esakal | अग्रलेख :  ‘शतप्रतिशत’ मनोरंजन 
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

सरकार कोसळण्याची शक्‍यता नसल्याचे फडणवीस यांनी आडवळणाने का होईना मान्य केले आहे.‘आम्ही सरकार पाडणार नाही; पण तुम्ही ते चालवून तर दाखवा!’ हे बैठकीतील त्यांचे उद्‌गारच याची साक्ष देत आहेत.

अग्रलेख :  ‘शतप्रतिशत’ मनोरंजन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील आपल्या नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांच्या पहिल्या-वहिल्या बैठकीसाठी मुहूर्त तर मोठा नामी शोधून काढला होता! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी झालेल्या या बैठकीतील वक्‍तव्ये आणि नंतरच्या अवघ्या २४ तासांत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेले भाष्य बघता, आठ महिन्यांपूर्वी हातातोंडाशी आलेल्या सत्तेवर कब्जा न करता आल्यामुळे आलेल्या अस्वस्थतेतून हे नेते अजूनही बाहेर येऊ शकलेले नाहीत, हे सिद्ध होते. ‘कोरोना’च्या सावटात ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने घेणे भाग पडलेल्या या बैठकीत दिल्लीतून पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हेही सहभागी झाले होते. आपल्या नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांना पुढील काळात पक्षाने काय करावे, याविषयी ते काही ठोस मार्गदर्शन करतील, अशीच साऱ्यांची अपेक्षा होती. मात्र नड्डा असोत की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वा चंद्रकांतदादा असोत; या साऱ्यांनीच शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या नावाने बोटे मोडूनच बैठक पार पाडली! नड्डा यांनी या बैठकीत पक्षकार्यकर्त्यांना यापुढे ‘शतप्रतिशत भाजप!’ हेच ध्येय ठेवण्याची सूचना करताना, यापुढे राज्यातील सर्व निवडणुका स्वबळावर जिंकण्याचा मंत्र दिला. मात्र, नड्डा यांचे शिवसेनेवर खरमरीत टीका करणारे मार्गदर्शन सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘गतस्मृतींना उजाळा’ देणे पसंत केले! ‘वाढदिवस हा गतकाळातील आठवणींचा जागर करण्याचा दिवस असतो आणि हा दिवस म्हणजे एक संधीही असते!’ असे मोदी यांनी उद्धव यांना पाठविलेल्या संदेशात नमूद केले आहे. हे पत्र थेट मुख्यमंत्री कार्यालयानेच प्रसिद्धीस दिले. त्यामुळे आता भाजप कार्यकर्त्यांपुढे नड्डा यांचे ऐकायचे की मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे ‘गतस्मृतीं’मध्ये दंग व्हायचे, असा प्रश्‍न उभा ठाकला, तर त्यात नवल ते काहीच नाही ! मात्र, हा संभ्रम दूर केला तो चंद्रकांतदादांनीच! दोनच दिवसांपूर्वी ‘होऊन जाऊ द्या!’ असे आव्हान शिवसेनेला देणाऱ्या पाटील यांनी मोदी यांनी उद्धव यांना पाठवलेल्या ‘प्रेमसंदेशा’नंतर ‘आम्ही राज्याच्या हितासाठी शिवसेनेबरोबर जाण्यास तयार आहोत!’ अशी कोलांटउडी मारली. मात्र, त्याचवेळी निवडणुका मात्र स्वबळावरच लढवू, असे सांगत नड्डा यांचा अवमान होणार नाही, याचीही खबरदारी घेतली!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

नेत्यांच्या वक्‍तव्यामुळे एकीकडे भाजप कार्यकर्ते दिग्मूढ झालेले असतानाच, तिकडे सरकारपक्षातही कोपरखळ्या आणि फिरक्‍या सुरूच आहेत! या महाविकास आघाडी सरकारची संभावना फडणवीस यांनी ‘तीन चाकी रिक्षा’ अशी केली होती. ती टीका मुख्यमंत्र्यांना बरीच झोंबली असावी. त्यामुळे आपल्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी ‘रिक्षा तीन चाकी असली, तरी त्याचे स्टिअरिंग व्हील मात्र आपल्याच हातात आहे!’ असे प्रत्युत्तर दिले. मात्र, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव यांना ‘ट्विटर’वरून शुभेच्छा देताना सोबत एक फोटोही जोडला. या फोटोत एका चारचाकीत उद्धव यांना शेजारी बसवून अजित पवार स्वत: स्टिअरिंगवर असल्याचे दिसत आहे! आता या शुभेच्छा आहेत, कोपरखळी की टोमणा, हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. फडणवीस यांनीही रिक्षाचे स्टिअरिंग (की हॅण्डल?) आपल्याच हातात असल्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणखी एक टोला लगावला आहे. ‘रिक्षा कोठे न्यायची हे चालक ठरवत नसतो, तर त्या रिक्षाची दिशा हे मागे बसलेले लोक (म्हणजेच प्रवासी) ठरवत असतात’, असे फडणवीस यांनी उद्धव यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. एकंदरित या साऱ्या बोलघेवड्या नेत्यांमुळे ‘कोरोना’च्या सावटाखाली घरकोंबड्यासारखे जिणे नशिबी आलेल्या लोकांची चांगलीच करमणूक झाली, यात शंका नाही!

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ही सारी वक्‍तव्ये आणि कोपरखळ्या, तसेच आव्हाने आणि प्रतिआव्हाने यांच्याकडे केवळ करमणूक म्हणूनच बघायला हवे; कारण आजमितीला महाराष्ट्रातील आघाडी सरकार कोसळण्याची काहीही चिन्हे नाहीत. भाजप नेते अस्वस्थ असल्याचे प्रमुख कारण हेच आहे आणि ‘या नेत्यांच्या पोटात सारखे दुखत आहे!’ असे तर मुख्यमंत्र्यांनीच आपल्या प्रदीर्घ मुलाखतीत सांगून टाकले आहे! एक मात्र खरे. ठाकरे सरकार कोसळण्याची शक्‍यता नसल्याचे फडणवीस यांनी आडवळणाने का होईना मान्य केले आहे. ‘आम्ही सरकार पाडणार नाही; पण तुम्ही ते चालवून तर दाखवा!’ हे नवनियुक्‍त कार्यकारिणीच्या बैठकीतील त्यांचे उद्‌गारच याची साक्ष देत आहेत. त्यामुळेच आता मुख्यमंत्र्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यांना आता खरोखरच डोळ्यांत तेल घालून कारभार करावा लागणार आहे; कारण या सरकारचा भ्रष्टाचार शोधून तो उघड करण्याचा विडा भाजप नेत्यांनी उचलला आहे. शिवाय, ‘कोरोना’वर नियंत्रण आणण्यात सरकार कसे अयशस्वी ठरले, ते जनतेला पटवून देण्याची जबाबदारी नड्डा यांनीच नव्या पक्ष पदाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांना मोदी यांच्या सल्ल्यानुसार ‘गतस्मृतींना उजाळा’ देतानाच भविष्यावर नजर ठेवून काम करावे लागणार आहे. त्यात ते यशस्वी झाले तरच हा वाढदिवस आणि सर्वांच्या शुभेच्छा कारणी लागल्या, असे म्हणता येईल!