esakal | अग्रलेख : विषाणूचे नाइटलाईफ!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Virus

‘कोरोना’ नावाचा जगाला वेठीस धरणारा विषाणू बहुदा निशाचर असावा. तो रात्री जागा होतो, मग फिरायला लागतो आणि बाहेर माणूस दिसला की त्याला दंश करतो. दिवसा मात्र असले काही तो करत नाही, झोपत असेल बहुदा. अशी राज्य सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडवली जाते आहे. शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करायचे सरकारने ठरविले आहे, त्यावरीलच ती प्रतिक्रिया आहे.

अग्रलेख : विषाणूचे नाइटलाईफ!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

‘कोरोना’ नावाचा जगाला वेठीस धरणारा विषाणू बहुदा निशाचर असावा. तो रात्री जागा होतो, मग फिरायला लागतो आणि बाहेर माणूस दिसला की त्याला दंश करतो. दिवसा मात्र असले काही तो करत नाही, झोपत असेल बहुदा. अशी राज्य सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडवली जाते आहे. शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करायचे सरकारने ठरविले आहे, त्यावरीलच ती प्रतिक्रिया आहे. अव्वल कोविडकाळात इतके काही शिकल्यानंतरही सरकारी यंत्रणा नावाचे प्रकरण आपला खाक्‍या सोडायला तयार नसते, याचे ही संचारबंदी हे निदर्शक.

आता देशात कोविडच्या रुग्णांची संख्या झपाट्याने घटते आहे, मृत्युदर कमी झाला आहे, अशा वेळी लंडनहून कोरोनाच्या स्वरूपातच बदल झाल्याचे वर्तमान आले. हा नवकोरोना अंमळ अधिक प्रसारक्षम आहे, असे तज्ज्ञ सागंताहेत; तसेच तो कमी धोकादायक आहे, असेही सांगताहेत; पण त्या लंडनवार्तेने आता नवे संकट आले की काय, अशी धावपळ सुरू झाली. ती आपण आठेक महिन्यांत काही शिकलो की नाही, असा प्रश्‍न निर्माण करणारी आहे. लंडनहून येणारी विमाने बंद केली, हे काळजी म्हणून ठीकच.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

परदेशातून येणाऱ्यांची तपासणी करणे, गरजेनुसार विलगीकरण हेही योग्य; पण रात्रीची संचारबंदी लादण्याचे नेमके कारण काय? कोरोना निशाचर असल्याचे समाजमाध्यमी विनोद त्यातूनच येतात; मात्र हे प्रकरण विनोदी म्हणून सोडून देण्यासारखे नाही. अर्थव्यवस्था अनेकदा आकलनावर चालते.

शहरात रात्रीची संचारबंदी असे जाहीर व्हायचा अवकाश, लोकांना ठाणबंदीची आठवण येऊ लागली, तर तो दोष लोकांचा नव्हे. ‘घाबरू नका, काळजी घ्या’ असे सतत सांगताना सरकारी कृतीही भय पसरणार नाही, अशी असायला हवी ना. रात्रीच्या संचारबंदीचे तर्कशास्त्र कोणालाच धडपणे सांगता येत नाही. फारतर समर्थन इतकेच, की वर्षअखेर तोंडावर आहे. तो एक साजरा करायचा सण बनला आहे. दीर्घकाळ अडकून बसलेल्यांना यानिमित्ताने मुक्तपणे आनंद साजरा करण्याचे, एकमेकांत मिसळण्याचे भरते येऊ शकते. ते आल्याने ‘कोरोना’चा प्रसार होईल, हे समर्थन तकलादू आहे. ज्यांना ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्ट्याच करायच्या ते संचारबंदीची वाट कशाला पाहतील? सरकारची भावना काहीही असली, तरी ‘संचारबंदी’ शब्द एेकला की पाठोपाठ काही ‘बंद’ होणार ही धारणा होते, त्याचे काय? आणि ती झाली की आता कुठेतरी रखडत चालायला लागलेले अर्थचक्र पुन्हा लडखडायला लागले, तर त्याचे काय?     

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुरक्षित जगात राहून इतरांना काळजी घ्यायचे निरोप देणारे आणि बाहेर पडल्याखेरीज पोट चालत नाही, असे यांच्यात मोठे अंतर आहे. तेव्हा कोणत्याही प्रकारे पुन्हा लॉकडाउन येईल, असे दर्शविणारे काहीही होणार नाही, याची दक्षता सरकारने घ्यावी. नंतर ‘संचारबंदी म्हणजे अमूक नव्हे, त्यात हे येत नाही, ते येत नाही,’ असले खुलासे करण्यापेक्षा खरेच जिथे जास्त गर्दी होईल, असे सरकारला वाटते, तिथे ती होऊ शकणार नाही, अशी यंत्रणा सरकार राबवू शकते. त्यासाठी सरसकट सगळ्या शहरांची रात्र खराब का करता? त्या लॉकडाउनी काळात कोरोनाला ठाणबंद करायचा तेवढाच मार्ग असल्याचा अजागळ समज पसरवला गेला होता. तो अनाठायी असल्याचे सिद्ध झाले आहे. मुद्दा व्यवहार बंद करायचा नाही किंवा माणूस जगवायचा की त्याचे फिरण्याचे स्वातंत्र्य, असाही नाही. तसा तो असल्याचे दाखवणारे दिशाभूल करताहेत. ठाणबंदीने हा विषाणू संपत नाही. औषध लस येईतोवर सावधगिरी बाळगावी लागेल; पण सारे बंद करण्याने प्रश्न आणखी विक्राळ होतात. सरकारची तशी इच्छाही नाही; मग अकारण भय पसरेल, अशा घोषणा टाळता येणार नाहीत काय?  

खरेतर पूर्वानुभव खूप काही शिकविणारा आहे. सावधगिरी बाळगावी, त्याचवेळी प्रसाराला तोंड द्यायची तयारीही ठेवावी. म्हणजेच आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवाव्यात. सर्वाधिक प्रसाराच्या काळात लोकांना हॉस्पिटल मिळत नव्हती, व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत होता. या सगळ्याचे व्यवस्थापन शक्‍य असते. कोरोनाकाळात शासकीय आरोग्य यंत्रणा हळूहळू का होईना; पण या संकटाला तोंड कसे देता येते ते शिकली. ज्या देशात पुरेशी पीपीई किट्स नव्हती, तिथे तुलनेत लक्षणीय तयारी केली गेली. हे सारे सरकारी यंत्रणांचेच यश आहे. आता कोरोनाची साथ भारतात तरी आवाक्‍यात येताना दिसते. त्याच वेळी युरोपात त्याच्या लाटा आदळताहेत. त्यापासून धडा घ्यायला हवा, तो आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याचा; लोकव्यवहार बंद करण्याचा वा त्यावर निर्बंध लादण्याचा नव्हे. लंडनवाला नवा विषाणू असो, की काही सांगतात तसा आफ्रिकेत वेगळे रूप धारण करणारा विषाणू असो; एकमेकांत गुंतलेल्या जगात ते येणारच नाहीत, असे ठामपणे सांगणे अशक्‍य आहे. विषाणू आपल्यात बदल घडवतो, हे काही नवे नाही, तेव्हा त्या अनुषंगाने काळजी घ्यावी; पण ‘बंद’चा मार्ग नको. आधीच्या ठाणबंदीने अर्थव्यवस्था जायबंदी झाली आहे. त्यात भर पडणार नाही एवढी दक्षता घ्यावी; मात्र नवी बातमी येताच ‘बंद’चे वातावरण तयार होणार नाही, हे पाहावे. लोकांनीही कोरोना संपल्याच्या थाटात कसल्याही काळजीविना सुरू केलेले व्यवहारही धोक्याचेच. कोरोनाच्या संदर्भात काळजी घ्यायला भाग पाडणे, ही सरकारची भूमिका हवी. त्याबाबतीत सरकारला लोकांनी साथ द्यायला हवी.

Edited By - Prashant Patil

loading image