अग्रलेख : ‘रिया’लिटी शो!

Sushant-and-Ria
Sushant-and-Ria

अखेर रिया चक्रवर्ती या बॉलिवूडमधील एका अवघ्या २८ वर्षांच्या अभिनेत्रीला अटक झाली आहे आणि त्यामुळे अनेकांना आनंदाच्या उकळ्याही फुटल्या आहेत. त्यात सर्वांत आघाडीवर आहेत, ते दीड-दोन महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या बिहार राज्याचे पोलिस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे. रियाला केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अटक करताच ‘हा बिहारचा विजय आहे!’ अशी घमेंडखोर प्रतिक्रिया या पांडे महोदयांनी दिली आहे. त्यामुळेच, त्यांना खरा रस हा सुशांतसिंह राजपूत या एका गुणी अभिनेत्याच्या मृत्यूचे गूढ उकलवण्यात होता की रियाला अटकेत जाण्यापुरता होता, यावरही झगझगीत प्रकाश पडला होता. त्याचे कारण म्हणजे, सुमारे तीन महिन्यांपूर्वी म्हणजे १४ जून रोजी सुशांतने आत्महत्या केल्याचे जाहीर झाल्यानंतर महिनाभराने त्याच्या पिताश्रींनी आपल्या मुलाच्या मृत्युची चौकशी व्हावी, अशी मागणी करीत पाटणा येथे ‘एफआयआर’ही दाखल केला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानंतर कोर्टबाजी होऊन गेल्या महिन्याच्या मध्यास ‘सीबीआय’ या केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला मैदानात उतरविण्यात आले. या यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सलग पाच-सात दिवस रियाला धारेवर धरले. त्याच सुमारास सुशांतच्या बॅंक खात्यातील १५ कोटी रुपये रियाने लंपास केल्याचा आरोप झाला आणि मग अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ‘ईडी’तर्फे तिची उलटतपासणी सुरू झाली आणि त्यातूनही काही हाताला लागत नाही, हे लक्षात आल्यावर ‘एनसीबी’तर्फे तिची झाडाझडती सुरू झाली. अखेरीस तीन दिवसांच्या चौकशीनंतर या पथकाने तिला अटक केली. देशातील तीन सर्वोच्च यंत्रणा जवळपास दीड महिना तपास करत असूनही आता रियाच्या अटकेनंतर सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, हे गूढ कायमच आहे.

मात्र, सुशांतच्या मृत्यूनंतर गेले दोन महिने पत्रकारितेचे सारे संकेत धुळीस मिळवत ड्रामेबाजी करणाऱ्या काही वृत्तवाहिन्या आणि केंद्रात सत्तेवर असलेला भारतीय जनता पक्ष, यांनाही तिच्या अटकेनंतर सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात काहीही रस आहे किंवा नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
सुशांतसिंह राजपूत हा एक बिहारमधून बॉलिवूडमध्ये नशीब अजमावण्यासाठी मुंबईत आलेला एक अभिनेता होता. साहजिकच, बिहारमधील विधानसभा निवडणुकीत त्याचा तथाकथित ‘गूढ’ मृत्यू, हा विषय ऐरणीवर आणण्यात आपल्याला किती रस आहे, हे भाजपने आपल्या पोस्टरवर त्याचा फोटो लावून दाखवून दिलेच होते.

शिवाय, भाजपच्याच कृपाछत्राखाली आणखी पाच वर्षे मुख्यमंत्रिपद उपभोगण्यास उतावीळ झालेले नितीश कुमार यांनीही चारच दिवसांपूर्वी आपल्या पहिल्या ‘व्हर्च्युअल रॅली’त सुशांतचा मृत्यू हाच मुख्य विषय केला होता. बाकी बिहारमधील अठराविश्‍वे दारिद्र्य आणि तेथील बेरोजगारीचा भयावह प्रश्‍न, यांत नितीश यांना काहीच रस उरलेला नव्हता. त्यामुळेच राजकीय सत्तासंघर्षाच्या पटावरची सुशांत आणि रिया ही दोन प्यादी आहेत, हीच बाब प्रकर्षाने समोर आली होती. अर्थात, सत्तापटावरील सारिपाटाच्या या खेळात केवळ सुशांत वा रिया हीच दोन प्यादी थोडीच होती?

काही प्रसारमाध्यमेही या खेळात सामील झाल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यातच कंगना राणावतसारखी आणखी एक अभिनेत्रीही ट्‌विटरच्या माध्यमातून या खेळात उतरली आणि शिवसेनेच्या प्रवक्‍त्यांनी व्यक्त केलेल्या अवाजवी प्रतिक्रियांमुळे प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा तिचा हेतू अगदी सफल-संपूर्ण झाला! मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्याच वेळी तिच्या मुंबईतील बंगल्यात बेकायदा बांधकाम झाल्याचा साक्षात्कार झाला! मग त्यांची पथके हे बांधकाम तोडण्याच्या कामाला लागली. या सगळ्याच गदारोळात सुशांतसिंहचा मृत्यू वा त्यानंतर त्यासंबंधात रियावर झालेले आरोप, हे सारेच विषय बाजूला फेकले गेले. सुशांतच्या बाबतीत चौकशी यंत्रणांच्या हाती काय लागत आहे, हेही मुद्दे फुकाचे ठरले आणि फक्‍त गलिच्छ चिखलफेकीला उधाण आले. त्यात प्रारंभीपासूनच या नाट्यात नाच्या पोऱ्याची भूमिका स्वत:हून करू पाहणाऱ्या काही वृत्तवाहिन्याही सामील झाल्या. मग, ही धुळवड नेमक्‍या याच मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनापर्यंत जाऊन पोचणे ओघानेच आले. राजकीय पक्ष, माध्यमे आणि सनदी सेवा हे आपल्या लोकशाहीतील महत्त्वाचे घटक. पण, या घडामोडींमुळे त्यांच्याविषयीच चिंता निर्माण होते.

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर आता बॉलिवूडमधील शबाना आझमी, स्वरा भास्कर, तापसी पन्नू, झोया अख्तर, अनुराग कश्‍यप आदी कलावंतही रियाच्या बाजूने उभे राहत आहेत. रियाला अटक झाली तेव्हा तिने परिधान केलेल्या टी-शर्टवर लिहिलेले होते : ‘रोझेस आर रेड, व्हायोलेट्‌स आर ब्लू; स्मॅश पॅट्रियार्की’ असा मजकूर होता. या तीन महिने सुरू असलेल्या खेळात रियाचा वापर निव्वळ प्यादे म्हणून सुरू आहे, अशी टिप्पणी ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या निःस्पृह माजी पोलिस अधिकाऱ्यानेच केली आहे. एकंदरीतच, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांऐवजी आपले राजकीय चर्चाविश्‍व अन्य गोष्टींनीच व्यापून गेल्याचा ‘दृश्‍य’ प्रत्यय अनेक प्रश्‍नांना जन्म देणारा आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com