esakal | अग्रलेख : टीआरपीचा ‘अंमल’
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख : टीआरपीचा ‘अंमल’

गेल्या रविवारी राज्यसभेत विरोधकांचा आवाज दाबून सरकार पक्षाने निव्वळ आवाजी मतदानाच्या जोरावर कृषिविषयक दोन वादग्रस्त विधेयकांवर मोहोर उठवून घेण्यात यश मिळवताच देशभरात ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

अग्रलेख : टीआरपीचा ‘अंमल’

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गेल्या काही दिवसांत अंमली पदार्थांच्या गैरव्यवहारात गुंतलेल्या काही सिने-अभिनेत्रींची नावे एका पाठोपाठ एक अचानक बाहेर येऊ लागली आहेत. यात दीपिका पदुकोणसारख्या अव्वल नटीचे नावही आल्याने प्रसारमाध्यमे; विशेषतः टीव्हीचा पडदाही त्याच बातमीने व्यापला आहे. प्रत्यक्षात देशात आणखीही काही घडतेय आणि त्याचा तुमच्या-आमच्या रोजच्या जीवनाशी निकटचा संबंध आहे. गेल्या रविवारी राज्यसभेत विरोधकांचा आवाज दाबून सरकार पक्षाने निव्वळ आवाजी मतदानाच्या जोरावर कृषिविषयक दोन वादग्रस्त विधेयकांवर मोहोर उठवून घेण्यात यश मिळवताच देशभरात ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. पंजाब आणि हरयाणा या दोन राज्यांतील शेतकऱ्यांचा असंतोष ठळकपणे समोर आला असला तरी त्याचबरोबर बंगळुरात शेकडो शेतकरी तसेच कामगार व दलित संघटनांनी एकत्र येऊन याच विधेयकांच्या विरोधात मोठी निदर्शने केली. काँग्रेससह अनेक पक्षांनी या विधेयकांच्या निषेधार्थ आजच, शुक्रवारी देशव्यापी आंदोलन जाहीर केले आहे. त्यात किमान दीड-दोन डझन शेतकरी संघटनांनी सहभागाचा निर्णय घेतलाय. तर काँग्रेसशासित पंजाबात गुरूवारीच राज्यव्यापी बंद झाला. नेमका हाच मुहूर्त साधत नॉर्कोटिक्‍स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) दीपिकाला चौकशीसाठीचे आवतण धाडणे, हा निव्वळ योगायोग म्हणावयाचा काय? शुक्रवारी एका बाजूस आंदोलनकर्ते शेतकरी रस्त्यांवर उतरलेले असतानाच दुसरीकडे दीपिकाने ‘एनसीबी’च्या कार्यालयाचा रस्ता धरलेला असेल! तेव्हा घराघरांत कोरोनामुळे ठाणबंद झालेल्यांच्या नशिबी टीव्हीचा छोटा पडदा मात्र दीपिकाने व्यापून टाकलेला असणार, हे उघड आहे! त्यामुळे शेतकऱ्यांना बातमीतूनही हद्दपार करण्यासाठीच हा कपिलाषष्ठीचा ‘योग’ जुळवून आणला गेला, असे अगदी सहज म्हणता येते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुळात गेल्या दोन आठवड्यांत बॉलीवूडमधील अमली पदार्थांच्या सेवनाचे हे प्रकरण दिसते तेवढ्या सहजपणे इलेक्‍ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या अजेंड्यावर आलेले नाही. या साऱ्या प्रकरणाचे मूळ गेल्या जूनमध्ये सुशांतसिंह राजपूत या बॉलीवुडमधील उभरत्या अभिनेत्याच्या आकस्मिक मृत्यूत असून, मुंबई पोलिस त्या प्रकरणाचा तपास करत असताना, महिनाभरानंतर ही आत्महत्या नसून ‘हत्या’ आहे, असा आरोप सुशांतच्या वडिलांनी पाटण्यात दाखल केलेल्या पोलिस तक्रारीत नोंदवला. नंतर झपाट्याने चक्रे फिरली आणि सुशांतच्या मृत्यूचे प्रकरण हे केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे  (सीबीआय) सोपवण्यात आले. त्यानंतर आठ-दहा दिवस रिया चक्रवर्ती या सुशांतच्या मैत्रिणीची कसून झाडाझडती झाल्यानंतर आता ‘सीबीआय’ने त्याबाबत मिठाची गुळणी धरली आहे. नंतर आणखी एक अभिनेत्री, कंगना राणावत झाशीच्या राणीच्या थाटात मुंबईत अवतरली आणि तिने एका पाठोपाठ एक अशा पन्नासांची नामावळी अमली पदार्थांच्या व्यवहारासंदर्भात ‘एनसीबी’कडे दिली. त्यानंतर तपास यंत्रणेने बॉलीवूडचे जणू आपण ‘शुद्धीकरण’ करत असल्याच्या थाटात दीपिकाबरोबरच श्रद्धा कपूर, सारा अली खान अशा काहींना चौकशीची ‘आवतणे’ धाडलीत. शिवाय, त्यामुळे बॉलीवूडमधील सगळे पुरुष निर्व्यसनी आणि फक्‍त महिलाच तेवढ्या ‘गांजेकस’ असे या तपास यंत्रणांना म्हणावयाचे आहे काय? हा सारा खेळ साहजिकच टीव्ही माध्यमांसाठी अत्यंत दिलखेचक तसेच रमणीयही असल्याने, बाकी विषय गुंडाळून ठेवत ही माध्यमेही ‘शुद्धिकरणा’च्या या खेळात सामील झाली आहेत. अर्थात, ‘टीआरपी’च्या ‘रॅट रेस’साठी त्यांना ते आवश्‍यकही असेल. मात्र, यामुळे सुशांतचा मृत्यू हा आत्महत्या की हत्या, हा विषय मात्र बातम्यांतून पूर्णपणे गायब झालाय. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळेच आता हा सारा राजकीय तमाशा असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्यांना कोणत्या ना कोणत्या जाचात तर जाणीवपूर्वक उतरवले जात नाही ना, असाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे. अनुराग कश्‍यप या दिग्दर्शकाविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार अचानक एका अभिनेत्रीने नोंदवली. कश्‍यप यांनी आपली विद्यमान सरकारविरोधातील भूमिका कधीच लपवून ठेवलेली नाही. दीपिकाचे नाव तिने दिल्लीतील ‘जेएनयू’ या प्रख्यात विद्यापीठात सरकारविरोधी आंदोलनानंतर लावलेल्या हजेरीमुळे गोवल्याचेही सांगितले जाते. एकीकडे बॉलीवूड विश्‍वाला बदनाम करण्याचे हे सत्र सुरू असतानाच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नोएडा परिसरात चित्रनगरी उभारण्याचे जाहीर केल्याने, तर या खेळामागील राजकीय पदर अधोरेखित झाला आहे. सुमारे दोन दशकांपूर्वी भारतीय क्रिकेट विश्‍वावर असेच किटाळ ‘मॅच फिक्‍सिंग’ प्रकरणातून उभे राहिले होते. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडण्यात याच क्रिकेट जगताला काही वर्षे वाट बघावी लागली. आता बॉलीवूडलाही त्याच अनुभवातून जावे लागते आहे. मात्र, या साऱ्या राजकीय खेळात सुशांतच्या मृत्यूबाबत उभे करण्यात आलेले गूढ मात्र बातम्यांतून केव्हाच बाहेर निघून गेले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image