अग्रलेख : बिहारचे बदलते रंग!

Bihar-Voting
Bihar-Voting

कोरोनाच्या सावटाखाली देशात प्रथमच होत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी केवळ पार पडले असे नाही, तर ५४ टक्‍क्‍यांहून अधिक मतदारांनी आपला कौल ‘ईव्हीएम’मध्ये बंदिस्त केला. मतदानाची ही टक्‍केवारी २०१५ मधील विधानसभा आणि त्यानंतर २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाइतकीच आहे. याचा अर्थ बिहारमध्ये कोरोनाची लाट आता ओसरली आहे, असाही लावता येईल किंवा लोक कोरोनाच्या संसर्गाला न भीता मतदानास आले, असेही म्हणता येईल. मात्र, कोरोनाची लाट आता ओसरली, असे कोणी म्हणालेच तर ते चित्र फसवे असेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवाय, बहुतांश मतदार हे मास्क न लावताच रांगेत उभे असल्याचे दिसत होते. त्यामुळे किमान पुढच्या दोन टप्प्यातील मतदानासाठी तरी मास्क लावूनच येण्याचा आग्रह धरायला हवा. त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे आता हे मतदान होत असतानाच, सर्वच नेत्यांनी आपल्या प्रचाराचा रोख पूर्णपणे बदलल्याचे चित्र आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थातच अग्रभागी आहेत आणि त्या बदलत्या प्रचारदिशेचा सूर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही अचूकपणे पकडलाय, यात शंका नाही. बिहारमध्ये भाजप तसेच नितीशकुमार यांचा जेडी (यू) यांच्या आघाडीस दोन पावले मागे जावे लागत असल्याची साक्ष प्रचाराची ही बदलती दिशा दाखवत आहे. 

अर्थात, प्रचाराच्या या बदलत्या रंगाची चुणूक भाजपने चारच दिवसांपूर्वी आपल्या पोस्टरवरून नितीशकुमार यांना खाली उतरायला लावून दाखवून दिली होतीच! आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पोस्टर्सवर फक्‍त मोदी यांचेच फोटो झळकत आहेत. भाजपने दाखवून दिलेल्या या दिशेनंतर नितीश यांनीही लगोलग आपल्या १५ वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीतील ‘कर्तबगारी’बद्दल बोलण्याऐवजी मोदीपुराणाचे पाठ वाचण्यास सुरुवात तर केलीच; शिवाय बिहारचा विकास मोदीच घडवून आणतील, अशी ग्वाहीही ते देऊ लागले आहेत. खरे तर नितीश हे आपल्या संयमित व्यक्‍तिमत्त्वाबद्दल प्रसिद्ध आहेत. मात्र, त्यांची यंदाच्या प्रचारमोहिमेत बरीच चीडचीड होत असल्याचे दिसत आहे आणि हे चित्र बरेच काही सांगणारे आहे. ‘नऊ मुले असलेला नेता, काय विकास घडवून आणणार?’ असा लालूप्रसाद यादव यांचे नाव न घेता नितीश यांनी जाहीरपणे विचारलेला सवाल त्यांचा हा सुटलेला संयम अधोरेखित करत आहे. मोदी यांनीही नेमक्‍या याच पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा मुहूर्त साधत बिहारमध्ये तीन सभा घेतल्या. मात्र, त्यात त्यांनी राम मंदिराचा मुद्दा आणला आणि शिवाय नितीश राजवटीतील विकास कामांचा उल्लेखही न करता, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचेच पोवाडे गायले. त्यात दस्तुरखुद्द मोदी यांनीही लालूप्रसादांचे पुत्र तेजस्वी यांची संभावना ‘जंगलराजचे युवराज!’ अशी केली. मात्र, तेजस्वी यांनी त्यास संयमित भाषेत उत्तर देत, ‘मोदी पंतप्रधान आहेत, ते काहीही बोलूू शकतात!’ असे उद्‌गार काढले. मात्र, त्याचवेळी आपण उपस्थित केलेल्या रोजगाराच्या प्रश्‍नावर मोदी मौन बाळगून का आहेत, असा प्रश्‍न उपस्थित केला.

बिहारमधील प्रचाराचे हे बदलते रंग अनेक गोष्टी ठळकपणे समोर आणत आहेत. जातीपातीच्या राजकारणाचा बुजबुजाट असलेल्या या राज्यातील जनतेपुढे पहिला प्रश्‍न हा ‘सामाजिक न्याया’चा होता. त्यानंतर विकासाचा मुद्दा आला. नितीश यांच्या राज्यात भले ‘बिजली, सडक, पानी’ हे प्रश्‍न काही प्रमाणात सुटले, तरी त्यामुळे विकास झाला असे म्हणता येत नाही. या तीन बाबी म्हणजे ‘विकासाच्या दिशेने घेऊन जाणारे रस्ते’ आहेत. त्यामुळेच तेजस्वी यांनी सातत्याने बिहारमधील बेरोजगारीवरच प्रचारात भर दिला आहे. या निवडणुकीत दिसत असलेली आणखी एक बाब म्हणजे अवघ्या काही वर्षांपूर्वीपर्यंत नितीश, लालू तसेच रामविलास पासवान या त्रिमूर्तींभोवती बिहारचे राजकारण फेर धरत असे. त्याआधीची जॉर्ज फर्नांडिस तसेच शरद यादव प्रभृतीची पिढी आधीच अस्तंगत झाली होती. आता पासवान यांची जागा त्यांचे पुत्र चिराग यांनी घेतली आहे. तर लालूप्रसाद तुरुंगात असल्याने तेजस्वी यांच्या हातात ‘राजद’ची सूत्रे आहेत आणि तेजस्वी यांनी बेरोजगारीचा मुद्दा हे प्रचाराचे एकमेव अस्त्र करून भाजपच्या राष्ट्रवाद, राम मंदिर हे मुद्दे पुढे आणण्याच्या प्रयत्नांना शह दिला आहे. निकाल काहीही लागला, तरी या निवडणुकीने बिहारात नवा अजेंडा आणि नवी पिढी यांना मैदानात उतरवले, यात शंका नाही. त्यामुळेच मोदी आणि नितीश यांना आपल्या प्रचाराचा बाज तसेच रोखही बदलायला लागला आहे. त्यामुळेच आता पुढच्या प्रचारात भाजपने पाकिस्तानला उतरवले, तर आश्‍चर्य वाटायला नको; कारण २०१५ मधील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला, तर पाकिस्तानात फटाके फुटतील, अशी भाषा वापरली गेली होतीच. प्रचाराचे हे बदलते रंग हेच या निवडणुकीचे हेच प्रमुख वैशिष्ट्य आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com