esakal | अग्रलेख : तिरकस खेळपट्टी, सरळ चेंडू!
sakal

बोलून बातमी शोधा

ravichandran-ashwin

अहमदाबाद कसोटी सामन्यात बाद झालेल्या ३० फलंदाजांपैकी २८ फलंदाज फिरकीसमोर नतमस्तक झाले होते आणि त्यात २१ फलंदाजांनी न वळलेल्या म्हणजे सरळ चेंडूवर लोटांगण घातले होते.

अग्रलेख : तिरकस खेळपट्टी, सरळ चेंडू!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अपयशाचे किंवा पराभवाचे खापर फोडण्यासाठी कोणते तरी कारण लागते. क्रिकेट हा खेळ बॅट-बॉलचा असला तरी रण(रन)भूमी खेळपट्टीच असते. परिमाणी हरणारा संघ कामगिरीतील दोषांपेक्षा खेळपट्टीचीच खुंटी वापरताना अनेकदा दिसून आलेले आहे. भारतात हे वारंवार घडते. मग सध्या सुरू असलेला साहेबाचा अर्थात इंग्लंड संघाचा भारत दौरा त्यास अपवाद कसा असेल? चेन्नईतील दुसरी कसोटी ट्रेलर होती तर अहमदाबादमध्ये दोन दिवसांत एकामागोमाग एक धक्का देणारा असा काय क्‍लायमेक्‍स घडला की प्रकाशझोतात इंग्लंड फलंदाजांसमोर काजवे चमकले आणि ‘नाचता येईना...’ असा सूर त्यांनी लावला. पाच दिवसांचा कसोटी सामना दोन दिवसांच्या आत संपल्यानंतर "टार्गेट खेळपट्टी'' असा पाहुण्यांकडून निषेधाचा सूर लावणे स्वाभाविक आहे. पण दोन दिवसात कसोटी संपल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आत्तापर्यंत असे २१ वेळा घडले आहे.

काही महिन्यांपूर्वी ऍडलेडमध्ये ३६ धावांत खुर्दा उडाल्यावर भारतीयांनी खेळपट्टीला दोष देण्याऐवजी स्वतःच्या चुका मान्य केल्या होत्या. ही झाली एक बाजू. पण अहमदाबादमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या भव्यदिव्य अतिविशाल स्टेडियमध्ये जे घडले ते आपण कोणत्या चष्म्यातून पहातो तशी त्याची प्रतिमा दिसून येते. या सामन्यात घडललेली आकडेवारी पटावर मांडली तर वेगळेच चित्र समोर येते. बाद झालेल्या ३० फलंदाजांपैकी २८ फलंदाज फिरकीसमोर नतमस्तक झाले होते आणि त्यात २१ फलंदाजांनी न वळलेल्या म्हणजे सरळ चेंडूवर लोटांगण घातले होते. म्हणजे जर ‘फिरकीचा आखाडा’ अशा शिमगा करायचा असेल तर न वळलेल्या चेंडूंचे काय? इंग्लंडचे २० पैकी ११ फलंदाज एक तर पायचीत झाले किंवा त्रिफाळाचीत झाले. म्हणजेच यष्टींच्यासमोर असलेल्या चेंडूने (फिरकी न घेतलेल्या) त्यांना मामा बनवले. आकडेवारीचा हा खेळ ‘तिरकस खेळपट्टी आणि सरळ चेंडू’ अशी नवी म्हण पुढे आणणाराच झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पूर्वनिर्धारित मानसिकता अपयशास कारणीभूत ठरत असते. चेन्नईत दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड फलंदाजांचे धाबे दणाणून सोडणारे आर. अश्‍विन आणि अक्षर पटेल हे फिरकी गोलंदाज इंग्लिश फलंदाजांना संताजी, धनाजीसारखे दिसत असावेत. याचे कारण या दोन सामन्यांत किमान सात दिवसांचे अंतर होते, तरीही त्यांचा मुकाबला करण्याचे सूत्र त्यांना सापडले नाही, हे सत्यच आहे. चेन्नईची खेळपट्टी काळ्या मातीची होती. त्यावर चेंडू खाली राहतो. अहमदाबादची खेळपट्टी मुंबईप्रमाणे लाल मातीची होती, त्यावर चेंडू उडतो आणि अधिक वेगान येतो. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून होणारी तयारी युद्ध जिंकवत असते. इंग्लंडने यापैकी कोणताच अभ्यास केलेला दिसत नाही. प्रगती पुस्तकावर लाल शेरा आल्यावर स्वतः अभ्यास केला नाही हे मान्य करण्यापेक्षा शाळाच चांगली नव्हती, अशी पळवाट काढण्याचा प्रकार त्यांनी केला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता प्रेक्षक, चाहते, जाहिरातदार आणि ब्रॉडकास्टर्स आणि एका सामन्यासाठी होत असलेली लाखोंची उलाढाल लक्षात घेता पाच दिवसांचा सामना दोन दिवसांतच संपणे हे कोणत्याही दृष्टीने व्यावहारिक नाही. मैदानावर उतरणाऱ्या योद्ध्यांनाच सरळ रेषेत येणारे बाण झेलता येत नसतील, तर नेमका दोष कोणाचा? आधी मोटेरा त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल आणि आता नरेंद्र मोदी असे नामकरण झालेल्या अहमदाबादच्या या स्टेडियमवर सात वर्षांनंतर पहिला आंतरराष्ट्रीय सामना झाला.

नूतनीकरणानंतर होणाऱ्या अशा मोठ्या सामन्याअगोदर सरावासाठी प्रथम श्रेणीचा सामना होणे आवश्‍यक असते; पण आता कोरोनामुळे तशी परिस्थिती नाही. राष्ट्रीय ट्‌वेन्टी-२० स्पर्धेचे बाद फेरीचे सामने मात्र झाले. हा योगायोग की अन्य काही? पण दोन इनिंगचा हा कसोटी सामना ट्‌वेन्टी-२० सारखाच झाला. सर्व मिळून १४० षटकांत तो संपला. पण प्रश्‍न प्रकाशझोतातील सामन्याची ही नवलाई ‘याची देही,याची डोळा’  पहाण्यासाठी पाच दिवसांचे पूर्ण तिकिट काढलेल्या क्रिकेटसाठी मायबाप प्रेक्षकांचे काय? थेट प्रक्षेपणासाठी टीव्हीवर जाहिरातींचा स्लॉट बुक करणाऱ्या कंपन्यांचे काय? अशा अनेक घटकांची इंग्लिश फलंदाजांप्रमाणेच सरळ येणाऱ्या चेंडूने विकेट काढली हे मात्र नक्की.

या दोन दिवसीय कसोटी सामन्याचे कवित्व येथेच संपत नाही. याचे कारण काही दिवसांत याच मैदानावर मालिकेतला अखेरचा कसोटी सामना होणार आहे. त्या सामन्याची खेळपट्टी कशी असणार? फिरकीचा आखाडा की धावांचा रणगाडा? गुजरात क्रिकेट संघटना आता कोणताही धोका पत्करणार नाही. पाच दिवस हा सामना चालला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असणारच. याचे कारण ‘आयसीसी’ने खराब खेळपट्टी असा शेरा मारला, तर भारतात होणाऱ्या आगामी ट्‌वेन्टी-२० विश्‍वकरंडक स्पर्धेतील सामन्यांसाठी या अतिविशाल स्टेडियमला मुकावं लागेल की काय, असा प्रश्न आहे. तेव्हा आता खुद्द ‘खेळपट्टी’चीही ‘कसोटी’ लागेल, अशीच चिन्हे दिसताहेत.

Edited By - Prashant Patil

loading image