esakal | अग्रलेख : निराशेची ‘रजनी’!
sakal

बोलून बातमी शोधा

rajinikanth

दाक्षिणात्य सिनेमाचा सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय रंगमंचावर उडी घेण्यास अखेर नकार दिल्यामुळे अनेकांच्या पदरी निराशा आली असणार! चार दिवस प्रकृती-अस्वास्थ्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल व्हावे लागते काय आणि तेथे तसा ‘ईश्वरी संदेश’ येतो काय, सारेच अजब आहे. आता कोरोनाचे सावट आणि प्रकृती-अस्वास्थ्य ही कारणे ते देऊ पाहत आहेत.

अग्रलेख : निराशेची ‘रजनी’!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दाक्षिणात्य सिनेमाचा सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय रंगमंचावर उडी घेण्यास अखेर नकार दिल्यामुळे अनेकांच्या पदरी निराशा आली असणार! चार दिवस प्रकृती-अस्वास्थ्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल व्हावे लागते काय आणि तेथे तसा ‘ईश्वरी संदेश’ येतो काय, सारेच अजब आहे. आता कोरोनाचे सावट आणि प्रकृती-अस्वास्थ्य ही कारणे ते देऊ पाहत आहेत. मात्र, त्यामुळे जशी त्यांच्या लक्षावधी चाहत्यांच्या पदरी निराशा आली, तशीच ती रजनीकांतला हाताशी धरून तमिळनाडूच्या राजकारणात धूम मचवून देण्याचे मांडे खाणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्याही वाट्याला आली आहे. खरे तर नव्वदच्या दशकापासूनच रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करावा, अशी इच्छा त्यांचे चाहते बोलून दाखवत होते. त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय रंगमंचावरील प्रवेशाबाबत इतके नाट्य उभे केले, की त्यापुढे त्यांच्या चित्रपटांतील अनाकलनीय दृश्‍येही फिकी पडावीत. अखेर आपण राजकारणात प्रवेश करणार असल्याची एकदाची घोषणा त्यांनी २०१७ मध्ये केली; त्यानंतर पुढे एकही पाऊल उचलले नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र, गेल्या महिन्यात अधिकृतरीत्या तसा निर्णय जाहीर केला आणि तमिळनाडूच्या सत्ताकारणावर गेली जवळपास तीन दशके अधिराज्य गाजवणारे द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्या राजकारणाला तिसरा पदर प्राप्त झाला. त्याबरोबर गेल्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता न आलेल्या भाजपच्या आशांनाही धुमारे फुटले. त्याचे कारण म्हणजे रजनीकांतने आपले नरेंद्र मोदी यांच्याविषयीचे प्रेम कधीच लपवून ठेवलेले नव्हते. मात्र, नेमका हाच मुहूर्त साधून अण्णा द्रमुक पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांनीही आपण कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला सत्तेचा चतकोरच काय नितकोर वाटाही देणार नाही, अशी जाज्ज्वल्य घोषणा केली. द्रमुक हा पक्ष काँग्रेसप्रणीत ‘यूपीए’त सहभागी असल्यामुळे भाजप हा अर्थातच अण्णा द्रमुकबरोबर संधान बांधून होता. मात्र, पलानीस्वामींच्या या स्पष्ट भूमिकेमुळे भाजपसाठी रजनीकांत हाच आशेचा किरण होता, तोही आता मावळला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तमिळनाडूतील या निवडणुका अनेक अर्थांनी महत्त्वाच्या आहेत. जयललिता आणि करुणानिधी हे दोघेही अण्णा द्रमुक आणि द्रमुक या पक्षांच्या नेत्यांच्या अनुपस्थितीतली ही विधानसभेची पहिलीच निवडणूक. या दोन नेत्यांबरोबरच एम. जी. रामचंद्रन आणि अण्णादुराई असे सारेच चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी घेऊन राजकारणात उतरले होते. त्यामुळेच रजनीकांत असो की कमल हासन असो; त्यांच्या राजकारण प्रवेशामुळे या निवडणुकीस परत ‘फिल्मी ग्लॅमर’ प्राप्त झाले असते. त्याचबरोबर अण्णा द्रमुकने ठेंगा दाखवल्यामुळे बिहार निवडणुकीत लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांचा प्याद्याप्रमाणे वापर करून घेणाऱ्या भाजपलाही तशीच खेळी रजनीकांत यांच्यासमवेत करता आली असती. मात्र, आता या सर्वच मनसुब्यांवर पाणी पडलंय. खरेतर अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत पश्‍चिम बंगालनंतर भाजपने तमिळनाडूवरच लक्ष केंद्रित केले होते. हिंदी भाषक पट्ट्यात विविध कारणांनी भाजपची लोकप्रियता घसरू पाहत आहे. त्यात शेतकऱ्यांनी महिनाभर राजधानीस घातलेल्या वेढ्याचा मोठा वाटा आहे.

त्यामुळे तेथील घट लोकसभेच्या पश्‍चिम बंगालमधील ४२ आणि तमिळनाडूतील ३९ जागांमधून भरून काढण्याचा आटापिटा भाजपने चालवला आहे. मात्र, भाजपचे सारे डावपेच ओळखूनच अण्णा द्रमुकने ताठर पवित्रा घेतला आहे. भाजप काय, अन्य कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने आमच्यासोबत आघाडी केली तरी त्यांना सत्तेत वाटा न देण्याची ठाम भूमिका घेतली आहे. खरेतर हे आश्‍चर्यच आहे. कारण २०१९ मधल्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले होते! तर, तेव्हा द्रमुकला २४ आणि काँग्रेसला आठ जागा असे मोठे यश ‘यूपीए’ला लाभले होते. त्यामुळेच आता विधानसभेत जागावाटपावेळी काँग्रेसचा अल्पसा ‘स्ट्राइक रेट’ बघता काँग्रेसच्या पदरी अगदी कमी जागा येऊ शकतात. बिहारमध्ये काँग्रेसने ७० जागा पदरी पडल्यावरही केवळ १९ जागा जिंकल्या होत्या, हे आता द्रमुकचे सर्वेसर्वा असलेले स्टॅलिन विसरलेले नसणार!

एकुणात, हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर तमिळनाडूत प्रवेश करण्याच्या भाजपच्या मनसुब्यांचे पुढे काय होते, त्याची झलक रजनीकांत तसेच अण्णा द्रमुक यांच्या या पवित्र्यामुळे बघावयास मिळाली आहे. 

देशभरात भाजपला गेल्या पाच-सात वर्षांत जे यश मिळाले ते निव्वळ ध्रुवीकरणाच्याच जोरावर. मात्र, तमिळनाडूची संस्कृतीच वेगळी आहे. तेथे अशा प्रकारच्या राजकारणास द्रविडी जनतेने जराही थारा आजतागायत दिलेला नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीतच द्रमुक, काँग्रेस, डावे, दलित आणि मुस्लिम हे एका झेंड्याखाली होते. आताही विधानसभा निवडणुकीत ते एकत्रच असतील, असे दिसते. त्यामुळे भाजपला तेथे पाय रोवण्यासाठी कोणी तरी बडा ‘मित्र’ हवा होता. भाजप नेते रजनीकांतकडे त्यामुळेच डोळे लावून बसले होते. मात्र, आता त्यांचे सारे मनसुबे खलबतखान्यातील ‘चिंतन बैठकी’पुरतेच उरले आहेत.

Edited By - Prashant Patil