अग्रलेख : अमेरिकी नामुष्कीचे स्वगत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 February 2021

लोकशाहीवरच गंडांतर येऊनही अमेरिकी राजकारणातले दुभंगलेपण कमी होताना दिसत नाही. त्यामुळे ट्रम्प महाभियोगाच्या कचाट्यातून निसटू शकले. त्यांनी मात्र आपला विजय झाल्याचा आव आणला आहे.

अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील ‘ट्रम्पपर्व’ हे एक असाधारण  प्रकरण म्हणावे लागेल. महाभियोग दोनदा दाखल झालेले ते पहिलेच.  कमालीची आत्मकेंद्रितता, विकारवशता आणि लोकशाहीच्या मार्गाने सत्तेवर येऊनही लोकशाहीच्या मूल्यांविषयी तुच्छता या सगळ्यामुळे वादग्रस्त ठरलेले ट्रम्प यांना २०२० च्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. पण तो स्वीकारण्यास त्यांनी शेवटपर्यंत खळखळ केली. ‘इलेक्टोरल कॉलेज’मध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांनी त्यांच्यावर निर्विवाद मात केली होती आणि त्यांच्या विजयावर अमेरिकी कॉंग्रेसमध्ये सहा जानेवारीला शिक्कामोर्तब होणार होते. त्याच दिवशी आपल्या समर्थकांना ‘कॅपिटॉल हिल’ कडे जमण्यास ट्रम्प यांनी सांगितले आणि या समर्थकांनी तेथे जाऊन अक्षरशः हैदोस घातला. तेथील मतमोजणीची प्रक्रियाही काही काळ विस्कळित झाली, एवढेच नव्हे तर तेथे झालेल्या हिंसाचारात पाच जण मृत्युमुखी पडले. अमेरिकी लोकशाहीवरचा हा एक कलंकच म्हणावा लागेल. त्यामुळेच सत्तेतून बाहेर पडल्यानंतरही त्यांच्यावर महाभियोग झाला पाहिजे,असा आग्रह धरला गेला. मात्र तो मंजूर होण्यासाठी सिनेटमध्ये दोन-तृतीयांश मते आवश्यक असतात. काही रिपब्लिकन मते फुटली, पण ती पुरेशी नव्हती. त्यामुळे महाभियोग बारगळला आणि ट्रम्प बचावले. वास्तविक या घडामोडीचा अर्थ इतकाच की सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला दोन-तृतीयांश बहुमत नाही आणि काही रिपब्लिकन  पक्षाची सात मते फुटली असली तरी या पक्षावर ट्रम्प यांचा काही ना काही प्रभाव आहे. या हे घडणे अपेक्षितही होते. पण एरवीही ‘पडलो तरी नाक वर’ अशी वृत्ती असलेल्या ट्रम्प यांनी हा आपला मोठा विजय असल्याचा आव आणला आहे. ‘अमेरिकेला महान बनविण्याचे कार्य अद्याप अपूर्ण आहे आणि आपण त्यासाठी पूर्ण शक्तिनिशी काम करू; ही तर सुरवात आहे’ असे ते म्हणाले. नैतिक जबाबदारी स्वीकारणे हा प्रकार अलीकडे सगळीकडूनच हद्दपार होत चालला आहे. ट्रम्प यांच्या बाबतीत तर वेगळे काही घडण्याची शक्यताच नव्हती. सहा जानेवारीला ‘ व्हाइट हाऊस’ समोर भाषण करताना त्यांनी प्रक्षोभक भाषा वापरली होती. खुद्द त्यांच्या पक्षाचे सिनेटमधील वरिष्ठ नेते मिट मॅकोनेल यांनी ट्रम्प यांच्यावरील महाभियोग अयशस्वी झाला असला तरी नैतिक जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही, अशी टिप्पणी केली आहे. अर्थात त्यांनी स्वतः मात्र महाभियोगाच्या विरोधात मत दिले. त्यांचे म्हणणे असे, की माजी अध्यक्षावर महाभियोग चालविणे घटनाबाह्य आहे. थोडक्यात सांगायचे तर हा विजय असलाच तर तांत्रिक स्वरूपाचा आहे.    

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राजकीय किंमत मोजावी लागली तरी बेहेत्तर; पण तत्त्वाला चिकटून राहणार, हा बाणा आता राजकारणाच्या क्षेत्रात अगदी अपवादानेच कुठेतरी दिसतो आणि अमेरिकी राजकारणीही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे पक्षातीत भूमिकेतून केवळ लोकशाहीच्या मुद्यावर एकत्र येण्याचे धार्ष्ट्य रिपब्लिकन पक्षातील बहुतेक सिनेटसदस्यांनी दाखवले नाही. अमेरिकी राजकारणातील ज्या दुंभगलेपणाविषयी सातत्याने बोलले जात आहे, तेच ठळकपणे याही घटनेत दिसले. तसे पाहता रिपब्लिकन पक्षातील एक मोठा गट ट्रम्प यांच्यावर नाराज आहे. या व्यक्तीच्या छायेतून पक्षाला बाहेर काढले पाहिजे, आणि पक्षाला पूर्वीचे वैभव आणि प्रतिष्ठा मिळवून द्यायला हवी, असे या गटाला वाटते. पण या गटाच्या सिनेटमधील सर्व सदस्यांना उघड भूमिका घेणे परवडणारे नव्हते. अध्यक्षीय निवडणुकीत टम्प पराभूत झाले असले तरी देशात आणि पक्षातही त्यांचा राजकीय जनाधार पार ओहोटीला लागलेला नाही, हे लक्षात घ्यायला हवे. ट्रम्प यांचे वर्तन, त्यांची वक्तव्ये आणि अनेक धोरणेही वादग्रस्त होती, यात शंका नाही. तरीही बायडेन-हॅरिस सत्तेवर आल्यानंतरही ती धोरणे पूर्णपणे बदललेली नाहीत, हेही वास्तव बोलके आहे.  ट्रम्प यांनी सत्ताधाऱ्यांवर सूडबुद्धीच्या राजकारणाचा आरोप केला आहे. ते स्वतः शत्रूकेंद्रित राजकारण करतात, त्यामुळे त्यांना असे म्हणण्याचा अधिकार किती हा प्रश्नच आहे. तरीही डेमोक्रॅटिक पक्षानेदेखील सतत ट्रम्पविरोधाचा सूर आळवत ठेवण्याने या गोष्टीचा राजकीय फायदा  ट्रम्प हेच उठविण्याचा प्रयत्न करतील, हे लक्षात घ्यायला हवे. त्यांचा राजकीय पराभव करायचा असेल तर अमेरिकेत नवे राजकीय चर्चाविश्व कसे साकारेल, नवे नरेटिव्ह कसे मांडता येईल, हे पाहायला हवे.  महाभियोग बारगळल्याने ट्रम्प जोरदार ‘कमबॅक’ साठी सरसावतील. जवळजवळ साडेसात कोटी लोकप्रिय मते ( पॉप्युलर व्होट्स) त्यांना २०२०च्या निवडणुकीत मिळाली. विद्यमान अध्यक्षाला पुन्हा निवडणुकीला सामोरे जाताना मिळालेली ही मते म्हणजे एक उच्चांकच ठरला. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या कट्टर राष्ट्रवादाच्या भूमिकेला अमेरिकी जनतेत या घडीला पाठिंबा मिळत आहे. ट्रम्प यांचे काय होते, यापेक्षा हे सारे कशामुळे घडत आहे, याच्या मुळाशी जावे लागेल. विद्यमान अध्यक्ष ज्यो बायडेन यांची कसोटी तेथे आहे. ‘ट्रम्प गंभीर आरोपांमधून निसटले, हे लोकशाही व्यवस्थेच्या कमकुवतपणाचे द्योतक आहे, आणि त्यामुळेच लोकशाही टिकविण्यासाठी सतत जागरूक राहावे लागेल’, अशी प्रतिक्रिया अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी व्यक्त केलीच आहे. त्यामुळे या आव्हानाला खऱ्या अर्थार्ने सामोरे जाण्याचा प्रयत्न ते करतील, या आशेला जागा आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article about American Political History donald trump