esakal | अग्रलेख : दुभंग दर्शन!
sakal

बोलून बातमी शोधा

Donald-Joe

रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प सत्ता राखणार की डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन त्यांना हरवून सत्तेवर येणार, याकडे अमेरिकेचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागून राहिलेले असले तरी बुधवारी तरी विजय कुणाचा, हे स्पष्ट झाले नव्हते. मतदारांनी कौल कोणाच्या पारड्यात टाकला आहे, हे लवकरच स्पष्ट होईल, पण ही संपूर्ण निवडणूक आणि मतदानाची प्रक्रिया ज्या परिस्थितीत आणि ज्या पद्धतीने पार पडली, त्याचीही दखल घेणे आवश्‍यक आहे. निकालाला उशीर होण्यास कमालीची चुरसही कारणीभूत आहे, यात शंकाच नाही.

अग्रलेख : दुभंग दर्शन!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प सत्ता राखणार की डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन त्यांना हरवून सत्तेवर येणार, याकडे अमेरिकेचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागून राहिलेले असले तरी बुधवारी तरी विजय कुणाचा, हे स्पष्ट झाले नव्हते. मतदारांनी कौल कोणाच्या पारड्यात टाकला आहे, हे लवकरच स्पष्ट होईल, पण ही संपूर्ण निवडणूक आणि मतदानाची प्रक्रिया ज्या परिस्थितीत आणि ज्या पद्धतीने पार पडली, त्याचीही दखल घेणे आवश्‍यक आहे. निकालाला उशीर होण्यास कमालीची चुरसही कारणीभूत आहे, यात शंकाच नाही. अमेरिकी समाजात जो धारदार दुभंग तयार झाला आहे, त्याचेही दर्शन यानिमित्ताने घडते आहे. भूमिपुत्र आणि परके, गोरे आणि कृष्णवर्णीय, सधन आणि वंचित अशा भेदाभेदांचे दर्शन यावेळी ठळकपणे घडले. स्विंग स्टेट्‌स या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाची ठरणार हे सुरवातीपासून सांगितले जात होते, त्याचा प्रत्यय मोजणीची प्रक्रिया सुरू असताना येत आहे. लोकप्रियतेची मते आणि राज्यांमधील इलेक्‍टोर अशा दुहेरी पद्धतीतील क्‍लिष्टता आणि त्यात जाणवणारी संदिग्धता हे यावेळी जेवढे जगाच्या तीव्रतेने निदर्शनास आले, तेवढे कधीच आले नसेल. या संदिग्धतेमुळेच निकाल लागण्याच्या आधीच न्यायालयात जाण्याची भाषा केली जात आहे. भारताप्रमाणे स्वायत्त निवडणूक आयोग ही संस्था नसणे हाही अमेरिकी व्यवस्थेतील दोष तीव्रतेने जाणवत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘विश्वास ठेवा, निवडणूक आपणच जिंकणार,’ असे सांगत डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन समर्थकांना धीर देत आहेत. तर रिपब्लिकन उमेदवार, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणूक प्रक्रियाच रद्द करा, सांगत न्यायालयात जाण्याची भाषा करत आहेत. संकेतांची बूज राखणारी जगातील सर्वात शक्तिशाली लोकशाही म्हणून अमेरिकेकडे पाहिले जाते. अमेरिकी नेतेही जगभर आपल्या लोकशाहीची मातब्बरी सांगत विकसनशील देशांना उपदेशाचे डोस पाजत असतात. पण तेथील निवडणूक पद्धतीतील दोष यावेळी ठळकपणे नजरेस आले. तेथील राजकीय वर्ग काही आत्मपरीक्षण करणार आहे का आणि काही सुधारणेची पावले टाकणार आहे का, हा प्रश्‍न आहे. २०१६ची निवडणूकदेखील वादग्रस्त ठरली होती आणि प्रचारातही निवडणुकीतील रशियाच्या हस्तक्षेपाचा मुद्दा होता. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेच्या जागतिक वर्चस्वाला काही प्रमाणात अलीकडच्या काळात ओहोटी लागली आणि ट्रम्प त्याच पार्श्‍वभूमीवर सत्तेवर आले. ‘अमेरिका फर्स्ट’ घोषणेवर ते निवडून आले. त्याच्या अंमलबजावणीने अमेरिकी उद्योगधंद्यांना उभारी, रोजगारनिर्मितीला चालना मिळाली. अर्थव्यवस्था मजबूत झाली. प्रगल्भ लोकशाही, जगाच्या कल्याणासाठीची धोरणे आणि आपत्तीच्या काळात उभा राहणारा ‘बिग ब्रदर’ या अमेरिकेबाबतच्या जागतिक धारणा त्यांच्या काळात गळून पडल्या. अफगाणिस्तानातील माघारी, इराणवरील आर्थिक निर्बंध, उत्तर कोरियाच्या अणू कार्यक्रमाला विराम, पश्‍चिम आशियातील पेचावर तोडगा अशा अनेक बाबतीत त्यांनी अमेरिकेचा पाय गोत्यात नेला.

चीनविरूद्ध व्यापार युद्ध आरांभले. चीन एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेत स्वतःची जागा निर्माण करण्याचा प्रयत्नात असताना अमेरिकी वर्चस्वाला जास्तच हादरे बसले.‘विक स्टेट, विथ स्ट्राँग प्रेसिडेंट’ अशी ट्रम्प यांची प्रतिमा कोरोनाविरुद्धच्या लढ्यात उठवदार झाली. अमेरिकेने कोरोनाच्या साथीत सव्वादोन लाखांवर जीव गमावले, लाखोंचा रोजगार गेला. बडा घर, पोकळ वासा असे तिचे रूप जगासमोर आले. ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर’ने अमेरिकेतील वांशिक भेदाच्या भिंतीची लक्तरे वेशीवर टांगली. ट्रम्प यांचा अतिउजवा चेहेरा आणि बेमुर्वतखोरपणाच दिसला. स्थलांतरितांबाबत कडक धोरण, मेक्‍सिको सीमेवर भिंत बांधण्याचा दुराग्रह, लॅटिन जनतेला उपद्रवकारक धोरणे त्यांनी राबवली. जागतिक आरोग्य संघटना, पॅरिस क्‍लायमेट चेंज करार यातून अमेरिकेचे बाहेर पडणे म्हणजे चीनला रान मोकळे ठरले. या सगळ्यांचे पडसाद मतदानात उमटले नसते तरच नवल.

याउलट, बायडेन आणि त्यांच्या आफ्रो-आशियाई वंशाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा संयत प्रचार, निवडून आल्यास अमेरिकेतील वांशिक अस्वस्थतेवर तोडगा, आरोग्य, विमा, रोजगारनिर्मिती यांच्यापासून ते चीनबरोबरील धोरण यांबाबत ते स्पष्टता देत राहिले. ट्रम्प यांच्या विधानांनी प्रचाराची पातळी अत्यंत खाली गेली. या उलट बायडेन यांनी अध्यक्षपदाचा सुसंस्कृतपणाच दाखवला. बायडेन यांच्या बाजूने कौल गेल्यास ट्रम्प तो सहजासहजी उमेदपणाने स्वीकारतील, अध्यक्षपदाची खुर्ची सोडतील, असे वाटत नाही. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात.  लोकशाही संकेत आणि व्यवस्थेच्या विपरीत वर्तन होईल, असेही गुप्तचरांचे अहवाल आहेत. ते खरे ठरणे म्हणजे, अमेरिका नावाच्या संकल्पनांनाच तडे जाणे आहे. तेथील धुरिणांना राजकीय व्यवस्थेच्या पुनर्रचनेच्या आव्हानाला तोंड द्यावे लागेल, याची निकड प्रकर्षाने समोर आली आहे. 

Edited By - Prashant Patil

loading image