esakal | अग्रलेख : जरतारी हे वस्त्र माणसा...
sakal

बोलून बातमी शोधा

bhanu athaiya

भारतात मात्र ‘ड्रेस डिझायनर’ या बिरुदाला शान मिळवून दिली ती भानूताईंनी. आपल्या चित्रपटसृष्टीतून पोशाखाच्या नानाविध फॅशन्स प्रचलनात आल्या आहेत.

अग्रलेख : जरतारी हे वस्त्र माणसा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

‘वस्त्र माणसाला ओळख देते. उघड्यावाघड्यापाशी समाजाला देण्यासारखे फार थोडे किंवा काहीही नसते...’ अशा अर्थाचे एक चटकदार वाक्‍य विख्यात साहित्यिक मार्क ट्‌वेन यांच्या नावावर नोंदवलेले आहे. ‘क्‍लोद्स मेक्थ द मॅन...’ असे ते सुभाषित कधी ट्‌वेनसाहेबांचे म्हणून सांगितले जाते, कधी शेक्‍सपीअरच्या खातेवहीत नोंदवले जाते. कधी त्याचा पदर प्राचीन लॅटिन संस्कृतीपर्यंत नेला जातो. या सुभाषिताचा जनक कोणीही असो; पण वस्त्र ही उत्क्रांत मानवाची निव्वळ मूलभूत गरज नाही, तर अभिव्यक्तीची एक समृद्ध भाषा आहे, हे त्यातून ध्वनित होतेच. या सुभाषिताला कलात्मक अर्थ देणाऱ्या श्रीमती भानू अथय्या यांचे गुरुवारी देहावसान झाले. वस्त्र-प्रावरणांची ही अनोखी भाषा जाणणारी एक प्रज्ञावंत कलावती आपल्यातून निघून गेल्याची तीव्रतेने जाणीव झाली. पोशाखकला हे सर्वच संस्कृतींमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण कलादालन राहिले आहे. पाश्‍चात्त्यांमध्ये तर त्याचे रीतसर शास्त्रामध्ये रूपांतर होऊ शकले. भारतात मात्र ‘ड्रेस डिझायनर’ या बिरुदाला शान मिळवून दिली ती भानूताईंनी. आपल्या चित्रपटसृष्टीतून पोशाखाच्या नानाविध फॅशन्स प्रचलनात आल्या आहेत. पण, या क्षेत्रात भारताला पहिलेवहिले ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानूताई एकमेव. अर्थात, फिल्मी दुनियेतील नामवंत ड्रेस डिझायनर एवढीच त्यांची सीमित ओळख नव्हती, त्यापेक्षा खूप काही त्यांनी साध्य करून दाखवले आहे. आपल्या तब्बल अर्ध्या शतकाहून अधिक काळाच्या कारकिर्दीत भानूताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीला ही वस्त्रभाषा अशी काही शिकवली की त्याला तोड नाही. चित्रपट बोलू लागला, रंगीतदेखील झाला. नवनवे संज्ञाप्रवाह समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही चित्रसृष्टी अहर्निश करत होती आणि आजदेखील करते. त्यात भानूताईंच्या प्रतिभेचा वाटा लक्षणीय म्हटला पाहिजे. १९८२मध्ये सर रिचर्ड अटेनबरो यांनी ‘गांधी’ हा महाचित्रपट पेश करून देशोदेशींच्या चित्रनिर्मात्यांना खडबडून जागे केले होते. या चित्रपटाने जगभरात अक्षरश: खोऱ्याने पुरस्कार ओढले आणि मानाचा ऑस्कर सन्मानही. त्यातलीच एक ऑस्करची बाहुली भानूताईंच्या कपाटात विराजमान झाली होती. गांधीजी आणि कस्तुरबांसारख्या व्यक्तिरेखांचे अचूक पोशाख निर्मिणाऱ्या, याच भानूताईंनी साठीच्या दशकात ‘आम्रपाली’ चित्रपटात वैजयंतीमालासाठी एक चित्ताकर्षक प्रावरण कौशल्याने बेतले. ती ‘आम्रपाली’ साडी अनेक नृत्य कार्यक्रमांमध्ये मिरवली जाऊ लागली. आजही या ‘आम्रपाली’ परिधानाचे आविष्कार कुठेकुठे दिसतच असतात. त्यासाठी भानूताईंनी खास अजिंठ्याच्या प्राचीन चित्र-गुंफांना भेट देऊन रीतसर संशोधन केले होते. तद्दन व्यावसायिक चित्रपटासाठी इतके कोण करते? पुढे ‘ब्रह्मचारी’ चित्रपटात तेव्हाची विख्यात अभिनेत्री मुमताजसाठी त्यांनी खास ‘मुमताज साडी’ डिझाइन केली. ही ‘मुमु साडी’ बघता बघता समाजातील युवतींच्या अंगावर दिसू लागली. ‘प्यासा’ विमनस्क नायक गुरुदत्त यांनी अजरामर केला खरा; पण त्याच्या खांद्यावरली शाल, बंगाली धोतर आणि कुर्ता ही सारी वस्त्रयोजना भानूताईंच्या कलात्मकतेतूनच साकारलेली होती.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भानूताईंच्या डोळस वस्त्रयोजनेने विनटलेल्या, ‘जॉनी मेरा नाम’, ‘मेरा नाम जोकर’पासून ‘लगान’पर्यंत शंभरेक चित्रपटांची यादी सहज सांगता येईल. व्यावसायिक किंवा ज्याला अगदी मसाला चित्रपट असे म्हटले जाते, तसल्या चित्रपटांचा कपडेपट सांभाळतानाही भानूताईंनी कलात्मकतेचा धागा कधी सोडला नाही. देशात चित्रसृष्टीची मुहूर्तमेढ मराठी मातीत रोवली गेली आणि त्या चित्रसृष्टीच्या भाळावर ऑस्करचा टिळा लावणाऱ्या भानूताईदेखील इथल्याच कोल्हापूरच्या. अण्णासाहेब राजोपाध्यांच्या या मुलीने पुढे मुंबई गाठली. त्या चमकत्या दुनियेत आपले स्थान निर्माण केले. त्यांनी बेतलेल्या वस्त्रांच्या पुनःपुन्हा नव्या आवृत्त्या निघतात आणि नवनवे वस्त्रतज्ज्ञ त्यावरच आपापली दुकाने चालवत असतात, यात सारे काही आले! भानूताईंनीही आपले एखादे पंचतारांकित ‘बुटिक’ सुरू करावे, असा सल्ला त्यांना वेळोवेळी मिळाला. परंतु, फॅशनेबल वस्त्रे बनवून विक्रीस ठेवण्याच्या उद्योगात त्यांचा जीव कधी रमला नाही. वस्त्र ही एक अभिव्यक्तीची भाषा आहे, कलात्मक आविष्कार आहे, ही त्यांची श्रद्धा होती. प्राचीन चोपड्या, चित्रे, कोरीव शिल्पे यातून मनाला स्पर्शून जाणारे आकृतिबंध आणि वस्त्रप्रावरणांच्या नव्या कल्पना त्यांना सुचत राहत. नवे काही घडवण्यासाठी इतिहास, संस्कृतींचे पदर अभ्यासले पाहिजेत, असे त्यांचे मत होते. वृध्दापकाळात त्यांनी ऑस्कर सन्मान देणाऱ्या अकादमीला पत्र पाठवून ‘माझ्या पश्‍चात तुम्ही दिलेल्या पुरस्काराची हेळसांड होईल, ते अकादमीच्या संग्रहातच ठेवावे,’ असे कळवून ती बाहुली परत केली. कलात्मक यशाप्रति ही निस्सीम श्रध्दा दुर्मीळच म्हणायची. ‘अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची, जीर्ण शाल पण उरे शेवटी, लेणे वार्धक्‍याचे...’ या उक्तीनुसार त्या जगल्या, आणि शांतपणे त्यांनी जगाचा निरोपही घेतला. त्यांच्या आयुष्याचे वस्त्र खऱ्या अर्थाने जरतारी होते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा