esakal | अग्रलेख : दडपादडपी आणि हडेलहप्पी
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

उत्तर प्रदेशातील ‘गुंडाराज’ची चर्चा अधूनमधून होत असते. महिला, तसेच दलित यांच्यावरील अत्याचाराच्या घटना तिथे वारंवार घडतात. मात्र अशावेळी सरकार नामक यंत्रणेची जबाबदारी असते, ती कायद्याचा धाक प्रस्थापित करण्याची, पीडितांना आश्‍वस्त करण्याची. सध्या उत्तर प्रदेशात जे अनुभवाला येते आहे, ती मात्र निव्वळ दडपादडपी नि हडेलहप्पी आहे. राजधानी दिल्लीपासून तीन-साडेतीन तासांच्या अंतरावरील हाथरस गावात जे काही घडले, त्याने अनेक गंभीर प्रश्‍न समोर आणले आहेत.

अग्रलेख : दडपादडपी आणि हडेलहप्पी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उत्तर प्रदेशातील ‘गुंडाराज’ची चर्चा अधूनमधून होत असते. महिला, तसेच दलित यांच्यावरील अत्याचाराच्या घटना तिथे वारंवार घडतात. मात्र अशावेळी सरकार नामक यंत्रणेची जबाबदारी असते, ती कायद्याचा धाक प्रस्थापित करण्याची, पीडितांना आश्‍वस्त करण्याची. सध्या उत्तर प्रदेशात जे अनुभवाला येते आहे, ती मात्र निव्वळ दडपादडपी नि हडेलहप्पी आहे. राजधानी दिल्लीपासून तीन-साडेतीन तासांच्या अंतरावरील हाथरस गावात जे काही घडले, त्याने अनेक गंभीर प्रश्‍न समोर आणले आहेत. गुंडागर्दीत थेट पोलिसच जातीने सामील झाल्याचे दिसते आहे. हाथरस येथे दलित युवती अमानुष अत्याचारानंतर मृत्युमुखी पडल्यानंतर पोलिसांनी रात्री तिचे पार्थिव थेट रॉकेल ओतून जाळले. देशभर संतापाची लाट उसळलीच, पण अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर होण्यास सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उत्तर प्रदेशचे अतिरिक्‍त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार हे या युवतीवर ‘बलात्कार झालाच नाही!’ असे तारस्वरात सांगत आहेत. अत्याचारानंतर तिचा मृत्यू झाला, हे भीषण असे वास्तव आहेच. या पार्श्‍वभूमीवर तिच्या दुर्दैवी कुटुंबीयांच्या भेटीसाठी निघालेले राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना रोखण्यात आले. धक्‍काबुक्‍की करण्यात आली. एका पोलिस अधिकाऱ्याची मजल तर राहुल यांची कॉलर धरून त्यांना जमिनीवर पाडण्यापर्यंत गेली. या धक्‍काबुक्‍कीचा ‘प्रसाद’ प्रियांका यांनाही लाभला. त्यानंतर आता उत्तर प्रदेश पोलिसांनी हाथरसची कडेकोट नाकेबंदी केली. तेथे १४४ कलम लागू करतानाच ते गाव कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर ‘कंटेनमेंट झोन’ जाहीर केले. त्या गावात जाण्यास निघालेले तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन, काकोली घोष आणि अन्य महिलांना पोलिसांचा प्रसाद मिळाला.

ओब्रायन यांनादेखील राहुल गांधी यांच्याप्रमाणेच जमिनीवर ढकलण्यात आले. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही तेथे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला. एवढेच नव्हे तर त्या पीडितेच्या कुटुंबीयांचे मोबाईल फोनही काढून घेण्यात आले. त्यांना नजरकैदेत ठेवून घराभोवती कडक पहारे लावण्यात आले आहेत.

देशात दलितांवर तसेच महिलांवरील अत्याचार शतकानुशतके सुरू आहेत. त्यास उच्चवर्णीयांची पुरुषी मानसिकता कारणीभूत आहे, हे ढळढळीत वास्तव हाथरस पाठोपाठ याच राज्यातील बलरामपूरमध्ये अशाच प्रकारे दलित युवतीवरच्या अत्याचाराने ठळकपणे समोर आले. मात्र अशा अत्याचारानंतर हाथरस परिसरात पोलिसांची जी काही दडपशाही आणि मनमानी सुरू आहे, तसे स्वातंत्र्यानंतर देशात कधीही घडल्याची नोंद नाही. आणीबाणीनंतर १९७०च्या दशकात जनता पक्ष सत्तारूढ असताना, बिहारमध्ये बेलची येथे दलितांवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर इंदिरा गांधी तेथे पावसापाण्यात हत्तीवर बसून गेल्या होत्या. त्यांना कोणीही रोखले नव्हते. हाथरस या छोटेखानी गावाचा मात्र ‘खाकी वर्दी’ची मस्ती आणि गुर्मी आलेल्या स्थानिक पोलिसांनी पुरता तुरुंगच बनवून टाकला आहे. हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण कुमार यांनी या हतबल कुटुंबीयांना थेट धमकावण्यास सुरुवात केली आहे.

‘मीडिया काय आज असेल? उद्या...?’ अशी त्यांची मस्तवाल भाषा आहे. याचा अर्थ काही दिवसांनी मीडियाचे लक्ष कमी झाल्यावर ‘तुमची माझ्याशीच गाठ आहे...’ असाच होतो. ‘खाकी वर्दीला हा एवढा माज वरिष्ठांच्या पाठिंब्याच्या जोरावर तर येतोच येतो; पण उत्तर प्रदेशात जे सुरू आहे, त्याची जबाबदारी ‘योगी आदित्यनाथ’ असे नामाभिमान धारण करणारे अजय मोहन बिष्ट यांच्यावर येते, हे लक्षात घ्यावे लागेल. दलित युवतीवर अत्याचार करणाऱ्यांपैकी कोणी ‘ठाकूर समाजातील असल्याने हे सुरू आहे, हा आरोप त्यांना झटकून टाकता येईल, असे सरकारचे वर्तन आहे काय? हा प्रश्‍न निर्माण होणे, यातच सारे काही आले. शिवाय, येथे राजापेक्षाही अधिक राजनिष्ठा दाखवण्याची अहमहमिका सुरू आहे.

अतिरिक्‍त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांची मजल ‘माझ्या उत्तर प्रदेशचा हा अपमान आहे...’ इत्यादी मुक्‍ताफळे उधळली आहेत. राजकीय नेत्यांनाच नव्हे तर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही अडवण्यात आले. दलित नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी योगींना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. मात्र उत्तर प्रदेशात हे जे काही दडपशाहीचे वर्तन सुरू आहे, त्यास चाप लावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तरी यशस्वी होतील की नाही, याबाबत शंकाच आहे. त्याचे कारण या ‘योगीं’नी मुख्यमंत्रिपदाच पक्षाच्या मनात नसताना शक्‍तिप्रदर्शनाच्या जोरावर संपादले आहे.

विरोधी राजकीय नेते तसेच प्रसारमाध्यमे यांना हाथरसमध्ये जाण्यापासून हे सरकार नेमके कोणत्या कारणामुळे रोखत आहे, याचे उत्तर सरकारला काही तरी लपवायचे आहे म्हणून... हेच आहे. त्याचीच परिणती राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या अडवणुकीत तसेच धक्‍काबुक्‍कीत झाली. गेले काही दिवस बातम्यांतून बाहेर असलेले हे दोघे एकदम ‘हेडलाइन्स’मध्ये आले. तीच चूक ओब्रायन यांच्याही बाबतीत झाली. मात्र एवढे होऊनही पंतप्रधान मोदी असोत की गृहमंत्री अमित शहा, हे डोळ्यावर कातडे ओढून स्वस्थ बसले आहेत. लोकशाहीचे याहून अधिक धिंडवडे ते कोणते?

Edited By - Prashant Patil