पाढे आज पुन्हा परवाचा म्हणून घोकण्यात अर्थ राहिलेला नाही. सर्जनशील शिक्षकच नव्या युगाची पायाभरणी करतील. असे शिक्षक म्हणजे समाजातील जणू उजेडाची झाडेच. तीच वैचारिक प्रदूषणापासून नव्या पिढीचे रक्षण करतील आणि त्यांना समर्थ, संपन्नही बनवतील.

Edited By - Prashant Patil