अग्रलेख : ही ऊर्मी कशाची?

Urmila-Matondkar
Urmila-Matondkar

ऊर्मिला मातोंडकर या १९९० च्या दशकात तरुणाईवर गारुड करणाऱ्या गुणी अभिनेत्रीने अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकीकडे मुंबईतील अवघे ‘बॉलिवुड’ उत्तर प्रदेशात खेचून नेण्यासाठी त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबापुरीत ठाण मांडून बसले असतानाच, एक ‘स्टार’ अभिनेत्री शिवसेनेत जाते, एवढ्यापुरती ही घटना मर्यादित नाही. ऊर्मिलाने अवघ्या सव्वा वर्षापूर्वी झालेली लोकसभा निवडणूक उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती आणि तेव्हा तिने आजची तरुणाईही तिच्या प्रेमात असल्याचे दाखवून दिले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, काँग्रेसची संघटना नसल्याने तिला बळ मिळू शकले नाही आणि त्यामुळे तिचा दणदणीत पराभव झाला होता. मात्र, त्यामुळे खचून न जाता ‘आपण आता राजकारणातून बाहेर पडणार नाही,’ असे ठामपणे सांगितले होते. त्यामुळेच तिने हाताला बांधलेले ‘शिवबंधन’ हा काँग्रेसला आणखी एक धक्का आहे, असे म्हणावे लागते. याचे कारण अवघ्या दीड महिन्यांपूर्वी नव्वदच्याच दशकांत दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री खुशबू सुंदर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झाली होती. तर २०१९मधील लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रियांका चतुर्वेदी या काँग्रेसच्या आक्रमक प्रवक्‍त्याही शिवसेनेतच दाखल झाल्या होत्या.

उर्मिला ही खुशबू वा प्रियांका याप्रमाणे काँग्रेसची प्रवक्ता नव्हती. मात्र, तिने पराभवानंतरही भाजपविरोधातील आपली भूमिका ठामपणे व्यक्त करणे सुरूच ठेवले होते. ऊर्मिलाने शिवसेनेत प्रवेश करताना आपला हिंदुत्वाचा गाढा अभ्यास असल्याचे सांगतानाच ‘हिंदुत्व हे सर्वसमावेशक’ असल्याचेही नमूद केले आहे! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुक्तकंठाने स्तुती करतानाच आपण जन्माने तसेच कर्मानेही हिंदूच असल्याची ग्वाहीही तिने दिली आहे. ऊर्मिला असो; की खुशबू; वा प्रियांका या तिन्ही गुणी कार्यकर्त्या काँग्रेसने का गमावल्या या प्रश्नाइतकाच महत्त्वाचा प्रश्न या साऱ्यांना हिंदुत्वाची विचारधारा अचानक आकर्षित का करू लागली, याचाही शोध त्यामुळेच घेणे आवश्‍यक ठरते.

भारतीय जनता पक्षाने २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव मुक्रर केल्यापासून देशाचे राजकीय ‘नॅरेटिव्ह’ बदलू लागले. तसे ते बदलण्यात तो पक्ष यशस्वी ठरू पाहत आहे. गेल्या पाच सात वर्षांत केवळ काँग्रेसच नव्हे तर अन्य काही पक्षांतूनही भाजपच्या तंबूचा आश्रय घेणाऱ्यांची संख्या वाढती आहे. त्याचे अगदी ताजे उदाहरण हे मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे या बड्या नेत्याने २२ आमदारांसह केलेला भाजपप्रवेश हे आहे. सर्वसाधारणपणे २०१०पर्यंत या देशाची मुख्य विचारधारा ही ‘सेक्‍युलर’ असल्याचे मानले जात होते आणि सर्वसमावेशकता हा या देशाचा गाभा होता.

अगदी अटलबिहारी वाजपेयी साडेसहा वर्षं पंतप्रधान असतानाही देशाच्या राजकारणाची दिशा ‘डावीकडून मध्याकडे’ अशीच होती. मोदी आणि त्यांचे सहकारी यांनी गेल्या पाच-सात वर्षांत या विचारधारेला आरपार छेद तर दिलाच; शिवाय हिंदुत्व हा राजकारणाचा मुख्य प्रवाह म्हणून उभा केला. हे यश जितके मोदी आणि टीमचे, तितकेच ते याचसाठी नऊ दशके अथक प्रयत्न करणाऱ्या संघ परिवाराचेही आहे. अर्थात, त्यामुळे ‘आयडिया ऑफ इंडिया’ या संकल्पनेला मोठा धक्का बसला, तरी त्याची कोणालाच पर्वा नव्हती.

त्यापलीकडची बाब म्हणजे हा हिंदुत्वाचा राजमार्गच सत्तासोपानाकडे घेऊन जाऊ शकतो, याची जाणीव भाजपने याच पाच-सात वर्षांच्या काळात मिळवलेले मोठे विजय आणि त्याच काळात झालेली काँग्रेसची दुर्दशा यामुळे लोकांना होत गेली. त्यामुळेच या रेट्यापोटी कळत नकळत दिशेने हा प्रवाहो कोणत्या ना कोणत्या हिंदुत्वाच्या दिशेने निघाला आहे.

ऊर्मिला ही खरेतर लहानपणापासून समाजवादी परिवारात वाढलेली आणि ती असो की खुशबू वा प्रियांका; या तुलनेने उदारमतवादी आणि सर्वसमावेशक प्रवृत्तीच्या आहेत. बहुधा त्यामुळेच ऊर्मिलाने भाजपचा भगवा खांद्यावर घेण्याऐवजी स्वत:ला ‘शिवबंधना’त अडकवून घेण्याचे ठरविले असावे. ऊर्मिलासारख्या राजकारणातील इच्छुकांना शिवसेना हा पर्याय सोपा वाटतो, कारण त्या पक्षाच्या हिंदुत्वात अनेक गोष्टी बसतात. प्रबोधनकारांचे जातवर्चस्वावर कडाडून आसूड ओढणाऱ्या हिंदुत्वाचा कधी हा पक्ष वारसा सांगतो, तर कधी कमालीची पारंपरिक भूमिकाही घेतो. त्यामुळे  त्यातील आपल्याला सोईचा भाग स्वीकारण्याची सोय असते. ‘धर्म आणि श्रद्धा या पूर्णपणे खाजगी गोष्टी आहेत,’ असे शिवसेनेत प्रवेश करताच ऊर्मिला त्यामुळेच सांगू शकली.

एकीकडे भारतीय प्रथा-परंपरा, रीती-रिवाज, श्रद्धा यांचा गौरव करावयाचा आणि त्याचवेळी आपला उदारमतवादी चेहरा कायम राखायचा, असा विचार करणाऱ्यांसाठी सत्तासोपानावरून पुढे जाण्यासाठी त्यामुळेच शिवसेना हा पक्ष निदान महाराष्ट्रात तरी पर्याय होऊ शकतो, हेच या ‘रंगिला गर्ल’ने दाखवून दिले आहे.अर्थात त्यातून ठळकपणे दिसतो आहे तो राजकीय व्यवहारवाद. राजकीय कारकीर्द करायची असेल तर विचारसरणीशी तडजोड करायला बहुतांश इच्छुकांची तयारी असते, याच वास्तवाचा पुन्हा प्रत्यय आला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com